घरताज्या घडामोडीसंघटना आणि राज्यावर 'ठाकरें'चाच अंकुश; 'सामान्य प्रशासन' मातोश्रीकडेच!

संघटना आणि राज्यावर ‘ठाकरें’चाच अंकुश; ‘सामान्य प्रशासन’ मातोश्रीकडेच!

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शॅडो मुख्यमंत्री कोण यावरुन शिवसेनेत ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चुरस लागली आहे. शिवसेनेत ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचे वाढणारे प्रस्थ पाहता शिवसेनेच्या वाट्यातील महत्वाची खाती देसाई यांच्याकडे देण्यासाठी शिवसेनेतील एक गट कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती 'आपलं महानगर'ला मिळाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन महिना उलटला. पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात सर्वच्या सर्व जागा भरत आता ३३ कॅबिनेटमंत्री आणि १० राज्यमंत्र्यांचा शपथविधीलाही ७२ तास उलटून गेले आहेत. तरीही अद्याप मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. तीनही पक्षात मिळालेल्या खात्यांवरुन असलेली नाराजी आणि मलईदार खाती मिळवण्यासाठी चाललेली धडपड पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चांगलीच कसोटी लागली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी रात्रीपर्यंत खातेवाटप जाहीर झालेले असेल असा दावा केला असला, तरी शिवसेनेत दुसर्‍या क्रमांकावर कोण? यावरून बराच वाद सुरू आहे. मंत्रीमंडळ विस्तारावर नजर टाकली तर एकूण ४३ मंत्र्यांमध्ये ३३ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्री आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री तर काँग्रेसकडे १० कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री आहेत. त्यामुळे, शिवसेनेपेक्षा एक मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त मिळालं आहे.

सुभाष देसाईंसाठी शिवसेनेतलाच गट प्रयत्नशील?

पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: थेट मुख्यमंत्री झाले, तर पहिल्याच निवडणुकीत वरळी मतदारसंघातून निवडून येत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आमदार झाले. २९ वर्षीय आदित्य ठाकरे यांना पहिल्याच टर्ममध्ये थेट कॅबिनेटमंत्री केल्याने शिवसेनेतील अनेक नेते आणि संभाव्य मंत्रीपदाचे इच्छुक नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शॅडो मुख्यमंत्री कोण? यावरुन शिवसेनेत ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चुरस लागली आहे. शिवसेनेत ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचे वाढणारे प्रस्थ पाहता शिवसेनेच्या वाट्यातील महत्वाची खाती देसाई यांच्याकडे देण्यासाठी शिवसेनेतील एक गट कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे. शिवसेनेकडील गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता असल्याने एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्यासह एमएसआरडीसी हे पूर्वीचे खाते राहावे अशी बहुसंख्य आमदारांची मागणी असल्याचे समजते. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशामुळे आता मुख्यमंत्र्यांच्यानंतर कोण? हा प्रश्न उद्धव यांनी निकाली काढला असून, आता उद्धवजी आणि आदित्यजी हे संघटनेप्रमाणे राज्यही चालवतील, असे मत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

- Advertisement -

शॅडो मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच!

आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी उच्च शिक्षण आणि पर्यावर या दोन क्षेत्रांमध्ये चांगली कामं केली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पर्यावरण किंवा उच्च आणि तंत्रशिक्षण यापैकी एखादे खाते देण्यात येण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. मात्र, आदित्य यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत माहिती जनसंपर्क आणि माहिती तंत्रज्ञान यांपैकी एखादे खाते देण्याबाबत एकमत झाल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या या सामान्य प्रशासन विभागाकडूनच केल्या जातात. त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यानंतर जर आदित्यकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी द्यायची असेल, तर सामान्य प्रशासन विभागाचा अनुभव गाठी असावा म्हणून हा विभाग त्यांना देण्याबाबत एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे.

पक्षांतर्गत नाराजीचं उद्धव ठाकरे काय करणार?

त्यातच देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री असलेल्या रामदास कदम, दिवाकर रावते आणि तानाजी सावंत यांना मंत्रीपदावरुन डच्चू दिला, तर राज्यमंत्री असलेल्या रविंद्र वायकर आणि दीपक केसरकर यांनाही केवळ आमदारकीच दिली. त्यामुळे नव्या आणि जुन्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. तर नगर जिल्ह्यातून अपक्ष म्हणून पाठिंबा दिलेले शंकरराव गडाख यांना थेट कॅबिनेट आणि काँग्रेसमधून आलेल्या अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्री आणि शिरोळमधून अपक्ष निवडणूक लढवलेल्या राजेंद्र यड्रावकर यांचा समावेश केल्याने प्रचंड असंतोष शिवसेनेत सुरू झाला आहे. बाहेरुन आलेल्यांना थेट मंत्रीपद दिल्याने शिवसेनेतील दोन ते तीन टर्म आमदार असलेले आमदार सुनिल प्रभू, सुनिल राऊत, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, अनिल बाबर, आशिष जैसवाल आणि संजय रायमुलकर पक्षप्रमुखांवर नाराज आहेत. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधव यांनीही ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मंत्रीमंडळात समावेष्ट केले जाईल असा शब्द दिला होता. त्यामुळे माझ्याकडे असे कोणते गुण कमी पडले की ज्यामुळे माझा मंत्रीमंडळात समावेश झाला नाही? याबाबत आपण विचारणा करु’, अशी खंतही जाधव यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा – नाराज भास्कर जाधवांना संजय राऊतांच्या कानपिचक्या!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -