घरफिचर्स...तेरा मेला पीछे छुटा राही चल अकेला!

…तेरा मेला पीछे छुटा राही चल अकेला!

Subscribe

बासरी वाजली की तसंही कानावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतं. त्यातच ’चल अकेला’ हे गाणं ऐकलं की त्या बासरीतल्या जन्मजात आर्ततेचा कान ते काळीज असा प्रवास कधी होतो ते तुम्हाला कळतही नाही. ते गाणंच तसं आहे. मुकेश नावाच्या कारूण्याच्या बादशहाने गायलेलं. हो! मुकेशदा खरोखरच कारूण्याचे बादशहा होते. आवाज तसा त्यांचा अनुनासिक म्हणजे नाकातलाच होता. पण त्यातल्या गोडव्याला कारूण्याची किनार होती. अगदी ऐकताक्षणीच ठळकपणे दिसणारी. म्हणूनच तर राज कपूरसारख्या कलावंताने मुकेशदा हे जग सोडून निघून गेल्यानंतर मुकेश हा माझा आत्मा होता असं व्याकुळ होत म्हटलं होतं. कारण राज कपूरच्या चेहर्‍यावरच्या त्या ओतप्रोत भावनावेगाशी मुकेशदांचा आवाज हूबहू जुळत होता.

असो, पण ’चल अकेला’ ऐकताना त्यातले मुकेशदा पूर्णपणे वेगळे वाटतात. मुकेशदांच्या गाण्यातला तो एरव्हीचा हळवेपणा पूर्णपणे वेगळा वाटतो. त्या गाण्यातलं वातावरणच पूर्णपणे वेगळं वाटतं. का वाटतं असं?…

- Advertisement -

हे गाणं सुरू होताना जी बासरी वाजते तीच मुळी मनाचा असा ठाव घेते की संपूर्ण गाणं व्यापून टाकते. मनावर पसरून राहते. गाणं संपताना गाण्यातले शब्द संपले, मुकेशदांचा आवाज मागे पडला तरी त्या बासरीच्या सुरांचं आपल्याबरोबर राहिलेलं ते मुलायम अस्तित्व आपल्याला सोडून जायला राजी होत नाही. दु:ख, वेदना ह्यांच्या खोल खोल जगात ते आपल्याला घेऊन जातं. आपल्याला आपल्या आत बघायला लावतं. कारण गाण्यातल्या दुसर्‍याच ओळीतले शब्द असतात, ’तेरा मेला पीछे छुटा राही चल अकेला.’ जो माणसांचा तांडा तुझ्यासोबत होता तो आता कधीच मागे राहिला आहे, तुला मात्र आता पुढे एकटंच चालायचं आहे, तुला आता पुढची वाट चालताना कुणाचीही सोबत नसणार आहे, असं जेव्हा ती ओळ मुकेशदांच्या आवाजाची सोबत घेत सांगते तेव्हा मन शहारून जातं.

आमच्या ठाण्यात ओ.पी, नय्यर राहायला आले होते तेव्हा त्यांच्याकडे ह्या गाण्याचा मी हटकून विषय काढला होता. ह्या गाण्याचे संगीतकार तेच. ते म्हणाले होते, ‘हे गाणं मला फाळणीच्या दिवसांची आठवण करून देतं. तेव्हा भारतातले मुस्लिम पाकिस्तानात चालले होते. पाकिस्तानातले हिंदू भारतात निघाले होते. दोघांच्या ट्रेन्स एकमेकांच्या बाजुला उभ्या राहायच्या तेव्हा आतमधली माणसं एकमेकांकडे विषण्णतेने बघत बसायची, जणू त्यांच्या मनात असायचं, तेरा मेला पीछे छुटा राही चल अकेला.‘ नय्यरसाहेबांच्या ह्या गाण्याबद्दलच्या भावना जरा जास्तच उत्कट व्हायच्या.

- Advertisement -

कवी प्रदीप ह्या गाण्याच्या एका अंतर्‍याच्या शेवटी ‘यहाँ कौन सा वो इन्सान जहाँ पर जिस ने दुख ना झेला‘ असं लिहितात तर दुसरा अंतर संपताना ‘यहाँ पुरा खेल अभी जीवन का तुने कहाँ हैं खेला‘ असं म्हणतात. हे दोन्ही अंतरे संपल्यानंतर ओपींनी जो खर्जातला ’चल अकेला’ हा जो महिलांच्या आवाजातला कोरस ठेवला आहे तो तर ह्या गाण्यातलं करूण वातावरण फारच गडद करून जातो.

ठाण्यातला नामांकित टेलर पप्पू गवंडेच्या दुकानातल्या कॉम्प्युटरवर कायम गाणी सुरू असतात. एकीकडे गाणं सुरू असतं तर एकीकडे त्याचं टेलरिंगचं काम सुरू असतं. त्याचं ह्या गाण्याबद्दलचं म्हणणं ही गाण्याबद्दलची खरी प्रतिक्रिया आहे. पप्पू गवंडे म्हणतो, गाण्यांचा साठा तसा बराच असतो, पण चल अकेला लागतं तेव्हा मी माझा राहत नाही. हे गाणं ऐकताना माझे डोळे पाणावतात, मी चक्क रडतो.

हे संपूर्ण गाणं म्हणजे माणसाची मुर्तिमंत वेदना आहे, म्हणूनच हे गाणं कान देऊन आणि मन लावून ऐकलं तर काळजावरचे भाव डोळ्यांत उमटल्याशिवाय राहत नाहीत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -