घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदोन वर्षांनंतर यंदा आठ ठिकाणी रावण दहन

दोन वर्षांनंतर यंदा आठ ठिकाणी रावण दहन

Subscribe

नाशिक : कोरोना संसर्गामुळे दहनाच्या चटक्यापासून सलग दोन वर्ष रावणाची सुटका झाली होती. गेल्या वर्षीही राज्यभर रावण दहन कार्यक्रमांवर राज्य सरकारने निर्बंध लादले होते. यंदा मात्र कोरोनाचे सावट पूर्णत: मिटल्याने सर्वत्र रावण दहनाचे कार्यक्रम उत्साहात होणार आहे. त्याची तयारीही पंचवटीसह नाशिकरोड, सातपूर, गंगापूर रोड आणि सिडको परिसरात केेली जात आहे. महत्वाचे म्हणजे महापालिकेची निवडणूक आता कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने यंदा कार्यक्रमांत अधिक उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, पोलिसांच्या नोंदीनुसार शहरात सात ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम होणार आहे.

रामकुंड येथे यंदा ६० फूट उंचीच्या रावणाचे दहन केले जाणार आहे. पंंचवटी परिसरात विजयादशमी म्हणजेच दसर्‍याच्या दिवशी रामकुंड येथे चतुःसंप्रदाय आखाडा आणि चौंडेश्वरी नगर येथे चौंडेश्वरी देवी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बुधवारी (दि.५) सायंकाळी ७ वाजता रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. चतुःसंप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या रावणदहनाच्या परंपरेचे यंदाचे ५५ वर्ष असून, विजयादशमीला होणारा हा कार्यक्रम नाशिककरांचे आकर्षण ठरत आला आहे. यंदा साठ फूट उंचीचा रावणाचा प्रतिकात्मक पूतळा उभारण्यात येत असून, त्याचे काम सध्या सुरु आहे.

- Advertisement -

आखाड्याचे तत्कालिन महंत दीनबंधुदास महाराज यांनी १९६७ ला रामकुंड परिसरात प्रथम रावणदहन सुरु केले. त्यानंतर ही परंपरा महंत कृष्णचरणदास महाराज यांनी पुढे सुरु ठेवली आहे. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंध असल्याने ही परंपरा खंडीत झाली होती. यंदा मोठ्या उत्साहात रावणदहनाची तयारी करण्यात येते आहे. मूर्तीकार सुनील मोदवाणी हे रावणाचा दहातोंडाचा साठ फूटी उंचीचा प्रतिकात्मक पूतळा तयार करीत आहेत. विजयादशमीला रावणदहनाच्या अगोदर पंचवटी परिसरात वानरसेनेसह राम, लक्ष्मण, हनुमान, रावण, बिभिषण यांचे वेशभूषा करून परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर रामकुंड परिसरात फटाक्यांची आकर्षक आतषबाजी होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत रावणदहन केले जाणार असल्याचे महंत कृष्णचरणदास महाराज व बालाजी भक्त मंडळाने सांगितले.

या ठिकाणी होणार रावण दहन 
  • यशवंत पटांगण, रामकुंड
  • चौंडेश्वरीनगर, आडगाव
  • लभडेनगर, आडगाव
  • खंडोबा मंदिर, आडगाव
  • दत्त मंदिरसमोर, कोणार्कनगर
  • शिंदे गल्ली, मेन रोड, आडगाव
  • वेल्फर मैदान, गांधीनगर
  • शिवसत्य मैदान, गंगापूर रोड
गंगापूर रोडला डिजिटल रावण

गंगापूर रोडवरील श्री तुळजाभवानी मंदिर शारदीय नवरात्र उत्सवांतर्गत विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता ६० फूट उंच रावणाचे दहन करण्यात येणार आहे. या रावणाचे वैशिष्ठ्य म्हणजे रात्रीच्या वेळी रावणाचे डोळे, मुखवटा आणि हात चमकावे म्हणून डिजिटल लाईटींग लावण्यात येते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार आणि पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे उपस्थित असतील. यावेळी शस्त्रपूजन व फटाक्यांची आतषबाजी होणार असल्याचे आमदार सीमा हिरे व नगरसेवक योगेश हिरे यांनी सांगितले.

- Advertisement -
चौंडेश्वरी चौकात २५ फुटी रावण

गेल्या ७ वर्षांपासून चौंडेश्वरी देवी सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्यावतीने रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यंदा माजी स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शंकर वाडेकर यांनी दिली. यंदा २५ फुटी रावणाचे दहन करण्यात येणार अ्राहे. रुख्मिणी लॉन्स शेजारील जागेत सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

रावण दहनाला आदिवासी समाजाच्या संघटनांचा विरोध

एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा दीपाली बांडे यांनी नाशिक जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांना निवेदन देत रावणदहनाला विरोध असल्याचे सांगितले आहे. आदिवासी राजा महात्मा रावण यांच्याबद्दल समाजात आस्था आहे.काही धार्मिक संघनांकडून रावण दहन करत आदिवासी समाजाच्या सन्मानाला जाणूनबुजून ठेच पोहोचविण्याचे काम केले जाते. जे कोणी विजयादशमीच्या दिवशी राजा महात्मा रावण यांच्या पुतळ्याचे दहन करेल त्या मंडळांवर भादंवि कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -