घरफिचर्सपाऊलवाटा धुंडाळताना...

पाऊलवाटा धुंडाळताना…

Subscribe

पाऊलवाट चालताना आपल्या जाण्याच्या ठिकाणाचा दुरून अंदाज घ्यावा लागतो. मला एकाच दिशेला जाणार्‍या अनेक पायवाटा दिसत होत्या. प्रत्येक पाऊलवाटेला स्वतःचा एक गुण असतो. प्रत्येक पाऊलवाट ही वेगळी, पण काहीशी सारखीच. या पाऊलवाटा कुजबुजतात. त्यांची कुजबुज ही गांभीर्याने जाणून घ्यायची असते. पाऊलवाटेच्या बाजूने पसरलेल्या वृक्षवेली त्या पाऊलवाटा समृद्ध करतात.

दहावीची परीक्षा झाली आणि परीक्षा संपली की, गावी पळायचं या दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे मी गावी जाण्यासाठी कुर्ला डेपोतून देवगड गाडी पकडली. उन्हाळ्याचे दिवस होते. अजून इतरांच्या परीक्षा व्हायच्या होत्या. त्यामुळे गाडीला गर्दी तशी कमीच होती. तरी बाहेरचा उकाडा गाडीत जाणवत होता. मीदेखील पहिल्यांदा एकटा गावी निघालो होतो. गाडी सुरू झाली तसा बाहेरचा उकाडा कमी जाणवू लागला. एकेक मैल मागे टाकत गाडी मुंबई-गोवा महामार्गावर धावत होती. नेहमीची माहीत असलेली गावं मागे पडत होती. तसतशी गावी पोहोचण्याची घाई झाली. गाडीच्या वाढत्या वेगाबरोबर गावी लवकर पोचणार याची धूसर कल्पना येऊ लागली.

लवकर म्हणजे किती लवकर …? या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला सकाळी चार वाजता मिळालं. मला झोप लागली होती. एसटीचा कंडक्टर माझ्याकडे आला. मला म्हणाला, कोळोशीला उतरायचं आहे ना? मी झोपेतून उठून हो म्हटलं. त्यावर चला पुढच्या वीस मिनिटात कोळोशी येईल. तसा मी नीट जागा झालो. बाहेर बघितलं तर काळाकुट्ट अंधार होता. घड्याळात बघितलं तर चार वाजलेत. आता वीस मिनिटात कोळोशी आलं की, संदीप शिंदेची रिक्षा करायची आणि पाचच्या आत घरात पोहोचायचं. पण आमच्या मालवणीत एक म्हण आहे, येवाजला ता साधात तर भिका कित्या मागतीत.

- Advertisement -

मी कोळोशीला उतरलो आणि बाबू शिंदेंच्या हॉटेलजवळ आलो. सकाळी साडे चारची वेळ. नांदगाव-शिरगाव रस्तावर गाड्यांची वर्दळ नाही, कोणा माणसाची जाग नाही. संपूर्ण गाव साखरझोपेत होतं. मी बाबू शिंदेंच्या हॉटेलच्या मागे असलेल्या त्यांच्या घराच्या आखाड्यावरून संदीपला हाका मारल्या. त्याबरोबर जवळची कुत्री जागी झाली आणि माझ्याकडे बघून भुंकू लागली. घरातून कुणी तरी बाहेर खळ्यात आलं आणि कोण आसा ? म्हणून विचारल्यावर मी माझी ओळख आणि येण्याचं प्रयोजन सांगितलं. त्यावर रिक्षावाला संदीप कोणा पाहुण्याकडे काल वस्तीला गेला आहे, तो आज दुपारपर्यंत येणार असल्याचे कळले. मी आखाड्यावरून मागे फिरून पुन्हा एसटी स्टॅण्डवर आलो. आता सकाळी नऊ वाजेपर्यंत तिथे बसून राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

विचार करताकरता त्या काळोखात काय वो गाववाल्यानू, हय खय बसलास? असं कोणी वाटेवरून जाणार्‍या ग्रामस्थाने विचारल्यावर मी त्याला परिस्थिती सांगितली. त्यावर तो आयनलाक जावचा ना मगे गाडी कश्याक व्हयी ? ह्या मदल्या वाटेन गेलास की, उजाडाच्या आत घराक जाशा. मी विचार केला खरच असं करूया का ? गाडी यायला अजून चार तास आहेत. जाऊ या का मधल्या वाटेने? ते गृहस्थ माझ्या मनात भुंगा सोडून निघून गेले. मी थोडावेळ तिथेच घुटमळलो. आणि पहाटेच्या त्या अंधुक प्रकाशात मधल्यावाटेने निघालो. मधली वाट म्हणजे रस्ता नव्हे ती पायवाट. पहाटेच्या त्या अंधुक प्रकाशात गवतावर पडलेलं दवबिंदू लख्ख दिसत होते. पायाला चप्पल असतानाही आजूबाजूला असणार्‍या गवतामुळे त्या दवाचा स्पर्श पायाला गुदगुल्या करत होता. क्वचित कुठेतरी पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता. पाऊलवाटेने जाण्याचा आनंद खूप वेगळा. उन्हाळ्याच्या दिवसातदेखील पायाखालची माती दवामुळे चिकट झालेली होती.

- Advertisement -

आजूबाजूच्या गडद झालेल्या काळोखात वर चंद्राचा प्रकाश एवढाच काय ती दिसण्याची सोय. मनात एक अनाम भीतीदेखील होती. मधली वाट म्हणजे गर्द झाडी, पहाटेच्या वेळी कुठल्या हिंस्त्रपशूच्या तावडीत सापडलो तर पळायला वाट कुठली शोधायची? पण एक मन ही भीती दाखवताना दुसर्‍या मनात मात्र अशी खेड्यातली पहाट मुद्दामहून कशाला अनुभवायला मिळते? पाऊलवाट चालताना आपल्या जाण्याच्या ठिकाणाचा दुरून अंदाज घ्यावा लागतो. मला एकाच दिशेला जाणार्‍या अनेक पायवाटा दिसत होत्या. प्रत्येक पाऊलवाटेला स्वतःचा एक गुण असतो. प्रत्येक पाऊलवाट ही वेगळी, पण काहीशी सारखीच. या पाऊलवाटा कुजबुजतात. त्यांची कुजबुज ही गांभीर्याने जाणून घ्यायची असते. पाऊलवाटेच्या बाजूने पसरलेल्या वृक्षवेली त्या पाऊलवाटा समृद्ध करतात. या पाऊलवाटेने जाताना एका ठिकाणी येऊन मी फसलो. आता वाट मिळाली नाहीतर जायचं कसं? पण पाऊलवाटेच एक वैशिष्ट आहे त्या कुठल्यातरी ठिकाणी एकत्र येऊन मिळतात. त्यामुळे दिवसा पाऊलवाटेने जाताना रस्ता चुकण्याची शक्यता तशी कमीच असते.

उन्हाळ्याच्या दिवसातदेखील ही पाऊलवाट ताजी टवटवीत दिसत होती. आजूबाजूला असलेल्या बागांमधून आंब्या काजूचा वास दरवळत होता. पुढे थोडी वस्ती आली आणि दोन बाजूला घरं आणि मध्ये पाणंद, आणि या पाणंदीमधून जाणारी पायवाट सुरू झाली. घरादारातून लगबग सुरु झाली होती. बाहेर अजूनही अंधार होता. पायवाटेने जाताना घरासमोरच्या गोठ्यातून शेणामुताचा वास परमळत होता. त्या वासाचा दरवळ अजूनही नाकात आहे. लालमातीतून त्या पायवाटेवर फिरताना राहून राहून सुधीर मोघे आठवत राहिले.

रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या

ही ओळ म्हणतच मी चाललो होतो. पहाटेच्या वेळी या पायवाटेवरून चालतानाचा आनंद काही वेगळाच ! या पायवाटेने पावसाळ्याच्या दिवसात फिरताना जे सुख आहे ते केवळ जन्नतच! त्या पायवाटेने स्वतःच्या जाण्याच्या खुणा उमटवून मी उजाडायच्या आत घरात पोचलोदेखील. रस्तावरून शुष्कपणे येण्यापेक्षा या पायवाटेने किती वेगळा अनुभव घेत मी घरात पोचलो. खेडेगावात हमरस्त्यापेक्षा पायवाटाच जास्त उपयोगी पडतात. पहाटेला कुजबुजणारी ही पायवाट रात्रीच्या किर्र काळोखात खूप विलक्षण वाटते. सकाळच्या अंधुक प्रकाशात अनुभवलेली पायवाट रात्रीच्या निबिड अंधारात पूर्ण वेगळी. कधीतरी पारधीच्या निमित्ताने या पायवाटेने गेले की, समोरच्या काळ्याकुट अंधारातदेखील वाट शोधायची जबाबदारी पायवाट पार पाडते. रातकिड्यांच्या किरकिरत असणार्‍या आवाजात ती पाऊलवाटदेखील सुस्तावलेली असते. कुठेतरी मध्येच काजव्यांची चमचम सुरू असते. अशावेळी पायवाटेने रस्ता तुडवताना एक आनंद असतो. तो सृजनशीलतेचा. निसर्गाची सृजनशीलता आपण एका वेगळ्या पातळीवरून अनुभवत असतो.

रात्रीच्या वेळी या पाऊलवाटेने जाताना पायाखालच्या गवताचा आवाज त्या रातकिड्यांच्या आवाजात मिसळला जातो. मधून मधून ठासनीच्या बंदुकीच्या बाराचे आवाज मन पुन्हा एकदा पराधीकडे घेऊन जाते. त्या पाऊलवाटेने समोर पसरलेला माळ दृष्टीस पडून आम्ही उगाचच कुठे आभाळात शुक्रतारा दिसतो का ते बघायचो. एखादी अवघड वाट पायाने सतत चालत राहिलं की, ती वाट जनसामान्यात रूढ होऊन जाते. पायवाटा तशा समजायला अवघड, पण काही गोष्टीचं अवघडपण मनात टिकून राहत. पाऊलवाटेने रस्त्याला बहिष्कृत करून आपले वर्चस्व गावगाड्यात अबाधित ठेवले. पाऊलवाटा धुंडाळताना आपली सृजनशीलता कायम स्मरणात राहते.

एक दिवस असेच झाले. तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत मी गावी होतो. संध्याकाळच्या वेळी सर्व गुरं आली, पण एक दुभती म्हैस मात्र घरी आली नाही. काळोख पडला तसे आम्ही पायवाटेवर उमटलेल्या गुरांच्या खुरांच्या ठशांवरून म्हशीच्या शोधात निघालो. तेव्हा गावातल्या पाऊलवाटा धुंडाळता आल्या. पाऊलवाटा अशा माध्यमातून अनुभवताना एक प्रयोगात्मक अनुभव मिळाला.

गावी आजही रस्त्यापेक्षा पाऊलवाटा जवळच्या वाटतात. कारण या पाऊलवाटा सर्व जीव जोडून त्याला शिवत्वाची झालर देतात. म्हणून गावागावात आजही महामार्ग चौपदरीकरणाच्या काळात पाऊलवाटा टिकून आहेत. त्या आपलं महत्व टिकवून आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -