घरताज्या घडामोडीखडसेंनी काढलं उट्टं, गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादीत मेगाभरती!

खडसेंनी काढलं उट्टं, गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादीत मेगाभरती!

Subscribe

एकेकाळी भाजपचे फायरब्रँड नेते असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आता त्यांची आगपाखड राष्ट्रवादीकडून भाजपवर करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत अनेकदा डावलले गेल्यानंतर अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलं. मात्र, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात वायदा केल्याप्रमाणे एकनाथ खडसेंनी उत्तर महाराष्ट्र आणि प्रामुख्याने जळगावमधल्या भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील करून घेण्याचा धडाका लावला आहे. आता तर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात जामनेर मतदारसंघालाच एकनाथ खडसेंनी हात घातला असून तिथल्या तब्बल २०० भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. गिरीश महाजन यांच्यासाठीच अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंना डावलल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे आता एकनाथ खडसे आपल्यावरच्या त्याच अन्यायाचं उट्टं काढत असल्याचं सांगितलं जात आहे.

रोहिणी खडसेंच्या उपस्थितीत प्रवेश

जळगावचा जामनेर मतदारसंघ हा गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातूनच एकनाथ खडसेंनी कन्या रोहिणी खडसेंना आवश्यक तेवढा पाठिंबा निवडणुकीवेळी मिळाला नसल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या झालेल्या फैरी आख्ख्या महाराष्ट्रानं पाहिल्या होत्या. त्यामुळे आता खडसेंनी जामनेरमधले २०० कार्यकर्ते-पदाधिकारी फोडणं गिरीश महाजनांच्या जिव्हारी लागणं साहजिक म्हटलं जात आहे. एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरमधल्या फार्महाऊसवर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खेडसेंच्या कन्या रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या.

- Advertisement -

आकडा अजून वाढणार?

दरम्यान, जामनेरमधून अजूनही अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होतील, असा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे. या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मनोभावे पक्षाचं काम केलं, मात्र त्याबदल्यात त्यांच्या पदरी निराशाच पडल्यामुळे त्यांनी अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे हा आकडा अजून वाढेल, असा विश्वास यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसेंनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -