घरफिचर्ससारांशसंकल्प अंधश्रद्धा निर्मूलनाचा....गावाच्या विकासाचा !

संकल्प अंधश्रद्धा निर्मूलनाचा….गावाच्या विकासाचा !

Subscribe

अनेक गाव-खेड्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अंधश्रद्धेचे आणि मागसलेपणाचे प्रश्न दिसून येतात. या सर्व प्रश्नांची हळूहळू सोडवणूक करण्यासाठी आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी, म्हणजेच स्वयंपूर्ण, स्वावलंबी खेड्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्या त्या विषयातील तज्ञ मंडळींनी जाणीवपूर्वक त्या त्या गावातील गावकर्‍यांमध्ये प्रत्यक्ष जाणे आवश्यक आहे. त्यांना समजून घेणे, त्यांना समजावून सांगणे, आवश्यक आहे. आदर्श गाव म्हणजे काय असते,तेही प्रत्यक्ष इतर काही आदर्श गावभेटी घडवून आणणे शक्य आहे. आपण त्यांच्यासाठी मनापासून झटत आहोत, झटणार आहोत, असा विश्वास, अशी खात्री त्यांना आपल्या विचार-आचारातून द्यायला हवी. त्यामुळे फार मोठा फरक पडू शकतो.

मागील आठवड्यात ग्रामीण भागातील एक हजार लोकसंख्या असलेल्या एका अनोळखी खेडेगावात, तेथील सध्याचे लोकजीवन जाणून घेण्याच्या कुतूहलापोटी जाणीवपूर्वक गेलो. चहूबाजूंनी फुललेल्या शेतमळ्यांच्या मध्यभागी हे टुमदार खेडे आहे. या खेड्यातील लोकजीवनात पाळल्या जाणार्‍या अंधश्रद्धायुक्त अशा अनेक अनिष्ट, अघोरी रूढी प्रथा, परंपरा शोधण्याचा, त्या समजावून घेण्याचा, त्यांच्यावर योग्य पर्याय, उपाय सुचवण्याचा आणि भविष्यात ते प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी तेथेच तरुण-तरुणींची फळी कार्यरत करण्याचा मूळ हेतू ह्या भेटीत तर होताच, परंतु चाळीस वर्षापूर्वी मी स्वतः केलेल्या शेतीकामात आणि आताच्या शेतकामात काय बदल झाले, शेतीच्या जोडीला आणखी इतर कोणकोणते नवीन व्यवसाय, जोडधंदे आले आहेत, त्यामुळे लोकजीवनात एकूणच काय आणि कसा फरक पडला आहे, हे प्रत्यक्ष चर्चेतून अनुभवायचे होते. म्हणून त्या खेड्यात जो कोणी आबालवृद्ध व्यक्ती भेटेल, त्याच्याशी, त्याच्या पातळीवर जाऊन, बोलायचे. थेट अंधश्रद्धांबाबत बोलायचेच नाही. फक्त संवादातूनच त्या व्यक्तीला बोलते करायचे, त्याचा विचार, जीवनाबद्दलचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा.त्याला समजावून घ्यायचे.त्याचे म्हणणे ऐकून घ्यायचे. असा हेतू डोळ्यासमोर ठेवून, दुपारी साधारण एक वाजता त्या गावात पोहोचलो.

दुपारपर्यंतच शाळा असल्याने आता शाळा सुटली होती. कारण पहिली ते सातवीचे मुलं-मुली गावाच्या गल्ल्यांमधून येताना दिसत होती. रस्त्याने जाणार्‍या एका चौथीच्या मुलीला विश्वासात घेऊन, तिला, शाळेत आज काय काय शिकवले, तू जेवली का, तू आणि तुझ्या मैत्रिणी काय खेळ खेळल्या, आता घरी गेल्यावर तू काय काम करणार आहेस, अशी तिच्या बालबुद्धीला समजतील अशा प्रकारचे लहान लहान प्रश्न तिला मी विचारले. तिने दिलेली उत्तरं मोठी मार्मिक होती. ती म्हणाली, सकाळी शाळेत जाताना जेवून गेले होते. बाईंनी आज गणित आणि मराठी शिकवले. आता आम्ही सर्व मुले, मुली दररोज शाळेत जातो. मजा येते. अनेक खेळ खेळतो. आता घरी गेल्यावर बासनं म्हणजे भांडी घासणं, झाडझूड करणं, कपडे धुणं, चुलीसाठी सरपण म्हणजे लाकूड, गोवरी असं जळण जमा करणं, अशी कामं करते, असं ती म्हणाली.

- Advertisement -

पुढे ती सांगत होती की, आई लोकांच्या शेतात कामाला जाते. आम्हाला स्वतःची शेती नाही. वडील कंपनीत कामाला जातात. मोठा भाऊ कॉलेजला जातो. असं सर्व अगदी दिलखुलासपणे तिने कथन केलं. पायात सांधलेली स्लीपर घालून आणि दुपारचे ऊन लागू नये म्हणून सावलीसाठी शाळेचे दप्तर डोक्यावर धरून, ती माझ्याशी बोलत होती. दंडावर बांधलेल्या गंड्याबाबत तिला विचारले. तर ती म्हणाली की, असा गंडा बांधला की कोरोना होत नाही, असं माझ्या आईला कोणीतरी सांगितलं. म्हणून आईने माझ्या दंडावर हा गंडा बांधला आहे. गंडादोरा बांधल्याने खरंच कोरोना होणार नाही, असं तुला वाटतं का, असं विचारलं तर ती फक्त थोडसं हसली आणि घराकडे निघाली.

तेथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागच्या बाजूला दोन शौचालये दिसली. आडोसा म्हणून तेथे समोरच्या बाजूला भिंत बांधलेली होती. आतमध्ये काय स्थिती आहे, ते पाहण्यासाठी गेलो. दोन्ही शौचालये मलमूत्राने तुडुंब भरलेली होती. शौचालयाच्या वरच्या बाजूला भिंतीवर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला होता. तेथे जवळच देवीचे मंदिर दिसले. दरवर्षी चैत्री पौर्णिमेला तेथे देवीची जत्रा भरते. त्यावेळी दीडशे ते दोनशे बोकड देवीला नवसापोटी उघड्यावर बळी दिले जायचे. पण आता फक्त केवळ मानाचा एकच बोकड बळी दिला जातो.

- Advertisement -

तेवढ्यात आम्ही उभे होतो तिथून दहा ते बारा वर्षांच्या दोन मुली हातात टमरेल घेऊन गावाबाहेर शौचालयाला जाताना दिसल्या. मग सरपंचांना मी म्हणालो की, गावात लोकांनी घरोघरी शौचालय बांधले नाहीत का? तेव्हा सरपंच म्हणाले की, घरोघर संडास बांधलेले आहेत, पण हे लोक त्या संडासचा वापर करीत नाहीत, त्याला आपण काय करणार ?

पुढे ते म्हणाले, गावात कुणालाच दारूचे व्यसन नाही. रात्री अपरात्री कुणी तरी एखादा, दुसरा पिऊन येत असेल. पण त्याचा गावाला काही त्रास नाही. बालविवाह तर अद्याप माझ्या पाहण्यात आले नाहीत. आजूबाजूच्या गावांत पुष्कळ अंधश्रद्धा आहेत. मात्र आमचे गाव पूर्णपणे धार्मिक आहे. त्यामुळे अंधश्रद्धा हा विषयच गावात नाही. गावात दोन-तीन अध्यात्मिक संप्रदाय आहेत. त्यांच्या नियमाप्रमाणे ते अध्यात्म करतात. थोडक्यात, गावात सर्व आलबेल असल्याचे सरपंचांचे म्हणणे होते. मीही जास्त ताणले नाही. पुढे जाऊन सरपंच म्हणाले की, आजूबाजूच्या खेड्यात एखाद्या मोठ्या कीर्तनकार बुवाचे कीर्तन, प्रवचन असले तर गावातील लोक तिकडे जातात. ह्या मोठ्या कीर्तनकार बुवांची कीर्तनाची बिदागी एक लाखाच्या आसपास असते. एवढी मोठी रक्कम आमच्या गावाला परवडणारी नाही.

म्हणून आम्ही मोठ्या कीर्तनकार बुवांना गावात आणू शकत नाही. तेवढ्यात तिथे उभा असलेला एक तरुण म्हणाला, मागे एकदा एक मोठे कीर्तनकार बुवा त्यांच्या कीर्तनात लोकांना म्हणाले होते की , कोरोणाची लस मी घेतली नाही, मात्र तेच कीर्तनकार बुवा काही दिवसानंतर त्यांच्या कीर्तनात लोकांना सांगू लागले की, कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्या. त्या तरुणाच्या ह्या बोलण्यावर सर्वजण मोठ्याने हसले. अनेक गाव-खेड्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात असेच प्रश्न दिसून येतात. या सर्व प्रश्नांची हळूहळू सोडवणूक करण्यासाठी आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी, म्हणजेच स्वयंपूर्ण, स्वावलंबी खेड्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्या त्या विषयातील तज्ञ मंडळींनी जाणीवपूर्वक त्या त्या गावातील गावकर्‍यांमध्ये प्रत्यक्ष जाणे आवश्यक आहे. त्यांना समजून घेणे, त्यांना समजावून सांगणे, आवश्यक आहे. आदर्श गाव म्हणजे काय असते,तेही प्रत्यक्ष इतर काही आदर्श गावभेटी घडवून आणणे शक्य आहे. आपण त्यांच्यासाठी मनापासून झटत आहोत, झटणार आहोत, असा विश्वास, अशी खात्री त्यांना आपल्या विचार-आचारातून द्यायला हवी. त्यामुळे फार मोठा फरक पडू शकतो.

आता प्रश्न उरतो की हे काम नक्की कुणी करायचे ? ही जबाबदारी जाणीवपूर्वक घेऊन, ती काटेकोरपणे कोण पार पाडणार ? त्यासाठी मला काही पर्याय सुचतात ते असे…..

एक….गावासाठी कार्यरत असलेले आणि आपले गाव म्हणून तेथेच वास्तव्यास राहणारे असे, सर्व शासकीय कर्मचार्‍यांनी ठरवले तर हे काम ते काही अंशी करू शकतात.

दोन….. ज्यांना खरोखर ग्रामीण समस्यांची जाण आहे आणि त्या सोडवण्यासाठीचे शास्त्रीय ज्ञान आणि तळमळ आहे, असे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रामाणिक नेते, कार्यकर्ते हे गावातील नागरिकांना एकत्र आणून, मोठा बदल घडवून आणू शकतात.

तीन…. गावातील महत्वाच्या प्रमुख, प्रभावी समस्या शोधून, त्याच्यावर सर्वसमावेशक उपाय आणि मार्गदर्शन, प्रसारमाध्यमे मोलाची भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे एकाच वेळी व्यापक प्रमाणावर जनजागृती होण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत मिळू शकते.

चार…..त्या त्या गावातून नोकरी-व्यवसायासाठी बाहेरगावी गेलेले आणि तिकडेच स्थिरस्थावर झालेले आणि गावासाठी शक्य तेवढा वेळ, श्रम, पैसा देऊ शकणारे अशी काही माणसं, गावाच्या बांधिलकीच्या भावनेतून मोठे योगदान देऊ शकतात.

पाच– प्रत्येक गावातील महत्वाच्या आणि प्रमुख अडचणी, समस्या यांचे सूक्ष्म सर्वेक्षण, विश्लेषण, निष्कर्ष, उपाययोजना असे शास्त्रीय संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठातील अनेक विद्यार्थी, विद्वान व्यक्ती यांनी जाणिवपूर्वक सहभागी होणे आवश्यक आहे.

वरील सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न करण्याचे ठरवले तरी, अशी अनेक खेडी खर्‍या अर्थाने स्वावलंबी होण्याकडे वाटचाल सुरू करतील. भारत हा खेड्यांचा देश आहे आणि या खेड्यांना आणि त्यातील माणसांना खर्‍या स्वातंत्र्याचा अनुभव द्यायचा असेल तर, भारतीय स्वातंत्र्याच्या सद्यस्थितीत चालू असलेल्या अमृतमहोत्सवी वर्षात, असे सर्व प्रयत्न आपण सर्वांनी करायला काय हरकत आहे ? एक जानेवारी दोन हजार बावीसपासून आपण हा संकल्प सोडू या !!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -