आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलं नवं आव्हान, म्हणाले, येत्या अधिवेशनात….

Aditya Thackeray
काॅंग्रेसची सावरकरांबाबत भूमिका आम्हाला मान्य नाही

वरळीतील कार्यक्रमावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांच्यात आरोप- प्रत्योरोपांचा डाव रंगत आहे. या कार्यक्रमातूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र डागले. वरळी, ठाण्यातून निवडणूक लढवण्याच्या आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला झुगारत आपण अशी छोटी आव्हान स्वीकारत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या मुद्द्यावरून दोघांमध्ये अद्याप शाब्दिक वाद रंगताना दिसतोय. मुख्यमंत्री शिंदेंनी काल केलेल्या वक्तव्यावर औरंगाबाद दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी आज पुन्हा शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवं आव्हान दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यासमोर वरळी मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत का? चला तिथे पण लढू. वेदांता, फॉक्सकॉन महाराष्ट्रातून निघून गेल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलं होतं की, आपल्या राज्यातून उद्योग का बाहेर निघून जात आहेत ज्याच्यावर माझ्यासोबत समोरासमोर चर्चा करा. ते या चॅलेंजवर कुठेही बोलू शकले नाहीत. काही उत्तर देऊ शकले नाही, त्यानंतर एअरबस टाटा आपल्या राज्यातून गेलं, मेडिकल डिव्हाईज पार्क, बल्कड्रग पार्क, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल आणि अलीकडेचं मी एका बातमीत वाचलं 26 हजार कोटींचा एक प्रकल्पही आपल्या राज्यातून निघून गेला. अजूनही ते उद्योगावर उत्तर देऊ शकले नाहीत. आव्हान स्वीकारू शकले नाहीत. जसं गुवाहाटीला ते डोंगर-झाडी बघायला गेले होते, डाव्होसला ते बर्फ बघायला गेले होते. २८ तासांत ४० कोटी खर्च होऊ कसा शकतो? तुम्ही उधळपट्टी करायचं जरी ठरवलं, तरी ४० कोटींचा खर्च होणार कसा? हा प्रश्न मला पडला. मी त्यांना म्हटलं यावर चर्चा करू. पण कुठेही त्यांच्याकडून उत्तर आलं नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना दिलं ‘हे’ नवं आव्हान

काल मी त्यांना सांगितलं होतं की, वरळीतून निवडणूक लढवून दाखवा. त्यावर काही उत्तर आलं नाही. मग मी त्यांना म्हटलं वरळीतून नाही, तर ठाण्यतून माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा. तिथे मी यायला तयार आहे. पण आज मी त्यांना अजून एक आव्हान देतोय. माझी पहिली आव्हानं त्यांना स्वीकारायची नसेल, माझ्यासमोर लढायची त्यांच्यात ताकद नसेल, हिंमत नसेल, तर एक सोपं आव्हान मी त्यांना देतो. येत्या अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण होण्याआधी या महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांना त्यांनी बदलून दाखवावं, असं नवं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

महाराष्ट्रासाठी दिल्लीत आवाज उठवणं गरजं, पण मुख्यमंत्री स्वत:साठी बोलले

महाराष्ट्रातील राज्यपालांनी महाराष्ट्र आणि देशाच्या महापुरुषांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचा अपमान करत आले आहेत. पण कुठेही त्यांना बदलण्याच्या हालचाली दिसत नाहीयेत. राज्यपालांनी स्वत: म्हटलंय की त्यांना बदली पाहिजे. पण मुख्यमंत्री कुठेही त्यावर एक शब्दही बोलत नाहीयेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचे विषय घेणं गरजेचं आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी दिल्लीत आवाज उठवणं गरजेचं आहे. दिल्लीत ते नेहमी स्वत:साठी बोलत आले. आज राज्यपालांविरोधात ते काहीच बोलले नाहीत. हे चित्र महाराष्ट्रासाठी घातक आहे. ही लढाई फक्त शिवसेनेसाठी महत्त्वाची नाही. आम्ही आधीही विरोधी पक्षात होतो, त्यात काहीही हरकत नाही. पण संविधान टिकणार की नाही यासाठी आमची ही लढाई आहे. आम्ही संविधानासाठी लढत आहोत, असही आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.

मी मुंबईतला रस्तेघोटाळा बाहेर काढला. माझ्या पत्रकार परिषदेनंतर पालिकेचा साधारण 450 कोटींचा खर्च वाचलाय. अजून त्यावर माझ्याकडे काही माहिती आली आहे, आम्ही बोलणार आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली.

ज्यांच्याकडे गर्दी नाही होत ते इथे लोकं पाठवतात

औरंगाबादमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्त्र डागत म्हटले की, औरंगाबादमधील आमची सभा हिट झाली. मात्र काही अज्ञात लोकं होती त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी शिवसंवाद सभेत शेतकरी बांधवांसोबत बोलत आहोत, जनतेचे प्रश्न ऐकून घेत आहे, त्यांची निवेदनं घेत आहे. ही लढाई देशातील संविधान आणि लोकशाहीसाठी आहे एका पक्षासाठी नाही. आमच्या सभा चालू राहतात. काल छोटी बाचाबाची झाली असेल मागे ते ठीक आहे. कदाचित हे गद्दारांच्या गटाने केलं असेल, ठीक आहे. ज्यांच्याकडे गर्दी नाही होत ते इथे लोकं पाठवत असतात, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.


RBI चा सामान्यांना ‘जोर का झटका’, रेपो दरात वाढ, EMI पुन्हा वाढणार, 6.50 टक्के नवा दर