घरफिचर्ससारांशस्टोरीज इन ए साँग

स्टोरीज इन ए साँग

Subscribe

एका दशकापूर्वी, जेव्हा फेब्रुवारी महिन्यातला गारवा आजच्यापेक्षा अधिक सुखद जाणवत होता, त्या दिवसांत पुण्याच्या ‘बाजा गाजा फेस्टीव्हल’मध्ये एक धाडसी प्रयोग सादर झाला होता. संगीत हेच मुख्य पात्र असलेल्या त्या नाटकाचे नाव होते ‘स्टोरीज इन ए साँग’. नाट्यतत्वाचं एक अंग म्हणून दादरा, ख्याल, ठुमरी आणि कजरी सारख्या संगीत परंपरांचा ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतला गेलेला शोध, असं या प्रयोगाचं वर्णन करावं लागेल. नागर रंगभूमीवर सादर झालेल्या कालच्या आणि आजच्याही नाटकांमध्ये संगीत हे प्रामुख्याने नाट्यपरिणाम साधणारं, तो गडद अथवा अधोरेखित करणारं एक अतिरिक्त साधन म्हणून वापरलं गेलं आहे. ‘स्टोरीज इन ए साँग’मध्ये संगीतच नाटकाचा आशय आहे, विषय आहे, सबकुछ आहे.

कालच्या फेब्रुवारी महिन्यात ‘स्टोरीज इन ए साँग’ नाटकाची दशकपूर्ती झाली. त्यानिमित्त पुन्हा एकदा त्याचा प्रयोग पाहायची संधी मिळाली. खरं तर नाटकाचे दिग्दर्शक सुनील शानबाग आणि त्यांच्या चमुसाठी या नाटकाचा प्रयोग म्हणजे ‘वन टाईम परफॉरमन्स’ होता. पहिला प्रयोग झाल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी एकमेकांचा निरोप घेऊन सगळे कलाकार आपली वाट धरत निघूनही गेले. पण प्रयोगाला प्रेक्षकांच्या लाभलेल्या तुफान प्रतिसादामुळे एकाच प्रयोगावर समाधान मानणं कुणालाच पसंत पडलं नाही. पहिल्या प्रयोगानंतर तब्बल चार महिन्यांनी जो दुसरा प्रयोग सादर झाला, तिथपासून आजवर या प्रयोगांची मालिका सुरूच आहे.

पडद्यामागील दिग्गज

- Advertisement -

‘स्टोरीज इन ए साँग’ची संकल्पना आहे प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल आणि संगीतज्ञ अनीश प्रधान या जोडगोळीची ! संगीतावर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लिखाणातून तसंच आख्यायिका आणि दंतकथांमधून, ज्यांचं नाटक करता येऊ शकेल असा कच्चा माल निवडण्याचं काम ही दोघं गेली अनेक वर्षे करत होती. शुभा मुद्गल म्हणतात, नाटकाच्या माध्यमातून संगीताची गोष्ट सांगण्याची कल्पना जरी आमची असली, तरी तिला मूर्तरूप देण्यासाठी कुणीतरी पक्का नाटकवालाच हवाय, हे आम्हाला पहिल्या दिवसापासून कळत होतं. दिग्दर्शक सुनील शानबागचं ‘थिएटर’ आमच्या नजरेसमोर होतं. नाटकातून राजकीय विधानं करणं, ही त्यांची खासियत आहे. शिवाय, त्यांनी दिग्दर्शित केलेले नाट्यप्रयोग नेहमीच परफॉरमन्स आणि संगीताने नटलेले असतात. रामु रामनाथनच्या ‘कॉटन 56, पॉलिएस्टर 84’ या नाटकाचा ‘लाईव्ह म्युझिक’सोबत केलेला प्रयोग हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तो प्रयोग आम्ही पाहिला असल्याने सुनील शानबागला आम्ही विचारलं की, तुमच्या नाटकात तुम्ही संगीताचा मुबलक वापर करता. मग आपण संगीत या विषयालाच घेऊन नाटक केलं तर कसं ? ही गोष्ट 2007 ची आहे. त्यावर्षी सुनील शानबाग यांनी नुकतंच ब्रेख्तच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’चं सांगितिक रूपांतर केलं होतं. जसजश्या मुद्गल-प्रधान या जोडीसोबत त्यांच्या चर्चा होत गेल्या, तसतशी त्या कल्पनेची भुरळ शानबागांमधल्या दिग्दर्शकाला पडत गेली. शुभा मुद्गलांकडे निवडलेल्या प्रत्येक गाण्याविषयी काही ना काही सांगण्यासारखी गोष्ट होती. त्या गाण्यांच्या आख्यायिका वा दंतकथांना त्या त्या वेळच्या ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय संदर्भांची जोड होती. या भांडवलावर शानबाग या जोडगोळीला येऊन मिळाले आणि एका संगीताची गोष्ट सांगणा-या नाटकाची प्रक्रिया सुरू झाली.

सात स्वर

- Advertisement -

आपल्या देशातील संगीताच्या इतिहासाचा धांडोळा घेणा-या छोट्या छोट्या गोष्टी सांगत ‘स्टोरीज इन ए साँग’चा प्रयोग आपल्या समोर उलगडत जातो. नाटकातल्या एकूण सात कथांपैकी एक, जिचं शीर्षक आहे ‘साँग्ज ऑफ द नन’, ही एका बुद्धिस्ट परिचारिकेच्या कवितेवर आधारित कथा आहे. तिचा संदर्भ आणि संबंध भारतातील स्त्रीसाहित्याच्या अगदी सुरूवातीच्या काळाशी सांगता येऊ शकेल. दुसरी कथा आहे महात्मा गांधीच्या आदर्शातून बळ आणि प्रेरणा घेणा-या वाराणसीतील कोठ्यावर नाचणा-या एका गणिकेची तर, तिसरी कथा उर्दुतील लेखक कुर्रत-उल-ऐन-हैदर यांच्या ‘चांदणी बेगम’ या कादंबरीवर आधारित आहे. लोककलेवर गुजराण करू पाहणा-या एका कुटुंबाची धडपड या कथेचं बीज आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकू पाहणा-या एका ब्रिटिश मुलीची गोष्ट चौथ्या कथेत आहे. या कथेत भारतीयांची संस्कृती आणि ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा अपूर्व संगम ज्या भूमीवर घडतो, तिचं दर्शन प्रेक्षकांना करून देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, समकालीन वाटू शकतील अशा इतरही अनेक कथांचा आळीपाळीने या नाटकात समावेश करण्यात आला आहे.

अभिनेता हाच गायक

रंगमंचावरील प्रत्यक्ष गायन आणि वादन हे आपल्या देशातील लोककलांचे अविभाज्य अंग आहे. तर नागर रंगभूमीवर सादर केल्या जाणा-या नाटकांमध्ये सहसा ध्वनिमुद्रीत संगीताचा वापर केला जातो. ‘स्टोरीज इन ए साँग’चा नटसंच ठरवताना तो गायन आणि अभिनय या दोन्ही आघाडयांवर तरबेज असावा, याचं भान ठेवूनच त्यात काम करणा-या नटांची निवड करण्यात आली. त्याविषयी विचारलं असता दिग्दर्शक सुनील शानबाग म्हणतात, या आधी दोन नाटकांत मी अभिनय आणि गाता येऊ शकणा-या नटांसोबत काम केलं होतं. तेव्हा ‘स्टोरीज इन ए साँग’साठी नटसंच निवडतांना मला विशेष प्रयास करावे लागले नाही. शिवाय, नटांनीही त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी पुरेपूर मेहनत घेतली. त्यातूनच नाटकातलं गायन ही एक विशेष कौशल्याधारित कला असल्याच्या निष्कर्षाप्रत मी येऊन पोचलो आहे. 2007 साली पृथ्वी थिएटरने संगितिकांचा महोत्सव आयोजित केला होता. त्यात आम्ही ‘थ्री पेनी ऑपेरा’ सादर केलं होतं. ‘स्टोरीज इन ए साँग’ची निर्मिती ही त्यानंतरची घटना आहे. मी तर असं म्हणेन की, या दोन नाटकांच्या निर्मितीनंतर मुंबईच्या हिंदी भाषिक रंगमंचावर ‘लाईव्ह म्युझिक’चा प्रवाह अधिक जोरकसपणे वाहू लागला. आज अनेक नट गायनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेताना दिसत आहेत. दहा वर्षांपूर्वी जी गोष्ट जमून येणं जितकं कठीण वाटत होतं, तितकं कठीण ते आज नक्कीच नाहीय.

नटांचे परफॉरमन्सेस आणि प्रेक्षकांचा सहभाग या द्विसुत्रीच्या बळावर आजवर ‘स्टोरीज इन ए साँग’चे शंभरहून अधिक प्रयोग पार पडले आहेत. हा आकडा कोरोनापूर्व काळातला आहे. सुरवातीच्या प्रयोगांत सात कथांचा समावेश असलेल्या या नाटकाचा प्रवास जसजसा पुढे होत गेला, तसतसं संगीताचे निरनिराळे ‘फॉर्म’ दाखवता येतील, अश्या आणखी कथांचा समावेश त्यात केला गेला. नाटकात काम करणारा नटसंच जरी काळाच्या ओघात बदलत राहिला, तरी अनीश प्रधान आणि शुभा मुद्गल या जोडगोळीने प्रत्येक कथेसाठी निवडलेला संगीताचा घाट मात्र कायम तोच आणि तसाच राहिला. पहिल्यापासून म्हणजे दहा वर्षांपूर्वीच्या ते आजवरच्या प्रयोगांत सहभाग असलेले नट आजही या नटसंचात बहुसंख्येने आहेत. यावरून त्यांची या नाटकाशी असलेली निष्ठा आणि आस्थेचा अंदाज आपण बांधू शकतो. प्रेक्षक सुद्धा या प्रयोगाच्या सादरीकरणात उस्फुर्तपणे सहभाग घेत असल्याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे.

अभिनय आणि गाणं या दोन्हींच्या संगमातून येणारा रसरशीत जिवंत अनुभव हा ‘स्टोरीज इन ए साँग’ या नाटकाचा अविभाज्य भाग आहे. तो चुकवणं हा आपला करंटेपणा ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -