..आता यांचा खरा चेहरा समोर यायला लागलाय, आमदारांच्या फोटो हटवण्यावर आदित्य ठाकरेंची टीका

aaditya thakre

औरंगाबादमधील शिवसेनचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे यांचा फोटो हटवला आहे. याशीवाय शिंदे गटातील काही आमदारांनी आपल्या कार्यालयातील ठाकरे पितापुत्रांचे फोटो हटवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शिवसंवाद यात्रेवर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लक्ष्य केले आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले – 

आता बंडखोरांचा खरा चेहरा समोर यायला सुरुवात झाली आहे. गेले महिनाभर हे बंडखोर म्हणत होते की, आमचे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. आदित्य ठाकरे हे आमच्यासाठी मुलासारखे आहेत, असे बंडखोर सांगत होते. पण आता यांचा खरा चेहरा समोर यायला लागला आहे. गद्दार हे गद्दारच असतात, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

तानाजी सावंतांच्या टीकेला उत्तर –

यावेळी आदित्य ठाकरे हे साधे आमदार आहेत, त्यापलीकडे त्यांना महत्त्व नाही, असे तानाजी सावंत यांनी म्हटले होते. यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, तानाजी सावंत यांना भ्रमात राहू द्या. महाराष्ट्रात शिवसेनेला आणि ठाकरेंना एकटे पाडण्याचा कट गद्दारांनी आखला आहे. पण जनता आम्हाला प्रेम देत आहे. जनता आम्हाला एकटे पडू देणार नाही, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी आमदार तानाजी सावंत यांना दिले.