घरफिचर्समाध्यमांचा संक्रमणकाळ!

माध्यमांचा संक्रमणकाळ!

Subscribe

मुख्य प्रवाहातील ‘न्यूज मीडिया’मध्ये चालत असलेल्या खर्‍या - खोट्या, बर्‍या-वाईट उलथापालथींमुळं पत्रकारिता, तिची मुल्ये, वार्तांकनाच्या पद्धती, त्यातील पत्रकार या सर्व बाबी अधून-मधून सर्वांच्या हितसंबंधानुसार चर्चेच्या विषय ठरत आहेत.

मुख्य प्रवाहातील ‘न्यूज मीडिया’मध्ये चालत असलेल्या खर्‍या – खोट्या, बर्‍या-वाईट उलथापालथींमुळं पत्रकारिता, तिची मुल्ये, वार्तांकनाच्या पद्धती, त्यातील पत्रकार या सर्व बाबी अधून-मधून सर्वांच्या हितसंबंधानुसार चर्चेच्या विषय ठरत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये पत्रकारितेतील सुप्त प्रवाह अधिक प्रकर्षानं पुढं येतात. वर्चस्ववादी व्यवस्थेनं सांगितलेलं निष्पक्ष पत्रकारितेचं तत्व घेऊन भूमिकाहीन राहायचं की संविधानिक तत्व हीच भूमिका समजून पत्रकारिता करायची असा हा काळ.

प्रत्येक क्षेत्रामध्ये तत्कालिक परिस्थितीनुसार काही फेजेस तयार होतात. बदलत्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा त्या-त्या क्षेत्रांवर परिणाम होत असतो. जागतिकीकरणाच्या वाढीनं टोक गाठलेलं असताना आपल्या अवतीभवती दिसणारा माध्यमांचा परिणाम हा प्रादेशिक आणि जागतिक मर्यादांपलीकडचा आहे. माध्यमांच्या चित्र आणि चारित्र्यावर परिणाम घडवून आणणारे अनेक घटक आता प्रकर्षानं वाढू लागले आहेत.

- Advertisement -

पत्रकारिता किंवा माध्यमं त्याला अपवाद नाहीत. सध्याच्या माध्यमांकडं आणि त्यात घडणार्‍या घडामोडींकडं पाहून ‘एन्ड ऑफ जर्नालिझम’च्या हॅशटॅगनं समाजमाध्यमांमध्ये जम बसवला आहे. माध्यमांचा विद्यार्थी म्हणून माध्यमव्यवस्थेकडं वैज्ञानिक आणि डोळसपणे पाहताना सध्याच्या परिस्थितीमध्ये निराश होऊन त्याला ‘एन्ड ऑफ जर्नालिझम’ म्हणणं जरा आत्मघातकी वाटतं. परिस्थिती माध्यमव्यवस्थेचं पुनरावलोकन करायला भाग पाडणारी आहे का? तर नक्कीच हो. पण त्याचा अर्थ पत्रकारितेचा मृत्यू झाला असा नाही. त्यातल्या त्यात जर म्हणायचं असेल तर ‘डेथ ऑफ जर्नालिस्ट’ म्हणणं तरी किमान सध्याच्या परिस्थितीला साजेसं ठरेल. तुमच्या माझ्यातला पत्रकार मरतोय. पत्रकारिता नाही. पत्रकारिता टिकून राहिलच. तिच्यातील काही चांगले ‘जीन्स’ सायलेंट होतील एवढंच.

मुळात ‘पत्रकार’ हे प्रकरण त्याच्या मुळांच्या शोधापासूनच वादात सापडलेलं आहे. त्यात पहिला पत्रकार ‘नारद की न्हावी’ असाही एक वाद (?) अस्तित्वात आहे. ‘आता तर काय समाजमाध्यमांमुळं सगळेच वार्ताहर झालेत’ अशी मांडणी करणारा एक प्रवाहदेखील प्रस्थापित झालाय. त्यातून निर्माण झालेल्या ‘फेक न्यूज’ या राक्षसाला कसं सामोरं जायचं? या प्रश्नाचं उत्तर आता माध्यमकर्मींसह व्हॉट्सअ‍ॅप, युट्युब आणि फेसबुकसारख्या कंपन्याही शोधताहेत.

- Advertisement -

पत्रकारिता, माध्यमं, त्याच्या संस्थात्मक रचना यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. हितसंबंधांची मुळं कुठंपर्यंत पोहचली आहेत हे समजण्यासाठी ‘कोब्रा पोस्ट’ या माध्यमसंस्थेनं केलेलं ‘ऑपरेशन १३६’ हे स्टिंग पुरेसं आहेच. तर दुसरीकडं ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर’ या जागतिक संघटनेनं २०१८ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘वर्ल्ड प्रेस इंडेक्स’मधील भारताचं १३९ वं स्थानसुद्धा काळजीत टाकणारं आहे.

माध्यमांच्या संख्यात्मक वाढीची संपृक्तावस्था गाठलेल्या भारतासारख्या लोकशाही देशात या व्यवसायाची गुणात्मक वाढ होण्यास सध्याची परिस्थिती पूरक आहे. ही गुणात्मक वाढ समांतर माध्यमांमध्ये होत असलेले प्रयोग, वार्तांकन आणि त्यातून निर्माण होणारा आशय पाहता लक्षात येऊ शकते. त्यात अनेक प्रयोग केले जात आहेत. हेच प्रयोग आणि हीच माध्यमं उद्याचे मुख्य प्रवाह असतील किंवा ते मुख्य प्रवाह बनले नाहीत तरीही इथली पत्रकारिता विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्यात त्यांचं लक्षणीय योगदान असेल.

दरम्यानच्या काळात आशय निर्मिती आणि मांडणीचे वेगळे पर्याय उदयाला येताहेत. पत्रकारिता मरत नाही तर ती उत्क्रांत होण्याचा पुढच्या टप्प्यावर पोहचत असते. तुमची तशी इच्छा असो वा नसो. म्हणजे काय, तर तांत्रिकदृष्ट्या हा काळ ‘माध्यमक्रांती’चा असला तरी आशयाच्या दृष्टीनं हा मोठ्या स्थित्यंतराचा काळ आहे. नवीन माध्यममूल्य, तत्व आणि नैतिकता जन्माला घालणारा हा काळ आहे. त्यामुळं प्रपोगंड्यातून निर्माण झालेल्या ‘एन्ड ऑफ आयडियालॉजी’च्या धर्तीवर ‘एन्ड ऑफ जर्नालिझम’ हा ट्रेंड प्रस्थापित करण्यात येतोय. त्यातून सगळ्या माध्यम व्यवस्थेला एका तराजूत तोलत जनमाणसाला जाणिवपूर्वक गोंधळात टाकण्याचाच हा भाग आहे.

मुळात सगळीकडं गोंधळाचं वातावरण असताना माध्यमांकडंही त्याच दृष्टीकोनातून पाहणं आत्मघातकी आहे. त्याविरूद्ध वाचक म्हणून माध्यमांतील बदलती राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरं चिकित्सक दृष्टीकोनातून पाहणं आणि समजून घेणं हे माध्यमांवर शेलकी टीका करण्याहून अधिक महत्त्वाचं आहे. त्यासाठी चिकित्सेचे नवे समकालीन आयाम निर्माण करणं आणि ते लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. कारण माध्यमातून आपल्याला मिळणारा आशय हा परिपूर्ण असणं, कोणत्याही अडथळ्यांशिवाय विश्वासार्ह पद्धतीने आपल्यापर्यंत पोहचणं हे मानवाधिकाराच्या चौकटीत येतं.

माध्यमातील स्थित्यंतर एका वाक्यात सांगायचं तर ‘रण’ या दुर्लक्षिलेल्या सिनेमातील एक वाक्य आठवतंय. अमिताभ बच्चनची भूमिका असलेला माध्यव्यवस्थेच्या हितसंबंधांवर आधारित ‘रण’ २०१० मध्ये आला होता. तो काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालतो. त्यात एका वृत्तवाहिनीचा चालक आणि मालक झालेल्या चुकीतून राजीनामा देतात. त्यातला एक डायलॉग आहे, ‘पूर्वी माध्यमं आणि पत्रकारांसाठी बातमीपर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणून पैशाचं महत्त्व होतं, आता त्यांच्यासाठी पैशापर्यंत पोचण्याचं साधन म्हणजे बातमी असं चित्र आहे.’ अर्थात, आजच्या वास्तवातही हे चित्र सार्वत्रिक नक्कीच नाही. माध्यमातून येणारा, तुम्ही पाहत, वाचत आणि ऐकत असलेला आशय चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी माध्यमातलं, विशेषत: वृत्तमाध्यमांतलं स्थित्यंतर जाणून घेणं अनिवार्य आहे.


– (लेखक माध्यम अभ्यासक आहेत)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -