घरताज्या घडामोडीबैलगाडा शर्यत भोवली : शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा

बैलगाडा शर्यत भोवली : शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा

Subscribe

बैलगाडा शर्यतीच्या नावाखाली हजारो लोकांची गर्दी;कोरोना नियमांची धूळधाण

नाशिक : जिल्हा प्रशासनाच्या परवानगीविनाच ओझर येथे बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्या माजी आमदार अनिल कदम यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रचंड गर्दीत झालेल्या या शर्यतीत कोरोना नियम मात्र धुळीत गेल्याचे चित्र होते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या शर्यतीला कोणतीही परवानगी दिली नव्हती, त्यामुळे कायद्याला न जुमानता परस्पर अशा शर्यती आयोजित करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल होईल असे संकेत होते. दरम्याम राज्य सरकारने शुक्रवारी (दि.२४) ओमायक्रॉन संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रात्री जमावबंदीचे आदेश लागू करतानाच सोहळ्यांसाठी गर्दीचे निकषही ठरवून दिले होते. त्यानुसार अधिकाधिक २५० व्यक्तींना एकत्र येण्याची परवानगी असताना, या बैलगाडा शर्यतीसाठी मात्र हजारो संख्येने उपस्थित होते. शिवाय यात कुठेही मास्क किंवा सॅनिटायजेशनचे नियम देखील पाळले गेले नसल्याचं दिसून आले. अखेर शर्यतीतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक माजी आमदार अनिल कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

यांच्यावर गुन्हा दाखल

सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत निर्बंध आणि नियम पायदळी तुडवत पार पडली. याप्रकरणी राज्यातला पहिला गुन्हा सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यावर दाखल झाला आहे. त्यांच्यासह आशिष शिंदे, स्वप्नील कदम, शिवाजी शेजवळ, हर्षल चौधरी, महेश शेजवळ, पिंटू शिंदे, अनिल सोमासे, संजय भिकुले, अमोल भालेराव या कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -