घरफिचर्सगायक प्रशांत, नायक प्रशांत!

गायक प्रशांत, नायक प्रशांत!

Subscribe

संगीत नाटक ही आता एक पुरातन बाब झाली आहे. टीव्ही रंगीत होईपर्यंत हे संगीत नाटक कुठेतरी अंधुक अंधुक लुकलुकायचं. पण टीव्हीवर चॅनेल्सचं जंजाळ आलं आणि विज्ञानाच्या प्रगतीचं प्रकरण व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्याही पलिकडे गेलं तसं तर संगीत नाटक जुन्या टाइपरायटरसारखं अडगळीत गेलं. आज नाट्यसंगीत अधुनमधून कुठेतरी वाजतं; पण संगीत नाटकाचा आवाज मात्र काळाच्या पोटात गुडूप झाला आहे. असो, पण मराठी नाटकातलं गाणं मात्र आजही तरलं आहे हे विशेष. अर्थात, ह्याचं जास्तीत जास्त श्रेय जातं ते प्रशांत दामले नावाच्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्याला.

प्रशांत दामले त्याच्या त्या खास शैलीतल्या अभिनयाबद्दल प्रसिध्द असेलही; पण त्याच्या नाटकाला त्याच्यासाठी येणारा बहुतांश प्रेक्षक हा त्याच्याकडून त्याच्या गाण्याचीही अपेक्षा करत असतो…आणि खुद्द प्रशांत दामलेही त्याच्या गाण्यासाठी जीव टाकणार्‍या प्रेक्षकांना नाराज करत नाही. ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे त्याने गायलेलं गाणं तर त्याच्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या अंगाखाद्यावर खेळणारी सुखाची झुळूकच.. प्रशांतने गायलेल्या इतर कोणत्याही गाण्याची फर्माईश होत नसेल इतकी फर्माईश त्याला लोकांकडून ह्या गाण्यासाठी होत असते…आणि प्रशांतही हे गाणं त्यातल्या खेळकर वैशिष्ठ्यांनिशी तितक्याच खेळकरपणे गाऊन जातो. गाणं संपताना जेव्हा ‘मला सांगा’ असं म्हणून ते गाणं जेव्हा तो थांबवतो तेव्हा प्रेक्षकांमधून त्याच्या त्या गाण्यासाठी क्षणार्धात एकच सरसरून टाळी येते. हे गाणं प्रशांतच्या मिठ्ठास आवाजात थिएटरमधलं अवघं वातावरण मिठ्ठास करून टाकतं तेव्हा वन्समोअर आल्याशिवाय रहात नाही ही ह्या गाण्याची खासियत आहे.

‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणं जरी प्रशांतची ओळख ठरलेलं असलं तरी प्रशांतची आणखीही काही गाणी अशी आहेत की ज्यात प्रशांत हा गायक आणि नायक म्हणून लोकांच्या आजही लक्षात राहिलेला आहे. ‘तू चांद जीवाचा हासरा’ हे त्यापैकीच एक गोड आणि निरागस गाणं. प्रशांतने त्यातल्या तानामुरक्यांनिशी इतक्या सुरेल ढंगात ते गायलं आहे की प्रशांतला असलेलं गाण्याचं अंग त्या गाण्यात ठळकपणे दिसतं. ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं’ ह्या गाण्याच्या तुलनेत ‘तू चांद जीवाचा हासरा’ हे गाणं लोकप्रियतेच्या दृष्टीकोनातून पिछाडीवर पडलं असेल; पण हे गाणंही ऐकताना प्रशांतच्या आवाजातला गोडवा मनात साठून रहातो. प्रशांतने गायलेल्या अशाच गाण्यांपैकी आणखी एक सुरेल लोकगीत आहे ते म्हणजे ‘ह्या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोवला, ह्या संतांचा, संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला.’ खरंतर ह्या लोकगीतासाठीही प्रशांतमधला गायक पंधरा-वीस वर्षांपूर्वी ओळखला जात होता; पण काळाच्या ओघात काही पार मागे पडतं तसं प्रशांतने गायलेल्या ह्या गाण्याचं झालं आहे. एरव्ही ह्या गाण्यातलं ते सात्विक वातावरण प्रशांतने इतकं हुबेहूब उभं केलं आहे की गाणं ऐकणार्‍याला आपणही एखाद्या दिंडीत सामील झाल्यासारखं वाटत रहातं.

- Advertisement -

प्रशांतच्या गाण्याचा एक पैलू असा आहे की प्रशांत नुसतंच कोरडंठाक गाणं गात नाही तर आजच्या चापलूस भाषेत ज्याला परफॉर्मन्स म्हणतात तसा त्यात त्याचा सहजसोपा, हलकाफुलका अभिनयही असतो. हा अभिनय हे त्याच्या गाण्याचं जन्मजात अंग आहे. म्हणूनच त्याच्या कोणत्याही गाण्याला एक वेगळी खुमारी येते. आज नाट्यसंगीत राहिलेलं नाही. पण गाण्याचा दागिना लेवून आलेल्या प्रशांत दामलेसारख्या एका अभिनेत्यामुळे मराठी रंगमंचावरचं गाणं आजही नक्कीच सजूनधजून वावरतं आहे, छान बागडतं आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -