Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स विख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ

विख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ

१८८२ साली ख्यातनाम अमेरिकन अर्थतज्ञ हेन्री जॉर्ज यांच्या एका व्याख्यानाच्या प्रभावातून शॉ समाजवादाकडे वळले आणि पुढे फेबिअन सोसायटी या लंडनमधील समाजवादी संघटनेचे एक आधारस्तंभ बनले. इंग्लंडमध्ये समाजवाद आला पाहिजे पण तो क्रांतीच्या मार्गाने नव्हे, तर योग्य त्या सामाजिक-आर्थिक सुधारणांमधून येईल, अशी फेबिअन समाजवाद्यांची धारणा होती.

Related Story

- Advertisement -

जॉर्ज बर्नार्ड शॉ हे विख्यात ब्रिटिश नाटककार, समीक्षक, पत्रकार आणि समाजवादाचे खंदे प्रचारक. त्यांचा जन्म २६ जुलै १८५६ रोजी आयर्लंडमधील डब्लिनमध्ये झाला. शॉ यांचे औपचारिक शिक्षण फारच थोडे झाले होते. तथापि स्वप्रयत्नाने त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास करून बहुश्रुतपणा प्राप्त केला होता. घरातील संगीताच्या वातावरणाच्या प्रभावातून ते पियानो वाजवायला शिकले होते. आपल्या व्यक्तिगत जीवनाची गुणवत्ता वाढवत, लंडनच्या सामाजिक जीवनात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी सतत आत्मप्रसिद्धीच्या झोतात राहू पाहणारे स्वत:चे एक धीट, बेधडक व्यक्तिमत्त्व त्यांनी घडविले. संगीतावर लेख लिहून सुरू केलेल्या पत्रकारितेबरोबर ते कांदबर्‍याही लिहीत होते आणि त्या प्रकाशकांकडून नाकारल्या जात होत्या. कमाईही फारशी नव्हती. अशा खडतर परिस्थितीला निश्चयाने तोंड देत लंडनमधल्या बुद्धिमंतांच्या वर्तुळांतून ते वावरू लागले आणि तिथल्या चर्चांमध्ये भाग घेऊन आपल्या उपस्थितीची जाणीव तिथल्या मंडळींना ठसठशीतपणे करून देऊ लागले. १८८२ साली ख्यातनाम अमेरिकन अर्थतज्ञ हेन्री जॉर्ज यांच्या एका व्याख्यानाच्या प्रभावातून शॉ समाजवादाकडे वळले आणि पुढे फेबिअन सोसायटी या लंडनमधील समाजवादी संघटनेचे एक आधारस्तंभ बनले. इंग्लंडमध्ये समाजवाद आला पाहिजे पण तो क्रांतीच्या मार्गाने नव्हे, तर योग्य त्या सामाजिक-आर्थिक सुधारणांमधून येईल, अशी फेबिअन समाजवाद्यांची धारणा होती. पोथीनिष्ठ सैद्धांतिकतेपेक्षा विवेक आणि मानवतावाद यांवर शॉ यांचा अढळ विश्वास होता आणि तो त्यांच्या लेखनातूनही अटळपणे प्रकट झालेला आहे. सामाजिक-राजकीय, तसेच वाङ्मयीन क्षेत्रांत सक्रिय असलेल्या शॉ यांना जे अनेक बुद्धिमान, सर्जनशील स्नेही मिळाले, त्यांत अ‍ॅनी बेझंट, विल्यम मॉरिस यांच्या सारख्यांचा समावेश होतो. शॉ यांच्या काळी पश्चिमी जगातील नाटककरांवर इब्सेनचा मोठा प्रभाव होता. शॉदेखील त्याचे चाहते होते. क्विटेसन्स ऑफ इब्सेनिझम (१८९१) हे त्यांचे इंग्रजी भाषेतले इब्सेनवरचे पहिले पुस्तक होय. त्यांनर शॉ यांनी साठांहून अधिक नाटके लिहिली.

शोषणावर आधारलेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये स्वत:ला निरपराध समजणारेही त्या शोषणात अजाणतेपणे कसे सहभागी झालेले असतात, हे शॉ यांनी त्यांच्या विडोअर्स हाऊसेस आणि मिसेस वॉरेन्स प्रोफेशन (१८९३) या नाटकांतून दाखवून दिले. द फिलँडरर नाटकात (१८९३) त्यांनी तत्कालीन ‘फॅशनेबल’ बुद्धिमंतांना आपले लक्ष्य केले. या नाटकातील दु:खद सामाजिक वस्तुस्थिती विचारात घेऊन शॉ यांनी या नाटकसमूहाला अप्रिय नाटके-अन्प्लेझंट प्लेज-असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी काही सुखद नाटके (प्लेझंट प्लेज) लिहिली. आपल्या वैचारिक बैठकीशी तडजोड न करता व्यावसायिक रंगभूमीसाठीही त्यांनी हे नाट्यलेखन केले. समाजातील वर्गव्यवस्थेच्या मुळाशी असणर्‍या श्रेष्ठ-कनिष्ठतेबाबतच्या गृहीतकांची मार्मिक चिकित्सा शॉ यांनी पिग्मेलियन (१९१३) या नाटकात केली. शॉ यांनी लिहिलेल्या कादंबर्‍यांत कॅशेल वायरन्स प्रोफेशन (१८८६), अन्सोशल सोशॅलिस्ट (१८८७), लव्ह अमंग द आर्टिस्ट्स (१९००), द इरशनल नॉट (१९०५) आणि इमॅच्युअरिटी (१९३०) यांचा समावेश होतो. साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना १९२५ साली देण्यात आला. अशा या महान साहित्यिकाचे २ नोव्हेंबर १९५० रोजी निधन झाले.

- Advertisement -