Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी राज्यात कोरोनाचं थैमान, २४ तासांत ७११ नवीन रुग्णांची नोंद तर ४ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचं थैमान, २४ तासांत ७११ नवीन रुग्णांची नोंद तर ४ जणांचा मृत्यू

Subscribe

कोरोनाने मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. राज्यात आज कोरोनाने ४ बळी घेतले असून रुग्ण संख्या ७११ वर गेली आहे. मुंबईतही कोरोना बाधित २१८ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या रविवारी राज्यात कोरोनाचे ५६२ रुग्ण आढळले होते व ३ कोरोना ग्रस्त रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर मुंबईत १७२ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा मुंबईसह राज्यात अमिबासारखा हळूहळू हातपाय पसरू लागल्याने काहीसे भितीचे वातावरण आहे.

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी नागरिक कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी, कामावर स्वतःहून मास्कचा वापर करीत असून इतरांनाही मास्क वापरण्याचा आवर्जून सल्ला देताना आढळून येत आहेत. मुंबईसह राज्यात गेल्या जानेवारी महिन्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होता. मात्र फेब्रुवारीपासून मार्च महिन्याच्या अखेरीपासून कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागल्याचे निदर्शनास येत आहे. आता एप्रिल महिन्याच्या आरंभीही कोरोना रुग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे मुंबईसह राज्यात आढळून येत आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना बाधित

७११ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ८१ लाख ४६ हजार ३०१ वर पोहोचली आहे. तर राज्यात कोरोना बाधित गंभीर आजारी ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ४४९ वर पोहोचली आहे. राज्यात ४४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७९ लाख ९४ हजार ६० कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यात सध्या विविध रुग्णालयात ३,७९२ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

मुंबईत कोरोना बाधित २१८ रुग्णांची नोंद

राज्यात काही जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असताना मुंबईतही मंगळवारी कोरोनाच्या २१८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या रविवारी कोरोनाच्या १७२ नवीन रुग्णांची तर सोमवारी ७५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५७ हजार ७४७ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४७ वर स्थिरावली आहे. दरम्यान, मुंबईत दिवसभरात औषधोपचाराद्वारे १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत ११ लाख ३६ हजार ८३८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या कोरोनाचे १,१६२ सक्रिय रुग्ण आहेत.

विमानतळावर ३ जण कोरोना बाधित

संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतामध्ये हवाई प्रवाशांच्या माध्यमातूनच प्रवेश केला होता. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विमानतळावर कडक उपाययोजना करणे आवश्यक झाले. केंद्र सरकारच्या व महाराष्ट्रातील टास्क फोर्सच्या मार्गदर्शनानुसार मुंबई व राज्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या प्रवाशांवर करडी नजर ठेवून स्क्रिनिंग आणि संशयितांची चाचणी करण्यात येत आहे. २४ डिसेंबर २०२२ ते सोमवार ३ एप्रिल २०२३ या कालावधीत विमानतळावर कोरोना बाधित ५२ रुग्णांची नोंद झाली आहे.

तसेच, गेल्या दोन दिवसांत आणखी ३ कोरोना बाधित रुग्ण विविध विमानतळावर आढळल्याने आतापर्यंत बाधित रुग्ण संख्या ५५ वर पोहोचली आहे. बाधित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विज्ञान संशोधन संस्था व कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.


हेही वाचा : IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री, प्रसिद्ध समालोचकाला कोविड पॉझिटिव्ह


 

- Advertisment -