घरफिचर्ससारांशअमृतकुंभात जातीयतेचे विष !

अमृतकुंभात जातीयतेचे विष !

Subscribe

प्रिय इंद्रकुमार,

तुला हे पत्र लिहिताना मन अजूनही थरथरतंय. तुझ्या हत्येने मन विषन्न झाले आहे. तुझ्या झालेल्या मृत्यूने आम्ही अजूनही माणूस झालो नाही याची खंत आहे. मनात सतत सल सलते आहे आणि मनात संतापाचा आंगडोंब उसळतो आहे. वेदनेची ही बेडी माणूस म्हणून अस्वस्थ करत जाते. जेथून वाईटाचा नाश करायचा आहे आणि उत्तमतेचा विचार पेरायचा आहे. अज्ञानाचा अंधकार नष्ट करत ज्ञानाच्या प्रकाशाने अवघे जग उजळून टाकायचे आहे. ज्यांनी पुरोगामित्वाची मशाल पेटवायची तेच प्रतिगामित्वाची वाट चालणे पसंत करता आहेत. त्यांनीच तुझा घात केला. सुधारणेचा विचार मस्तकी घ्यायचे त्यांनीच आपल्या मागासपणाचे दर्शन घडविले..ज्यांनी माणसा माणसांत प्रेमाचा पुल बांधायच्या त्या शाळांमध्ये जातीयतेच्या भिंती उंचावल्याचे दिसत आहे. स्वातंत्र्यानंतर सारेच कसे बदलले.

- Advertisement -

स्वातंत्र्याचा सूर्य जाती, धर्माच्या भिंतीतील काळोखाला दूर सारत मनामनात चैतन्याचा प्रकाश पेरेल असे वाटत असताना अजूनही मनातील काळोख संपलेला नाही याचेच दर्शन घडविले तुझ्या मृत्यूने. कदाचित तुझ्या मृत्यूने दोन तीन दिवस वर्तमानपत्राचे रकाने भरतील. राजकारणी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आपली पोळी भाजून घेतील. मात्र तुझ्या मृत्यूने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात अजूनही आपल्याला जातीपाती आणि धर्माच्या घट्ट भिंती कोसळण्यासाठी नव्या विचारांची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. आम्ही फक्त साक्षर झालो अजूनही सुशिक्षित होण्याची नितांत गरज अधोरेखित झाली. पदव्यांची भेंडोळी हाती आली, पण विचाराची दृष्टी शिक्षणातून पेरायचे राहून गेले. कागदावरील निर्जीव अक्षरे वाचता येऊ लागली..पण माणसांच्या मनातील भावना जाणून घेण्यात फारसे यश मिळू शकले नाही. आता आमचीच आम्हाला लाज वाटू लागली आहे. आपण माणूस होणार कधी, असा प्रश्न मनाला पडत जातो आणि सतत मनाला बोचत जातो. तुझ्या मृत्यूने आम्हाला आमची जागा दाखविली हे खरे..

तुझ्या मृत्यूची बातमी आली तेव्हा आम्ही मोठ्या दिमाखात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत होतो. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तेव्हा आम्हाला आपण माणूस झालो याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला. भारतमातेच्या पायातील गुलामीच्या शृखंला तुटल्या तेव्हाच आमच्या मस्तकाला लागलेल्या जळमटांना दूर सारत नवी वाट उभी राहील असे वाटले होते. जीवन लख्ख प्रकाशाने उजळून निघेल असे वाटत असतानाच अंधकारच दाटून येत असल्याचा अनुभव मिळत गेला. स्वातंत्र्याचा ध्वज उंच जात असताना देशात धर्माधर्मात लढाई सुरू होती. गांधी नावाचा माणूस त्या भेदाच्या आगी विझवण्यासाठी वणवण करत होता. भेदाच्या भिंती संपविण्यासाठी त्यांनी अखंड जीवनभर प्रयत्न केला..त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी पेरलेल्या विचाराने तरी भेद संपतील असे वाटले होते. पण छे तुझ्या मृत्यूने अजूनही बरेच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सिध्द केले. माणसांची मनं साफ करण्याची गरजही अधोरेखित झाली.

- Advertisement -

तुझा मृत्यू झाला तेव्हा आपले स्वातंत्र्य अमृत महोत्सवात पोहचले होते. त्यामुळे अधिक चिंता वाटून जाते. ७५ वर्षात आम्ही राज्यघटना स्वीकारली. कायद्याचे राज्य आणले. गावागावात शिक्षणाची गंगा पोहचविण्याचा प्रयत्न केला. शिक्षण हे विचार परिवर्तनाचा मार्ग आहे असे सांगितले जात असताना शिक्षणातील माणसंही अजून बदलली नाही हे तुझ्या मृत्यूने सिध्द केले. जातीपातीच्या भिंती अजूनही संपुष्टात आल्या नाहीत. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या समतेचा अधिकार कागदावर ठसठसीत उठून दिसतो आहे. समतेचा घोषा लावला जातो आहे. राज्यघटनेने दिलेले अधिकार आम्हाला समतेच्या न्यायाने सर्वांना उपभोगता येतील, असा अधिकार दिला जातो आहे. कधीकाळी दलितांना जगण्याचा अधिकारच नाकारला जात होता. त्यांना माणूस म्हणून जगणेच घडत नव्हते. तेव्हा माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी लढाई उभी राहिली. आज तू केवळ संचालक, शिक्षकांच्या माठातील पाणी प्यायलास म्हणून तुला मारहाण झाली..आमच्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाने चवदार तळ्याचा सत्याग्रह करत पाण्याचा हक्क मिळवून दिला. त्यांनाही शिक्षणाच्या वाटा बंद होत्या. तेव्हा त्यांनी जे सोसले ते वाचले होते..तेव्हा डोळ्यात अश्रू यायचे..पण तुझ्या वाट्याला आलेल्या ताज्या दुःखाने त्यांना किती सोसावे लागले असेल याचा अंदाज आला की अंगावर काटे उभे राहातात.

महामानवाने देशातील जातीयता संपवावी म्हणून किती अट्टहास केला होता ना..? महात्मा गांधी नावाच्या महामानवाने आपल्या आश्रमात दलित कुटुंब ठेवले म्हणून त्यांच्या आश्रमावर बहिष्कार टाकण्याबरोबर जे देणगी देणारे दाते होते त्यांनी आपण देणगी देणार नाही असे सुनावले होते ..मात्र त्यांनी देणगी दिली नाही तरी चालेल, पण त्या कुटुंबाला मी आश्रमातून काढणार नाही असे महात्मा गांधी यांनी बजावले होते. दलित असले तरी ती माणसं आहेत हे लक्षात घेणार की नाही..? या देशाला स्वातंत्र्य मिळवताना स्वातंत्र्याच्या लढाई बरोबरच सामाजिक परिवर्तनाची लढाईदेखील लढण्याचा विचार केला जात होता. मात्र आपण स्वातंत्र मिळवत इंग्रजांना देशाबाहेर हाकलण्यात यश मिळविले असले तरी, सामाजिक परिवर्तनाची वाट चालण्यात आपण यशस्वी झालेलो नाही. हे सातत्याने समोर आले आहे. या देशासाठी दलितांनी दिलेला लढादेखील विसरता येणार नाही..पण त्यांना इतिहासात जे भोगावे लागले ते वर्तमानात भोगावे लागू नये म्हणून अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यासाठी आपली मने स्वच्छ व्हावीत.

माणसांच्या मस्तकात शहाणपण भरले जावे. विवेकाची वाट चालावी याकरीता शिक्षणाचा विचार मांडला गेला. शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा याकरिता शंभर वर्ष लढाई केली गेली. तेव्हा कोठे शिक्षणाचा हक्क मिळाला. आज हक्क मिळाला तरी शिक्षणातून जे पेरणे अपेक्षित होते..ते पेरले गेले नाही. शिक्षणातून गाभाघटक, जीवन मूल्यांचा विचार रूजण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र वाढत्या मार्क्सवादी विचारांनी गुणवादी शिक्षण मागे पडले. शिक्षणातून मस्तके निर्मळ होण्याची गरज असताना, शिक्षणाने अधिक समृध्दतेची वाट चालण्याची गरज असताना, विचाराची उंची उंचावणे आणि विस्तारण्याची गरज असताना आपण अधिक संकुचित होत चाललो असल्याच्या घटना भोवताली घडताना आपलीच आपल्याला लाज वाटू लागली आहे.

इंद्रकुमार तू माणूस आहे याची जाणीव करून देण्यात आमचे शिक्षण अपयशी ठरले आहे. ज्यांनी त्या जाणिवा विकसित करायच्या त्यांच्या मस्तकात जाती पातीचे आणि धर्मभेदाची किड घट्ट असेल तर ते काय पेरणार…? आजही आम्ही समाजात कायद्याच्या भीतीने जाती बद्दल बोलत नाही, पण मनातील भेदाची घाण मात्र नष्ट होऊ शकली नाही हे पुन्हा सिध्द झाले..अक्षराची साक्षरता येत असताना आमच्याच माणूसपणाची साक्षरता का येत नाही हा प्रश्न पुन्हा पुन्हा छळत राहतो. भारताचे भविष्य चार भिंतीच्या आत घडते, असे कोठारी आयोगाने म्हटले होते..ते जर खरे असेल तर आमचे भविष्य देखील अधिक अंधारमय असणार नाही ना, याची भीती वाटत जाते.

शिक्षक हे राष्ट्र निर्माते असतात..ते समाज घडवितात..ते वाईट पंरपरांच्या विरोधात उभे राहत समाजात शहाणपण पेरतात..ते द्रष्टे असतात..ते प्रकाश पेरत असतात..ते प्रेरक असतात..त्यांची मने निर्मळ असतात..त्यांची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..या विचारावर निष्ठा असते..ते महापुरूषांच्या वाटेने उद्याच्या नागरिकांना घेऊन जाण्यासाठी इतिहासाची पेरणी करत भविष्याची दृष्टी पेरत असतात..असं बरंच काही वाचलं होतं. मात्र तुझ्या मृत्यूने आम्हाला आत्मभान दिले..तुझ्या मृत्यूने भेदाभेदाचा लढा अजून संपला नाही..अजूनही बरेच काही करावे लागेल..आज तुला श्रध्दांजली वाहताना आमचीच आम्हाला लाज वाटते आहे..तु लहान असलास तरी आम्हाला माफ करशील असी अपेक्षा आहे..तुझ्या जाण्यानंतर अनेक मोहिमांप्रमाणे मने स्वच्छ करण्याची मोहीम सुरू करता येईल का? या देशातील दलितांना माणूस म्हणून जगता येईल का? भेदाभेदाचे अमंगळ संपुष्टात आणण्यासाठी शिक्षण शहाणपण पेरेल का ? आम्ही समाजातील घटक असलो तरी विचाराने तरी आम्ही महापुरूषाची वाट चालू का ? असे प्रश्न मनात आहे..पाहू या प्रयत्न करून …अन्यथा पुन्हा आणखी इंद्रकुमार आहेच…

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -