पापमोचनी एकादशीच्या व्रताने होईल पापापासून मुक्ती; जाणून घ्या पौराणिक कथा

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हटले जाते. शनिवार (18 मार्च) रोजी पापमोचनी एकादशीचे व्रत केले जाईल. पापमोचनी एकादशी चे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. पापमोचनी एकादशीला श्री विष्णूंचे मनोभावे स्मरण केल्यास व्यक्तिच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात. या दिवशी श्री विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते.

पापमोचनी एकादशी मुहूर्त

पापमोचनी एकादशी 17 मार्च दुपारी 02:06 पासून सुरू होईल, जी 18 मार्च 2023 रोजी सकाळी 11:13 वाजेपर्यंत असेल. पापमोचनी एकादशीला भगवान श्री विष्णूची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 18 मार्च रोजी सकाळी 07:58 ते 09:29 पर्यंत आहे.

पापमोचनी एकादशी कथा

पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळात एके दिवशी देवराज इंद्र चित्ररथ वनात गंधर्व आणि अप्सरांसोबत फिरत होते. त्यावेळी तिथे ऋषी च्यवन यांचा गुणवंत पुत्र तपश्चर्या करत होता. त्या तेजस्वी तरुण ऋषींना पाहून मंजुघोष नावाची अप्सरा मोहित झाली आणि तिने आपल्या हावभावांनी त्याला मोहित केले आणि त्याच्याबरोबर अनेक वर्षे त्या ठिकाणी राहिली. एके दिवशी ज्यावेळी अप्सरा तिथून निघत असताना त्यावेळी त्या ऋषींना त्यांची तपस्या भंग झाल्याचा भास झाला. त्यावेळी संतापून ऋषींनी अप्सरेला पिशाच होण्याचा शाप दिला.

त्यावेळी मंजुघोषाने खूप विनवणी केल्यानंतर तरुण ऋषींना तिची दया आली आणि त्यांनी तिला अप्सरा मंजुघोषाला पापमोचनी एकादशी व्रत करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, या व्रताच्या प्रभावाने तुमचे पाप आणि शाप दोन्ही नष्ट होतील आणि ती तिचे जुने रूप आणि सौंदर्य परत मिळवू शकेल. त्यानंतर तरुण ऋषी आपले वडील ऋषि च्यवन यांच्याकडे गेले आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला, तेव्हा ऋषी म्हणाले, तू हे चांगले केले नाहीस, तू शाप देऊन पाप केले आहेस त्यामुळे तू देखील आता पापमोचनी एकादशीचे नियमानुसार व्रत करायला हवे. तेव्हापासून आपल्या केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी अनेकजण हे व्रत आवर्जून करतात.


हेही वाचा :

Chaitra Navratri 2023 : यंदा पडणार भरपूर पाऊस कारण, नवरात्रीत ‘या’ वाहनावरून येणार देवी दुर्गा!