घरफिचर्ससारांशबीटीएसचं सरप्राईज !

बीटीएसचं सरप्राईज !

Subscribe

दक्षिण कोरियाचा सुप्रसिद्ध कोरियन पॉप बॅण्ड बीटीएस संपूर्ण विश्वात सर्वाधिक प्रसिद्ध मानला जातो. भारतातही या बॅण्डचे फॅन फॉलोअर्स प्रचंड प्रमाणात आहेत. कोविडच्या बिकट काळानंतर आता भारतातील तरुणाईला थिरकवण्यासाठी बीटीएसचे भारतात शो होणार असल्याची बातमी इंटरनेटवर आली आणि या सरप्राईजनं कोट्यवधी तरुणाईची धडकन अक्षरश: वाढली. काही दिवसांपूर्वीच बीटीएसने भारतीय चाहत्यांशी संवाद साधला आणि हिंदीमध्ये काही शब्द बोलण्याचाही प्रयत्न केला. भारतातील बीटीएस आर्मी अनेक वर्षांपासून भारतात त्यांचे थेट कामगिरी पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. बीटीएसच्या दुसर्‍या वर्ल्ड टूरमध्ये त्यांनी भारताचे नामोल्लेख केल्याने त्यांच्या आगमनाकडे आता आपली तरुणाई आतुरतेने वाट बघत आहेत.

संगीत लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांना आवडते. संगीत हे कुठे आनंद द्विगुणीत करायचे काम करते तर कुठे जखमांवर हळुवार फुंकर मारायचे काम करते! कधी कधी तर शस्त्रासारखे मनात आत्मविश्वासही निर्माण करते. संगीताचं आणि आपलं अतूट नातं आहे. संगीत हे भावनांना शब्द देण्याचे काम करते! तुम्हाला आठवते का? ‘गंगम स्टाईल’ गाणं आणि त्या गाण्यातील ‘हूक स्टेप!’ 2013 साली रिलीज झालेल्या या गाण्याने अख्ख्या जगाला वेड लावलं होतं. फूटबॉलपटू, क्रिकेटर, न्यूज रूम लहान मुले, कॉलेजमधील तरुणाई सर्वांना या गाण्याने चालीवर थिरकवले आणि तेव्हापासूनच संपूर्ण जगात हळूहळू केपॉपची लाट पसरायला सुरुवात झाली.

त्याच माध्यमातून कोरियन संस्कृती जगाला अवगत होत चालली आहे. त्यांच्या गाण्यांची लय, ताल, नृत्य, मेकअप, ड्रेस सेन्स या गोष्टी तरूणांना आवडू लागले आहेत. दुर्दैवाने मुलांच्या पालकांना बीटीएसविषयी फारसे माहीत नसल्याने मुलं सातत्यानं बीटीएस बघतात- ऐकतात हे त्यांना सहजासहजी रुचत नाही. किंबहुना काही कुटुंबात तर यावरुन वादही होतात. बीटीएसचे कलाकार पुरुष आहेत की स्त्री हेच कळत नाही? त्यांच्यात बाईकीपणा दिसतो? त्यांना दाढी-मिशाच नाही यांसारखी टिपण्णी त्यांच्यावर सातत्याने होत असते. परंतु बीटीएस ‘क्या चीज है’ हे त्यांच्या फॅन फॉलोअर्सलाच जास्त माहिती.

- Advertisement -

भारतात तर कोरोनाच्या दोन-अडीच वर्षात के कल्चरची क्रेझ खूपच वाढली आहे. के कल्चरमधील गाण्यात असलेले संदेश जसे की जुन्या रुढी-परंपरांना मात देणे, स्त्रियांचे सबलीकरण, आत्महत्या अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर ते त्यांच्या नाट्य आणि गाण्यातून प्रकाश टाकतात. त्यांची गाणं सादर करण्याची शैली विनोदातून वास्तव दर्शवणारी आहे. या केपॉप म्युझिक इंडस्ट्रीला 1990 च्या सुमारास चालना मिळाली. सुरुवातीच्या काळात ते फोल्क आणि बॅलेडचा वापर करीत असे. पण नंतर त्याला पॉप संगीताचा स्पर्श देत संगीत क्षेत्रात एक नवीन क्रेझ निर्माण केली.

‘i know’ हे प्रसिद्ध गाणं त्याकाळी खूप गाजलं होतं. या गाण्याच्या क्रेझमुळे कोरियात म्युझिक रेकॉर्डिंग कंपन्या सुरू झाल्या. एलजी, सॅमसंग, लोटे या कंपन्यांनी यात पुढाकार घेतला. त्यामुळे नवीन रोजगार निर्मितीस सुरुवात झाली. तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. या संपूर्ण काळाला‘केपॉप फर्स्ट जनरेशन’ असे म्हटले जाते. या काळानंतर कोरियन संगीत-विश्वात विविध बदल झाले. ज्या तरुणांनी प्रशिक्षण पूर्ण केले त्यांनी ‘एस.एम. एंटरटेनमेंट’, ‘बिग हिट’, ‘जे. वाय.पी.’ अशा अनेक नामांकित कंपन्या सुरू केल्या. ‘बीओए ’ नावाचा मुलींचा ग्रुप निर्माण झाला. त्यांना ‘ऐजेस स्टार’ असे टायटल मिळाले. त्यानंतर के इंडस्ट्रीने आपली व्याप्ती वाढवली. जपान, चीन, थायलंड, फिलिपाईन्स, अमेरिका, भारत या देशातील कलाकारांना सहभागी केले. यानंतर शाईनी, गर्ल्स जनरेशन, सुपर ज्युनियर, बिग बँग असे बँड उदयास आले. या ग्रुपने रूढीवादी परंपरा व त्या मानसिकतेच्या विचारांचा धिक्कार केला. त्यांच्या गाण्यातून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला.

- Advertisement -

या बँडची लोकप्रियता जगभर इतकी वाढली की प्रत्येक देशात त्यांना सण उत्सवांमध्ये वादन करण्यासाठी आमंत्रित करण्यास सुरुवात झाली. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ व्हायला लागला. त्यात विशेष म्हणजे एक्सो या ग्रुपला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. भारतात तर याच ग्रुपच्या गाण्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत आहे. सगळ्यांच्या ओठावर याच ग्रुपची गाणी असतात. केपॉप संगीत क्षेत्रातील प्रत्येक कलावंताला त्यांचे चाहते विशेष ‘आयडॉल’ म्हणून संबोधतात. त्यांचे जागतिक पातळीवर असलेलं आकर्षण, काहीतरी कल्पक कलाकृती तयार करण्याची प्रतिभा, कौशल्य या विशेषत्वाने प्रत्येक कलाकार हा आदर्शवत भासतो! के कल्चरमधील प्रत्येक बँड आणि त्यांचे चाहते यांच्यामध्ये खास नाते जुळले आहे. या चाहत्यांनाही ‘विशेष लेबल’ आहे. जसे एक्स्सो बँडचे चाहते ‘एक्ससो एल’, बीटीएसचे चाहते ‘आर्मी ’, ‘बिग बँग’ चे चाहते ‘वीआयपी ’ अशी खास ‘लेबल’ लागली आहेत.

उत्तर-दक्षिण कोरियातील राजनैतिक संबंध हे जगजाहीर आहेच! उत्तर कोरियातील नागरिकांवर असलेले अगणित कठोर निर्बंध त्यांचा श्वास कोंडण्यासाठी पावलोपावली पसरलेले आहेत. पण संगीत हे असे क्षेत्र आहे की ज्याचे वारे जगातील कोणत्याही दिशेने सहज वाहतात आणि त्या वार्‍यावर कोणताही सजीव प्राणी सहजरीत्या स्वार होतो. रेड वेलवेट नावाच्या ग्रुपने ही किमया साधली आणि उत्तर कोरियात परफॉर्मन्स करणारा पहिला ग्रुप ठरला. अर्थात उत्तर कोरियाच्या नागरिकांना मनमुराद दाद द्यायला बंदी होतीच! पण या केपॉपने वेड लावलंच आणि नागरिकांना (मनातंच) डोलायला भाग पाडलं !

तरुणाईला बीटीएस काय आहे हे सांगण्याची अजिबातच गरज नाही. पण वयस्करांना याविषयी फारशी माहिती नाही. खरे तर, बीटीएस हा ग्रुप संपूर्ण जगात यांच्या गाण्यांनी सर्वांच्या मनावर राज्य करीत आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जाए-इन भारत दौर्‍यावर असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात बीटीएस आणि ‘गंगम स्टाईल’ याबद्दल आवर्जून उल्लेख केला होता. बीटीएसचे भारतीय चाहते असलेले ‘आर्मी’ मध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली. जरी बीटीएसने भारतात भेट दिली नसली, तरी ते भारतीय मनावर अधिराज्य गाजवत आहे.

नुकत्याच झालेल्या ‘ग्रॅमी ’ पुरस्कार सोहळ्यात ए.आर.रेहमान आणि त्यांचा मुलगा अमीन हे बीटीएसला भेटले आणि त्यांच्याबरोबर सोशल मीडियावर पोस्ट टाकली तेव्हा ते नक्कीच भारताला भेट देतील, अशी आशा भारतीय चाहत्यांमध्ये निर्माण झाली. भारतात दक्षिण कोरियन संगीताबद्दल आकर्षण आहे. तसेच तेथील विद्यार्थ्यांमध्ये देखील भारताबद्दल खूप आकर्षण असते. तेथील विद्यार्थी आपल्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय संस्कृतीबाबत त्यांच्या देशात प्रचार करतात.

–नीता कदम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -