घरफिचर्ससारांशगावची भ्याट

गावची भ्याट

Subscribe

पडवीत उतव ठेवलेला असला की, त्याच्यावर चार-पाच कांबळी सुकत घातलेली असायची. तिथे बसून कोणतरी आम्हाला मुंबईला देता येतील म्हणून काजी भाजत बसला असे. चणे भाजून भरडून काकी जात्यावर दळायला घ्यायची आणि आता आमका घरात र्‍हवाक नुको, आता घर खावक येतला. दळताना येणार्‍या पिठाच्या वासाने आम्हाला कळायचे की, काकी आणि आई मुंबईला जाण्यासाठी लाडू बनवत आहेत. इतकी वर्ष ह्या लाडवाच्या व्यतिरिक्त अजून एक भेट जी खास मालवणी माणसाची खासियत होती ते म्हणजे नारळाची कापं.

एप्रिल महिन्यात परीक्षा संपली की गावी जायचं हे विद्यार्थीदशेतलं अनोखे समीकरण. अगदी पहिल्या इयत्तेपासून ते दहावीची शालांत परीक्षा देईपर्यंत ह्यात कोणताच बदल झाला नाही. माझ्या बाबांना घरात,वाडीत सगळीकडे बबन म्हणायचे. एव्हाना बबन एप्रिलच्या बारा तेरा तारखेला गावी जाणार हे वाडीतल्या लोकांना माहित असायचे. वाडीतले चाकरमानी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या मुंबईच्या घरी येऊन आम्ही नक्की कधी जाणार याचा अंदाज घेऊन जायचे. बाबा नाईट शिफ्टवरून सकाळी थेट लालबागला जाऊन तिथल्या त्यांच्या एका ठराविक दुकानातून गावी नेण्यासाठी खास काही वस्तू आणायचे आणि त्या वस्तू भरण्यासाठी खास कोकणी गोणती आणायचे. हे सगळे मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात.

गावी नेण्यासाठी वर्षानुवर्षे एक वस्तू मात्र ठराविक ठरलेली होती,ती गेली तीन पिढ्या. मी शाळेत शिकत असताना माईआजी भाईकाकांसोबत परेलला रहायची. बाबा किंवा सुधीरकाका तिला भेटायला परेलला गेले की येताना गौरीशंकर छितरमलच्या मिठाई दुकानातून सुतरफेणी आणि हलवा हमखास घेऊन यायचे. गावी जाताना ह्या दोन वस्तू हमखास आमच्या भेटीत असायच्या. सुतरफेणी हे आजीचे आवडते खाद्य. आम्ही मुलं हल्ली हल्लीपर्यंत त्याला म्हातारीचे केस असचं म्हणायचो. मलादेखील ही सुतरफेणी खूप आवडते. पण ठराविक दुकानातली. म्हणजे दादरच्या डी. दामोदर यांच्या दुकानातली, गौरीशंकर यांची आणि फारतर ठाण्याच्या टीप टॉपमधली. ही सुतरफेणी मऊ लुसलुशीत असते. तोंडात टाकली की, विरघळली म्हणून समजा. इतर ठिकाणाची मात्र उगाच दातात अडकून राहते. हल्ली ह्या सुतरफेणीत खूप छान छान फेव्हर येतात. पण माझा जीव जडलाय त्या पांढर्‍या सुतरफेणीत. साजूक तुपात घोळलेली ती सुतरफेणी हल्ली कितीही खाता येते. पण तेव्हा तळहाताच्या मापाएवढी मिळायची. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आमच्या घरात गाववाल्यांची रेलचेल असे. काहीजण तर अगदी गाडी सुटायच्या वेळेला येऊन भेट देऊन जायचे.

- Advertisement -

भेटीचे प्रकार तरी किती. प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या बिस्कीटच्या पुड्यापासून ते मोठ्या थेल्यात कितीतरी जिनसा आपल्या गाववाल्यांसाठी दिलेल्या असायच्या. बाबांचा स्वभाव तसा भिडस्त,कोणाला नाही म्हणायला त्यांना जीवावर येई. त्यामुळे अनेकांच्या अनेक भेटी आमच्या सामानाबरोबर गावी जाताना असायच्या. एकदा गावी उतरलो की, वडाच्या झाडाजवळ किंवा आमच्या खळ्यात गाववाले जमलेले असायचे. बबन,इल ?…..बरा झाला बाबा तू इलस तो. जा सामान ठेव, आमी आसाव हय असं म्हणून गाववाले खळ्यातल्या पेळेवर बसून राहायचे. बाबा आंघोळीला जायच्या आधी पँटच्या आतल्या खिशात जिथे पैसे ठेवलेले असायचे. चाकरमान्याने गाववाल्यासाठी दिलेले पैसे बाबांनी पँटच्या आतल्या खिशात म्हणजे चोरखिशात ठेवलेले असायचे आणि त्या खिशाला आतून दोर्‍याने शिवन घातलेली असायची.

ते पैसे अगदी कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले असायचे. तिथली शिवन काढायला नंदाकाकीला सांगायचे आणि पैसे काढून तात्याच्या हातात देऊन कोणाला किती द्यायचे आणि कोणी दिले ते सांगून त्याचे त्याचे पैसे पोचते करायला सांगायचे. बाबांची अंघोळ होईपर्यंत वसंतनाना नाहीतर आण्णा साळकर बोजा सोडायचे. बाबा लोट्यावर आले की, कोणाची भेट असेल कोणाची चिठ्ठी असेल ती त्याच्या हातात दिली की, आतल्या खोलीतून आई मिठाईचे खोके बाहेर काढायची आणि खळ्यात बसलेल्या मंडळींचा अंदाज घेऊन त्या खोक्यातल्या मिठाईचे तुकडे केले जायचे. प्रत्येकाच्या वाट्याला त्या सुतरफेणीच्या खोक्यातील चिमूटभर मिठाई यायची. ती चिकट मिठाय आमका नुको असं म्हणून हलव्याचा तुकडा नाही म्हणायची.

- Advertisement -

बाबा ज्याची त्याची भ्याट त्याच्याकडे देऊन खळ्यात बसले की, बबन, आमचे नातू बरे आसत ना रे , बाबीन पत्र लीवल्यान पण इशेष काय लीवक नाय तर कोण बबन, भ्याट रहवांदे काय चिठ्ठी दिल्यान काय रे झिलान ?…..ह्या वयात आता काय खावचा र्‍हवला हा ! असं म्हणून दुका काढत बसायची. कोणतरी आमचे चाकरमानी यंदा येणार काय म्हणा हुते काय ?……गुदस्तादिकू इले न्हवते. अनेकांचे अनेक प्रश्न. एकदा आपली भ्याट त्यांच्या पदरात पडली की, कोणीतरी तू हुंबयक कदी जातल …..माका वायच नातवाक कायतरी देयत म्हणतय. तेवढ्यात तिथे पांडूदादा असतील तर ते रे त्याका इलो हा तो वायच दम तरी खाव दे मग जावच्यो गोष्टी करा अनेक नमुने तिकडे यायचे. कधीतरी कोणाच्या चाकरमान्याने काही दिलं नाही की, हुरमुसले चेहरे तिकडे बघायला मिळायचे बबन, आमचो चंद्रो इलेलो काय ?
नाय गे, माका गेले वरीसभर खय दिसलो नाय. सुरग्याच्या झीलाच्या लग्नात पण खय इलो नव्हतो.

….हल्ली पत्रपण नाय रे त्याचा असं म्हणत म्हातारी घराकडे जायला निघायची की, बाबा आत जाऊन बिस्कीटचा पुडा त्या माउलीच्या हातात ठेवायचे बबन, चंद्रो खय दिसलो तर त्याका सांग आवस वाट बगता हा असं म्हणत ती पाणंदीतून निघून जायची. पण खरी मजा मुंबईला परत निघालो की असायची. गावावरून निघताना भुईमुगाच्या शेंगांची एक मोटली असायची. बाबा ती बघून ह्यो शेंग्यो कशाक व्हयो. ह्यो मुंबयत मिळत नाय काय! असं एक म्हणून ती पिशवी तिथेच ठेवायची. मग नंदाकाकी बाबांची नजर नाही असं बघून हळूच गोणत्यात तळाला ठेऊन द्यायची. कोकमाची एक छोटी पिशवी ह्या भेटीत असायची. उकडे तांदूळ अगदी तळाशी असायचे. गोणत्याचं तोंड बांधणार इतक्यात काकी वायच थांबा आता बांदू नुको ……चार लाडू करून देतय तेवडे टाका. पडवीत चार काजी हत तेवडे घाला असं म्हणून आत जायची.

संध्याकाळी तरव्याच्या कामातून नंदाकाकी आली की, चणे भाजायला घ्यायची. बाहेर तोपर्यंत पावसाने जोर धरलेला असायचा. पडवीत उतव ठेवलेला असला की, त्याच्यावर चार-पाच कांबळी सुकत घातलेली असायची. तिथे बसून कोणतरी आम्हाला मुंबईला देता येतील म्हणून काजी भाजत बसला असे. चणे भाजून भरडून काकी जात्यावर दळायला घ्यायची आणि आता आमका घरात र्‍हवाक नुको, आता घर खावक येतला. दळताना येणार्‍या पिठाच्या वासाने आम्हाला कळायचे की, काकी आणि आई मुंबईला जाण्यासाठी लाडू बनवत आहेत. इतकी वर्ष ह्या लाडवाच्या व्यतिरिक्त अजून एक भेट जी खास मालवणी माणसाची खासियत होती ते म्हणजे नारळाची कापं. सकाळी जोताकडे जायच्या अगोदर सहा-सात नारळ खोवून ते टोपात परतून त्याचे चून परातीत घेऊन त्याची कापं पाडायची आणि ती एका बॉक्समध्ये भरून ठेवून तो बॉक्स एका पेटीत ठेवायची. कारण घरात मांजरीचा सुळसुळाट असायचा. आम्ही गावातली आयनल गाडी पकडून कणकवलीला मुंबईची गाडी पकडायला आलो की, भाईमामा आजी किंवा मामीने केलेली नारळाची कापं घेऊन डेपोत यायचा.

कोकणरेल्वे सुरू झाल्यापासून कोकणीमाणूस पुन्हा गावाकडे वरचेवर जाऊ लागला. कुणाच्या घरात चाकरमानी येणं ही काही मोठी गोष्ट राहिली नाही. शेजारच्या घरात चाकरमानी आला हे आता वाडीत कळत नाही. हल्ली पैसे कोणाकडे पाठवायची सोय झाली आहे. चिठ्ठ्या पाठवायची गरज उरली नाही. गाव बदलते आहे हा बदल होणार्‍या विकासाची नांदी आहे, पण कोकणी माणसाच्या मनात गावच्या भ्याटीची अप्रुपता किंचितही कमी झाली नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -