घरफिचर्ससमाज माध्यमांतून सामाजिक क्रांती

समाज माध्यमांतून सामाजिक क्रांती

Subscribe

समाज माध्यमांची आणि त्याचा चांगला वापर करणार्‍यांची आज सामाजिक जाणिवेतून भाषा बदलत आहे. अर्थात चांगला वापर करणारा एक वर्ग उदयास येत आहे. ज्याला आपल्या प्रश्नांनी व समस्यांनी तसे करायला भाग पाडले. म्हणतात ना शिक्षणाने माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. अगदी याप्रमाणे सोशल मीडियावर प्रत्यक्ष असे शिक्षण दिले जात नाही. पण औपचारिक शिक्षणाचा थोड्या बहुत प्रमाणात चांगला वापर करण्याकडे युवा वर्ग आकर्षित होतोय. एक गोष्ट नक्की ती म्हणजे तंत्रज्ञान व युवकांकडे नवा शोध लावण्याची धमक असेल तर हातात चांगले पीक येते. या प्रकारचा फायदा सोशल मीडियाद्वारे युवकांनी करून घेतला तर आपल्या समस्या जगासमोर मांडता येतील आणि क्रियाशीलता वाढून एखाद्या क्रांतीचा जन्म होऊ शकतो.

‘दि वॉल स्ट्रीट जर्नल’ने भारतात फेसबुकचा वापर सत्ताधारी पक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. यावर विरोधकांनी लक्ष वेधले, फेसबुक नेमके कोणाचे..? जाहिरातदारांचे, सत्ताधार्‍यांचे की वापरणार्‍या ग्राहकांचे…? द्वेषात्मक संदेश पसरवून जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या अनेक पोस्ट/व्हिडिओ आपल्याला या पूर्वी पाहायला मिळत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून अशा पोस्ट टाकणार्‍या विरोधात फेसबुकने नियमावली नुसार पोस्ट काढून टाकल्या किंवा सदर व्यक्तीचे खाते बंद केलेले दिसते. पण काही प्रकरणात मात्र थेट भूमिका फेसबुक घेत नाही असे ‘दि वॉल स्ट्रीटचे’ म्हणणे आहे. यावरून सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतो की या दुजाभावाची दाद कोणाकडे मागायची..? सरसकट नियम सारखे नसतील तर संभ्रम निर्माण होत असतो. याचे उत्तर नेमलेली समिती किंवा फेसबुकचे सर्वेसर्वा देतीलच. तोपर्यंत आपण वाट पाहू. तसेही सत्ताधारी पक्षासोबत माध्यमांनी साटेलोटे करणे ही काही नवीन गोष्ट नाही. जिकडे वारे आहे तिकडे धाव घेणारी माध्यमे ही आपले अर्थकारण सांभाळण्याचा प्रयत्न करतात. आपण मात्र माध्यमांना आरसा म्हणून पाहतो, त्या पाठीमागचे राजकारण आपल्याला दिसत नाही. यातून आजचा सोशल मीडिया तरी कसा सुटेल. पण याकडे युवक कसा पाहतो यावर काही गोष्टी अवलंबून असतात.अशाच काही युवकांचे प्रश्न सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत त्याची चर्चा या लेखात आपण करूयात.

समाज माध्यमांची आणि त्याचा चांगला वापर करणार्‍यांची आज सामाजिक जाणिवेतून भाषा बदलत आहे. अर्थात चांगला वापर करणारा एक वर्ग उदयास येत आहे. ज्याला आपल्या प्रश्नांनी व समस्यांनी तसे करायला भाग पाडले. म्हणतात ना शिक्षणाने माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. अगदी याप्रमाणे सोशल मीडियावर प्रत्यक्ष असे शिक्षण दिले जात नाही. पण औपचारिक शिक्षणाचा थोड्या बहुत प्रमाणात चांगला वापर करण्याकडे युवा वर्ग आकर्षित होतोय. एक गोष्ट नक्की ती म्हणजे तंत्रज्ञान व युवकांकडे नवा शोध लावण्याची धमक असेल तर हातात चांगले पीक येते. अन्यथा सोशल मीडियाचे परिणाम आपण बघतच आहोत. कोविड-19 या विषाणूने भारतात आगमन केले आणि सरकारने टाळेबंदी लावली. यामुळे ज्यांच्या हातात स्मार्टफोन आहे त्या सर्वांना ऑनलाईन जगण्याची मुभा मिळाली. यापूर्वी ऑनलाइन राहणार्‍यांची संख्या कमी नव्हती, पण अलीकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच शाळा महाविद्यालय व ऑफिसच्या कामानिमित्त ऑनलाईन राहण्याची सवय जडली आहे.

- Advertisement -

वर उल्लेख केला त्याप्रमाणे बहुतांश जण आपल्या स्मार्टफोनमध्ये सोशल मीडियाच्या युगात काय चालले आहे. आणि काय नाही..हे पाहत असतात. संबंधित लोक दखलसुद्धा घेतात. सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पोस्ट व्हायरल केल्या जातात. (तसे हॅशटॅग वापरले जातात.) या सर्व गोष्टींचा चांगला फायदा संशोधक विद्यार्थी घेणार नाहीत असे होणारच नाही…. महाराष्ट्रात सध्या शिक्षण क्षेत्रातील चालणार्‍या भोंगळ कारभाराविरुद्ध आणि प्राध्यापक भरती संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नेट-सेट, पीएचडी पात्रताधारक संशोधक विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्र राज्य प्राध्यापक भरती संघर्ष कृती समितीची स्थापना करून प्राध्यापक भरती लोकसेवा आयोगामार्फतच असा हॅशटॅग वापरून सोशल मीडियाद्वारे चळवळ उभारली आहे.

महाराष्ट्रात महापुरुषांच्या नावाने असलेली शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आज संस्थाचालकांच्या हातात असून शिक्षक आणि प्राध्यापक भरतीसाठी लाखो रुपये उमेदवारांकडून वसूल करण्यात येतात. एखादा उमेदवार पात्रताधारक असूनही त्याची आर्थिक बाजू जर भक्कम नसेल तर त्याला डावलण्यात येते. यामुळे शिक्षण क्षेत्रात युवकांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तासिका तत्त्वावर काम करणार्‍या प्राध्यापकांना उदरनिर्वाहासाठी चहाची हॉटेल टाकावी लागत आहे. काही लोक तर आत्महत्या करत आहेत. युवकांच्या या हालअपेष्टा थांबवण्यासाठी युवकांनी युवकांसाठी ही कृती समिती स्थापन केल्याचे संस्थापक सदस्य सांगतात. अर्थात या चळवळीला सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप एकूणच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाददेखील मिळत आहे. भविष्यात या माध्यमाद्वारे मोठे जनआंदोलन करण्याची तयारी हे युवक दाखवतात. इतर माध्यमांनी दखल नाही घेतली तरी या युवकांसाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप हे माध्यम जवळचे वाटते. जिथे थेट संबंधित खात्याच्या मंत्र्यांना टॅग करून त्या संदर्भात निवेदन सादर केले जाते. रोज शतकांच्या संख्येत मेल पाठवले जातात. अशाप्रकारे ही चळवळ एक मूर्त रूप धारण करत आहे. आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात ही चळवळ यशस्वी होईल यात दुमत नाही. या प्रकारचा फायदा सोशल मीडियाद्वारे युवकांनी करून घेतला तर आपल्या समस्या जगासमोर मांडता येतील आणि क्रियाशीलता वाढून एखाद्या क्रांतीचा जन्म होऊ शकतो.

- Advertisement -

शिक्षण क्षेत्रात अलिकडच्या काळात आणखी एक माफियाराज चालत आहे. आणि तो म्हणजे एम.फिल आणि पी.एचडीच्या मौखिक परीक्षेसाठी संशोधक विद्यार्थ्यांकडून गरज नसताना घेण्यात येणारे हजारो रुपये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात या विरोधात भूमिका घेत, मार्गदर्शकासोबत पैशासंदर्भात झालेली बोलणी स्मार्टफोनमध्ये रेकॉर्ड करून संशोधक विद्यार्थ्याने वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर व्हायरल केली. पाठिंबा म्हणून फेसबुक पोस्टद्वारे सर्व विद्यार्थी संघटना एकवटल्या व संबंधित मार्गदर्शकावर कारवाईची मागणी केली. कुलगुरूंनी याची दखल घेऊन कारवाईसुद्धा केली. त्या संशोधकावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली. या एका संशोधकाने दाखवलेल्या धाडसामुळे भविष्यात इतरांना अशा समस्येला सामोरे जावे लागणार नाही. असा सूर समाज माध्यमांच्या चर्चेत आहे. म्हणजेच ठरवले तर आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात दुधारी तलवार म्हणून सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो हेच या ठिकाणी सिद्ध होते.

वर उल्लेख केला त्याप्रमाणे सत्यता जगासमोर दाखवता येते. एकीकडे आत्मनिर्भरतेची संकल्पना मांडली जातेय. आणि दुसरीकडे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. या सर्व अडचणींना तोंड देत युवक आपला मार्ग शोधत आहेत. अनेकांच्या नोकर्‍या जातात तिथे नवीन नोकरी मिळण्याची शक्यता फारच कमी… अशाही परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती बीड जिल्ह्यातील सांगवी पाटण या गावातील दादासाहेब भगत या आत्मनिर्भर तरुणाची.. एका पत्र्याच्या शेडमध्ये सॉफ्टवेअर कंपनी उभारून नवा व्यवसाय या तरुणाने सुरू केला. भारतातील वेगवेगळ्या उद्योजक तसेच व्यावसायिकांना सोशल मीडियावर आपली जाहिरात करताना वेगळ्या प्रकारचे ग्राफिक्स डिझाईन हवे असतात. यासाठी वेगळ्या सॉफ्टवेअरची आवश्यकता असते. हे ओळखून दादासाहेब यांनी ‘डू ग्राफिक्स’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले. विशेष म्हणजे हे सॉफ्टवेअर मोफत ऑनलाईन देण्यात आले आहे. पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेला हा व्यवसाय जवळपास 25 लोकांना रोजगार पुरवतो. दरवर्षी भारताबाहेर जाणारे दोन हजार कोटी रुपये वाचवण्याचे काम याद्वारे होईल असा दावा दादासाहेब करतात. आपल्या ज्ञानाचा फायदा अशाप्रकारे जर इतर युवकांनी करून घेतला तर बेरोजगारी दूर होईलच…सोबतच सोशल मीडिया आपला चांगला मित्र होईल आणि एक नवी दिशा दाखवेल. गरज आहे आपण त्याचा वापर कशाप्रकारे करतो.

-धम्मपाल जाधव
-(लेखक युवा विषयाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -