घरफिचर्ससारांशदृष्ट लागली श्रावणा!

दृष्ट लागली श्रावणा!

Subscribe

गेले दीड वर्ष माणूस एका विचित्र श्रावणाला सामोरा जातो आहे. श्रावणात जसा उन पावसाचा खेळ चालू असतो तसा लॉक अनलॉकचा खेळ चालू आहे. आज कोरोना काळ सगळ्यांच्या मनावर इतका ठासून भरला आहे. आज अनलॉक आहे. कोरोना गेला असं वाटतं. दुसर्‍या क्षणाला रुग्ण वाढू लागतात आणि पुन्हा लॉकडाऊन सुरु होतो. ह्या प्रचंड महामारीत श्रावण आला काय नी गेला काय!, तरीही आजही रात्री कुणाच्या तरी घरी पोथी वाचण्याचे आवाज येतात. पण त्याचवेळी कुठेतरी रोजगार गेल्याने रात्रभर चक्क उघड्या डोळ्यांनी छताकडे बघणारे डोळे अस्वस्थ करून सोडतात. ह्या श्रावणाला कोणाची तरी दृष्ट लागली हे मात्र खरे.

शनिवारचा दिवस. आता शेवटची घंटा होऊन शाळा सुटण्याची वेळ झाली आहे. आणि आमच्या कोपर्‍याच्या वर्गात शाळेचा आकाराम शिपाई नोटीसवही घेऊन आमच्या वर्गात येतो. शेवटच्या तासाचे शिक्षक हातात नोटीसवही घेऊन नोटीस वाचतात. उद्यापासून श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शाळा चार तासिकांनी सुटेल. श्रावण महिना आणि माझी झालेली ही पहिली ओळख. श्रावण सोमवारी शाळा अर्ध्या दिवसाने सुटायची. तेव्हा बाहेरच्या निसर्गाकडे लक्ष जायचे. आषाढाचा पाऊस पिऊन मत्त झालेली झाडे दृष्टीस पडायची.

गेले पाच-सहा दिवस पाऊस पडलेला नसला की, हातात छत्री घेऊन जायचा प्रश्नच नव्हता. मग कुठून तरी एखादा ढग आकाशात दिसायचा आणि तप्त झालेल्या त्या सृष्टीवर अलगद पर्जन्यधारा बरसायच्या. हातात छत्री नसताना त्या पडत्या पाण्यात सर्दी-खोकल्याची चिंता वाटायची म्हणून पावसात भिजून घरी जायची कोणी घाई करताना दिसत नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली उभं राहून लोक म्हणायचे हा श्रावणातला पाऊस ….आता जाईल. श्रावणातला हा उन पावसाचा खेळ असा चालूच राहतो. ह्या काळातला पाऊस देखील लहरी आणि उन तर त्याहूनही लहरी.

- Advertisement -

श्रावण सुरु होणार म्हटल्यावर सृष्टीची ऐट ती काय विचारता…! संपूर्ण माळरान हिरव्या छटांनी नटलेले असते. शेताच्या मेरेवरून फिरताना आजूबाजूंच्या कुणग्यात भाताची रोपं गुडघाभर उंचीला आलेली असतात… त्या पात्यांचा पायाला होणारा स्पर्श किती मोहरून टाकायचा. शेतात आता कोणी दिसणार नाही.. पण शेतातून फेरी मारताना ह्या तरव्याचा गंध नाकात नुसता भरून घ्यावा …हा गंध मनभावन आहे. त्या तरव्याचा होणारा ओला स्पर्श मनाला किती सुखद अनुभव देतो! त्या वातावरणात एक सात्विक उत्तेजना आहे. श्रावणी वातावरणाला सुरुवात होते ती मुळात आकाशात दिसणार्‍या इंद्रधनुने…. शेताच्या आजूबाजूला असणार्‍या तणांना कुठेतरी केसरा फुटायचा.

खळ्यात घातलेला मांडव आता फुलू लागायचा. भेंडी, पडवळ, झालीच तर दोडकी आता हळूहळू अंग धरू लागायला सुरुवात करायची. पावसाळ्यात घातलेली अळी आता वेगाने मांडवावर चढायला लागलेली आहेत… आता गणपतीच्या आसपास ह्या दोडकी, तौशी, पडवळ धरायला लागतील. पुढल्यादारी सहज पायरीवर बसलं तरी या वेलींचा सुटणारा गंध नाकात भरून यायला आता सुरुवात होणार ही कल्पनाच किती सुंदर आहे.

- Advertisement -

घराच्या कौलावरून ओघळणारे पावसाचे थेंब, त्यात खळ्यात पसरणारे उन …. आणि वेलींना चढलेला हिरवा रंग ही सृष्टीची हिरवी गौळण मनाला भूल पाडते हे खरं! श्रावण आला की, पावसाच्या एखादी सर कोसळून नव्हे तर शिडकावून गेली की, पाटल्यादाराच्या अळवाच्या बेटात जाऊन बघावे …त्या सृष्टीच्या शिडकाव्याचे बरेच थेंब त्या पानावर पडले जातात, ते जलथेंब आता मोत्यासारखे दिसू लागतात. दुरून पाहणार्‍याला जणू मोत्यांचा सडा त्या पानांवर तयार झाल्यासारखा दिसायचा. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या सरीपाठोपाठ मातीला एक श्रावणीक गंध सुटू लागतो.

हा गंथ त्या वातावरणात आपोआप तयार होतो, त्याची अनुभूती ही आपोआप तयार होते. श्रावणाच्या दिवसात आमची आजी श्रावण बाळाची गोष्ट हटकून सांगायची. गोष्ट सांगताना ती देखील डोळ्यातून टिपे काढायची. तिचा पिंड मुळातच ह्या धार्मिक वातावरणात पोसला होता. घरात श्रावणात ज्ञानेश्वरी नाहीतर एकनाथी भागवताची पोथी वाचन सुरु असलं तरी श्रावण बाळाची गोष्ट सुरु असायची. पोथी संपली की, आजीच्या गोष्टी सुरु होतं. श्रावणाच्या व्रताच्या मागे तिची एक गोष्ट होती. तिच्या गोष्टीत एक सावकार होता. त्याला खूप वर्षांनी मुलगा झाला. मुलगा झाल्यावर त्यांची कुंडली कोणा जोतिषाने मांडली तेव्हा त्याला कळले की, आपल्या मुलाचे आयुष्य फक्त सोळा वर्षाचे आहे. तेव्हा त्या सावकाराने शंकराची भक्ती केली.

सावकाराच्या मुलाला सोळा वर्षे झाली आणि सावकाराची पत्नी आता आपल्या मुलाची मरणघटिका जवळ आली म्हणून डोळ्यातून आसवे काढू लागली. ही गोष्ट मुलाच्या लक्षात आली. तेव्हा सावकार पत्नीने त्याला सत्य सांगितले. त्यावर त्या मुलाने जशीजशी आपली मरणघटिका जवळ आली तशी शंकराच्या पिंडीला मिठी मारली. जेव्हा यमदूत त्याचे प्राण हरण करायला आले. तेव्हा पिंडीतून शंकर प्रगट झाले त्यांनी आपला त्रिशूल त्या यमदुतांच्या दिशेने रोखला व त्या मुलाचे प्राण वाचवून त्याला दीर्घायुष्य दिले. गेली कित्येक पिढ्या ही कथा तत्कालीन आजींनी त्यांच्या नातवांना सांगितलेली. श्रावणातल्या प्रत्येक व्रताला कुठलीतरी मौखिक परंपरेतील कथा चिकटलेली. आमच्या खळ्यात श्रावण महिन्यात कोणी एक कथेकरी यायचा आणि श्रावण बाळाची कथा आणि वर सांगितलेली आजीची कथा गुंतून जायचा. त्याने कथेला सुरुवात केली की गावातल्या माय भगिनी आपल्या मुंबई किंवा तत्सम शहरात असणार्‍या मुलाच्या आठवणीने व्याकूळ व्हायच्या.

कथेकरी आपल्या खड्या आवाजात पारंपारिक लोकगीत सादर करायचा.

वसुदेव पायान पांगळा
रुपीन डोळ्यांनी आंधळी ॥
अरे तू सरावन्या बाळा
आम्हाला काशीला न्यावं ॥
सरावन तेथून निघाला
गेला सुताराच्या वाड्या ।

असं ते गाणं रंगत जायचे. आता कथेकरी बुवाने समोरच्या मंडळींच्या काळजाचा ठाव घेतला होता. माय भगिनी डोळ्याला पदर लावत आहेत. आणि कथेकरी शेवटच्या पदावर येतो आणि

दशरथ रडू बा लागला
काय सांगू बाई तुला ।

सरावन भाचा मी मारिला ॥ असं धाय मोकलून तो तिथे सगळ्यांना सांगतो. कथेकरी पण रडू लागतो. ह्या सगळ्यात लोकांना वाटू लागतं की, हा कथेकरी चांगला अभिनेता झाला असता. दर श्रावणात आमच्या घराने ही कथा ऐकली आहे. गावागावातून असे कथेकरी आपली कला सादर करत असतातच. श्रावणातल्या उन पावसाच्या खेळात माणसाच्या भावनांचा उन पाऊस चालूच असतो. माणसाच्या मनात हा श्रावण नित्याने बरसत असतो.

गेले दीड वर्ष माणूस एका विचित्र श्रावणाला सामोरा जातो आहे. श्रावणात जसा उन पावसाचा खेळ चालू असतो तसा लॉक अनलॉकचा खेळ चालू आहे. आज कोरोना काळ सगळ्यांच्या मनावर इतका ठासून भरला आहे. आज अनलॉक आहे. कोरोना गेला असं वाटतं. दुसर्‍या क्षणाला रुग्ण वाढू लागतात आणि पुन्हा लॉकडाऊन सुरु होतो. ह्या प्रचंड महामारीत श्रावण आला काय नी गेला काय!, कोणाला काय फरक पडतो. निसर्ग आपला नेम चुकवत नाही. आषाढात बरसलेल्या पावसात दरडी कोसळल्या. श्रावण सुरु झाला आणि डोंगर कोसळू लागले. श्रावणाचा उन-पावसाचा खेळ बघायचेच राहून गेले.

तरी श्रावणाची मनभावनता अजून संपली नाही. तो घननिळा अजूनही बरसताना दिसतो. आजही रात्री कुणाच्या तरी घरी पोथी वाचण्याचे आवाज येतात. पण त्याचवेळी कुठेतरी रोजगार गेल्याने रात्रभर चक्क उघड्या डोळ्याने छताकडे बघणारे डोळे अस्वस्थ करून सोडतात. ह्या श्रावणाला कोणाची तरी दृष्ट लागली हे मात्र खरे !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -