कलाकृतीतील बाबासाहेब…

मानवी वंशशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड ब्लंडेल यांनी बाबासाहेबांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांच्या कार्यावर आधारीत लघुपट आणि कार्यक्रमांची मालिका तयार केली. तर श्याम बेनेगल यांनी भारत का संविधान या विषयावर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमागील इतिहास स्पष्ट करणारी दहा भागांची मालिका तयार केली आहे. यात बाबासाहेबांची सचिन खेडेकरने साकारेली भूमिका आजही स्मरणात आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्य, कला, क्रीडा, पत्रकारिता, अर्थविषय, राजकारण, समाजकारण, संगीत, चित्रकला, मूर्तीकला, सिनेमा, पाककला अशा कित्येक कला, साहित्य प्रकारांशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव जोडले गेले आहे. यातील अनेक साहित्य आणि अभ्यास शाखांवर महामानवाच्या नावाचा थेट असा अमिट ठसा आहे. अनेक ज्ञानाशाखांचा उदय किंवा त्यांना दिशा देण्यातही डॉ. आंबेडकर या नावाचे मोठे योगदान राहिले आहे. सामाजिक योगदान आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यापालिकडेही कलाप्रेमी बाबासाहेब आणि बाबासाहेबांवर निर्माण झालेल्या कलाकृती यांचा घेतलेला हा आढवा…

मानवी वंशशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड ब्लंडेल यांनी बाबासाहेबांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांच्या कार्यावर आधारीत लघुपट आणि कार्यक्रमांची मालिका तयार केली. तर श्याम बेनेगल यांनी भारत का संविधान या विषयावर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमागील इतिहास स्पष्ट करणारी दहा भागांची मालिका तयार केली आहे. यात बाबासाहेबांची सचिन खेडेकरने साकारेली भूमिका आजही स्मरणात आहे. राज्यघटना निर्मितीचे कामाचा कालावधी दोन वर्षे अकरा महिने आणि 27 दिवसांचा आहे. या मोठ्या काळाला दहा भागांमध्ये बंदिस्त करण्याचे आव्हान कठीण होते. त्यातील संविधान सभेतील ज्या सदस्याने मराठी, हिंदी किंवा त्याच्या त्या त्या प्रादेशिक भाषेमध्ये चर्चा केली. त्या त्या भाषेचाच वापर ही मालिका बनवता करण्यात आल्याचे बेनेगल यांनी स्पष्ट केले. यातील डॉ. आंबेडकरांची भाषणे आणि संविधान सभेला कलम कायद्याच्या निर्मितीबाबत झालेले आरोप खोडताना दिलेली स्पष्टीकरणे मोलाची आहेत, ती सर्वच या दहा भागांमध्ये सामावून घेणे कठीण होते. त्यातील मोजक्या कलमांवर झालेली संविधान या मालिकेत पाहायला मिळते. मात्र यातील बाबासाहेबांचे संविधान सभेतील अखेरचे भाषण आणि राज्यघटनेविषयी असलेल्या अपेक्षा यांची मीमांसा पहायला, ऐकायलाच हवी. या शिवाय महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील राजकीय आणि मनाच्या स्तरावरील संबंधांचा उलगडा होण्यासाठीही ही मालिका महत्वाची आहे.
बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी या विषयावर राजेश कुमार लिखित आणि अरविंद गौर दिग्दर्शित याच नावाचे नाटक आले होते. तर गांधी आणि आंबेडकर नावाचे नाटक ज्येष्ठ नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी यांचे मराठी रंगभूमीवर महत्वाचे नाटक असल्याचे स्पष्ट आहे. यातील किशोर कदम (आंबेडकर) आणि अतुल कुलकर्णी (महात्मा गांधी) या व्यक्तीरेखांची आजही चर्चा होते. या शिवाय सर्वव्यापी आंबेडकर ही एबीपी माझा वाहिनीवरील मालिकाही गाजली, तसेच सोनी मराठीवरील महानवाची गौरवगाथा डॉ. आंबेडकर ही अलिकडच्या काळातील बहुर्चित मालिकेची दखल घ्यायलाच हवी. या शिवाय डॉ. आंबेडकरांवर निर्मित झालेल्या चित्रपटांची यादीही मोठी आहे. भीम गर्जना, (1990), बाल आंबेडकर ( कन्नड 1991), युगपुरुष डॉ. आंबेडकर ( मराठी 1993), डॉ. बी. आर. आंबेडकर (कन्नड 2005), रायजिंग लाईट ( रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावरील माहितीपट 2006), रमाबाई भीमराव आंबेडकर ( 2010), रमाबाई( कन्नड 2016) असे अनेक लघुपट, सिनेमे, मालिका डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर साकारल्या गेल्या आहेत.
एनएफडीसी आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने निर्मित केलेल्या जब्बार पटेलांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनटोल्ड ट्रुथ या मूळ इंग्रजी चित्रपटात कोर्टरुमध्ये बाबासाहेबांनी लढवलेल्या खटल्यांचे प्रसंग नाहीत. राजरत्न आजारी असल्याची माहिती बाबासाहेबांना दिली जाते, त्यावेळी डॉ. आंबेडकर मुंबई हायकोर्टाच्या आवारात असल्याचा ओझरता प्रसंग सिनेमात आहे. या अशा अनेक घटना चित्रपटात नसल्याने त्यावर टीका झाली. यावेळी दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी त्यांची सिनेमाची मर्यादा स्पष्ट केली होती. अडीच ते तीन तासांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट समोर आणणं शक्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. तरीही केवळ सामान्य मानवी मर्यादा असलेला माणूस म्हणून बाबासाहेबांच्या वादळी जगण्यातले अनेक पैलू या सिनेमाने शक्य तेवढे समोर आणले. बाबासाहेबांनी फ्रेंच विद्यापीठातही उच्च शिक्षणासाठी अर्ज केल्याची माहिती विद्यापीठाने भारतात पाठवलेल्या पत्रातून अलिकडेच समोर आली. या विषयावरही जुजबी माहिती उपलब्ध आहे. डॉ. आंबेडकरांचा पुरेसा जीवनपट अजूनही पुरेसा उलगडलेला नाही. बाबासाहेबांचे बरेचसे लेखन अद्यापही प्रकाशित झालेले नाही. त्याबाबत संशोधन अभ्यास सुरू आहे. बाबासाहेबांचे क्रिकेट, क्रीडा, कला आणि संगीत प्रेम हा पुन्हा स्वतंत्र विषय आहे.
युद्धकाळात रोम जळत असताना फिडल वाजवणारा निरो बदनाम झाला. मात्र फिडलचे सूर छेडताना देशाच्या सामाजिक आणि राजकीय सुधारणेचे स्वप्नही सत्यात उतरवणारे बाबासाहेब विरळच…संगीत कलेची आवड माणसाचा आनंद आणि माणूसपण टिकवून ठेवते, असं बाबासाहेब म्हणत, फिडलवादन शिकण्यासाठी आपल्या चिंतन, लेखनाच्या व्यग्र वेळेतूनही त्यांनी थोडेसे क्षण बाजूला काढले होते. 1937 मध्ये त्यांनी आपली संगीतकला जोपासली. दादरमधले वैद्य नावाचे शिक्षक बाबासाहेबांना संगीत शिकवत होते. त्यासाठी बाबासाहेबांनी वैद्यांना उत्तम दर्जाचे फिडल वाद्य विकत घेण्यासाठी सुचवले. एखाद्या निवांत क्षणी ते एखादं गाणंही गुणगुणत, स्वर, तालाची उत्तम जाण बाबासाहेबांना होती. सकाळी आठ ते नऊ या वेळेत ऑफिसकामाच्या आधी ते वैद्य सरांकडून ते फिडल शिकत होते. मात्र पुढे वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी व्हायोलिन शिकण्याचे ठरवले. सिद्धार्थ महाविद्यालयातील ग्रंथालयातील रेगे सरांनी बाबासाहेबांकडे बळवंत साठे यांना पाठवले, साठे सर व्हायोलिन वाद्यसंगीताचे उत्तम जाणकार होते. तंतूवाद्य, जसे की सारंगी, तानपुरा, सतारवादनातून इतर वाद्यांच्या तुलनेत मनाला दीर्घ शांतता लाभते, व्हायोलीन हा तंतूवाद्यातील कठीण प्रकार मानला जातो. व्हायोलीन वाद्याचे धडे असलेले ‘व्हायोलीन ः हाऊ टू मास्टर इट’ नावाचे पुस्तक साठे सरांनी बाबासाहेबांना दिले होते.
या पुस्तकातील नोटेशनवर बाबासाहेब व्हायोलीनचे धडे शिकत होते. या शिवाय संगीत रागांचाही अभ्यास सुरू होताच. साठे सरांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबासाहेबांसोबतच्या व्हायोलीन आणि संगीतप्रेमाची माहिती दिली. उच्च रक्तदाबाचा त्रास असताना आणि इतर कामांचा व्याप असतानाही डॉ. आंबेडकरांनी व्हायोलीनची साथ सोडली नाही. लेखन करून हात थकून गेल्यावर ते व्हायोलीन हातात घेत, व्हायोलीनच्या तारेवर ठेवून हाताने दाब देऊन बो फिरवला जाई, त्यावेळी मान आणि खांद्यामध्ये व्हायोलिनची पकड सोबतच हातावरून तारेवर पडणारा दाब यातील संतुलन राखणे महत्वाचे असे, बाबासाहेब दोन वर्षातच उत्तमरित्या व्हायोलिन वाजवू लागले. एकतारी किंवा व्हायोलीन या दोन्ही वाद्यात बोटांनी तारांवर पडणारा दबाव योग्य नसल्यास सूर बिघडतो, चार तारांचे व्हायोलिन म्हणूनच कठीण वाद्य मानले जाते, मनाची एकाग्रता आणि समग्रता त्यात आवश्यक असते, मात्र आयुष्यात दगडासारख्या अनेक कठीण आव्हानांना सुंदर शिल्पमूर्तीचे रुप देणार्‍या बाबासाहेबांनी व्हायोलीनच्या स्वरांनाही कलाप्रेमातून आपलेसे केले.
बाबासाहेबांचे बंधू आनंदराव उत्तम तबला वाजवत. या शिवाय बाबासाहेबांनी विद्यार्थी दशेतच शारदा नावाचे नाटक बसवले होते. तर शेक्सपिअरच्या किंग लियरवरून त्यांनी शहाणी मुलगी हे प्रहसन लिहल्याची नोंद आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राम्हण’ या नाटकावर बाबासाहेबांनी समीक्षा लिहिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका आभाळाचे नाव आहे. या आभाळाचा थांग पुढील कित्येक पिढ्यांना घ्यावा लागणार आहे.

– संजय सोनवणे