घरफिचर्सयेणार्‍याने येत जावे...

येणार्‍याने येत जावे…

Subscribe

घेणार्‍याने घेत जावे
येणार्‍याने येत जावे
येता येता येणार्‍याने
घेणार्‍याचे जाणे घ्यावे

महादेव- हे नारदा…आज पहाटेच्या या रम्य समयी हे काय नवे आणखी…आज आपल्या मुखातून ‘नारायण नारायण ’असा भगवंतांचा जयघोष ऐकू आला नाही. आणि स्वर्गातील सर्वच कवींना मार्गदर्शन करणार्‍या ज्येष्ठ कवीवर्य विंदांच्या कवितेचे हे काय विचित्र विडंबन ऐकवत आहेस तू…त्यासाठी विंदा आपल्या मोठ्या फ्रेमच्या चष्म्यातून आपल्या मोठ्ठाल्या डोळयांनी तुजकडे क्रोधचित्ताने पाहात असल्याचे मला दिव्यदृष्टीने स्पष्ट दिसतेय.
नारद- नाही देवा नाही…विंदा करंदीकर असं खचितच करणार नाहीत. त्यांचं सुकोमल कवी मन माझ्यासारख्या तिनही लोकांत मुशाफिरी करणार्‍याबाबत असं क्रोधचित्त बाळगण्याची त्यांना परवानगीच देणार नाही. हो हे खरंय की मी या कवितेचं असं विडंबन करायला नको होतं.
महादेव- नकोच करूस नारदा..विंदांच्या शब्दांची अशी मोडतोड करण्याचा अधिकार कुणालाही नसावा…अहाहा…काय ते शब्द त्यांचे…परमार्थाची शिकवणंच

- Advertisement -

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता घेणार्‍याने
देणार्‍याचे हात घ्यावे

महादेवा माझ्याविषयी आपली काहीतरी गफलत होतेय, ‘घेणार्‍याचे हात घ्यावे’, असं विंदानी जरूर म्हटलं, पण मी आज ‘हात’ सोडणार्‍यांची कविता म्हणतोय. आताच्या राजकारणात देणार्‍याचे ‘हात’ सोडणारेच बळावले आहेत. हातात दिलेला आपला ‘हात’ सोडवून ‘हातात’ बांधलेले ‘घड्याळ’ही जागच्या जागी ठेवून आपल्या रिकाम्या हाताने निघालेले अनेक जण मला पृथ्वीतलावर दिसत आहेत.
महादेव- अरे, मग असे लोक तर कुठल्याश्या पावन मार्गावर निघालेले असावेत…काय तो त्याग म्हणावा…हातातलं मनगटी घड्याळही ठेवून, कुठल्या वैराग्याच्या मार्गानं ते सर्व निघाले आहेत?
नारद- देवा देवा, इतकी घाई नको, त्यांच्या सत्काराची. पृथ्वीतलावर महाराष्ट्र भूमीतील तलावात अचानक मुबलक प्रमाणात कमलपुष्पे उगवू लागली आहेत आणि लगोलग अदृश्यही होत आहेत. या तलावातील कमलपुष्पे मिळवण्यासाठी पृथ्वीतलावर रांगा लागल्या आहेत.
महादेव- केवळ कमलपुष्पांसाठी ? काय ही सुवर्णकमले आहेत का नारदा?
नारद- नाही महादेवा, ही ती कमलपुष्पे नाहीत, जी भगवंताच्या चरणी अर्पण केली जातात, हे कमलपुष्प सत्तेचे आहे. ज्याभोवती अचानक अनेक भ्रमर गोळा झाले आहेत.
(हा संवाद सुरू असताना अचानक आसमांतातून एक विमान वेगाने मोठ्याने आवाज करत ढगांमध्ये दिसेनासे झाले.)
महादेव – नारदा, इतक्या वेगाने हे पुष्पक कुणाचे ?, कुठे बरे जात आहे ते?
नारद- यांसी…पृथ्वीवासियांमध्ये चार्टर्ड प्लेन असं संबोधलं जातं देवा, आणि हे विमान तर साक्षात उद्धवाने धाडले आहे…त्या भास्करांसाठी.
महादेव- भास्करांसाठी…आज पहाटेच्या समयीतर आमची भेट झाली त्या कैलासावर…त्यावेळी उगवताना त्यांनी काही याविषयी आम्हास कळवले नाही.
नारद- महादेवा, आपण खरंच भोळे आहात, मी अंतराळातल्या रोज उगवणार्‍या भास्करांविषयी म्हणत नाही.. माझा संदर्भ कोकणनगरीतील गुहागरनगरीतील भास्करांविषयीचा आहे. त्यांनी कालच मुंबई नगरतील मातोश्रीवर आपणांस शिवबंधनात बांधून घेतले आहे.
महादेव- त्यात विशेष ते काय? ते स्वगृही कधीना कधी तर परतणार होतेच?
नारद- हो पण…मनगटावरचे घड्याळ बाजूला काढल्यावर त्यांना अचानक स्वतःमध्ये सूक्ष्म रुपात अजूनही जिवंत असलेल्या सैनिकाची जाणीव झाली. त्यानंतर त्याच मनगटावर त्यांनी शिवबंधन बांधून घेतले. ज्यावेळी हे बंधन त्यांना बांधले जात होते तेव्हा १४ वर्षांपासून मनगटावरील घड्याळ्याच्या पट्ट्यांच्या खुणा त्यांना शिवबंधन बांधणार्‍या उद्धवाने पाहिल्याच असतील. जरी त्यांच्या नजरेतून त्या सुटल्या तरीही कुरूक्षेत्रावरील युद्धाची खडानखडा खबरबात धृतराष्ट्रांना देणार्‍या संजयाच्या नजरेतून तरी या खुणा सुटल्या नसतील. विधानसभेच्या युद्धात आज शिवबंधन बांधलेल्या आणि कधीतरी ‘घड्याळे असलेल्या हातांवर’ लक्ष ठेवण्याची मोठी जबाबदारी त्या‘संजया’कडेच असेल. त्याच वेळी मनगटावरच्या घड्याळ्याच्या खुणा किती वेगाने पुसल्या जात आहेत आणि शिवबंधनच्या खुणा किती गडद होत आहेत, यावरही त्यांचे लक्ष असेल, असो महादेवा तूर्तास मला रजा द्यावी, पहाटेच्या मंगल पुजेसाठी कमळाची फुले आपल्या कैलास मानस सरोवरात मिळतील का? हे विचारायला मी खरं तर आलो होते. महाराष्ट्र नगरीत नव्याने उगवलेली कमलपुष्पे नुकतीच आणखी काही जणांनी पळवल्याची वार्ता कानी आली आहे..त्यामुळे स्वर्गलोकी कमलपुष्पांची टंचाई निर्माण होण्याची चिंता मज आहे. नारायण…. नारायण….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -