अरे कुठे आहे गतिमान महाराष्ट्र; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

Ajit-Pawar
Ajit pawar Cleares his stand on Entre in BJP

अहमदनगरः निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतीमान या जाहिरातीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलाच टोला हाणला आहे. अरे कुठे आहे गतिमान महाराष्ट्र, असा निशाणा अजित पवार यांनी साधला आहे.

अजित पवार म्हणाले, महागाई वेगाने वाढते आहे. महागाईवर ना केंद्र सरकारकडे उत्तर आहे ना राज्य सरकारकडे. तरीही शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र गतीमान अशा घोषणा दिल्या आहेत. कुठे आहे गतिमान?, वर्तमानपत्रात फक्त यांच्या जाहिराती दिसतात. येथे शेतकरी हताश झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जाहिरातींवर एक हजार कोटी खर्च केले. तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते. शेतकऱ्यांच्या मालाला किमत मिळावी म्हणून खर्च केले असते तर आम्ही मानलं असतं.

पुढे अजित पवार म्हणाले, मीही राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. जाहिरातींवर एवढा खर्च कधीच केला नाही. जाहिरातींवर एवढा खर्च करण्याची गरजच नाही. हे काय काम करतात हेच जनतेला कळत नाही. म्हणूनच यांची जाहिरातबाजी सुरु आहे. अर्थसकंल्पिय अधिवेशनात रोज आम्ही पायऱ्यांवर बसून आंदोलन करायचो. आणि यांनी एवढ्या घोषणा केल्या की त्यांच्याही लक्षात राहिल्या असतील की नाही हे माहीत नाही. जनतेला बरं वाटावं म्हणून हे घोषणा करत राहिले. लोकांना स्वप्न दाखवत राहिले. पावसाळी अधिवेशनात आम्ही याबाबत नक्कीच प्रश्न उपस्थित करणार आहोत.

आनंदाचा शिधावरुनही अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला. यांनी ऐटीत सांगितलं की गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा देणार. यांचा आनंदाचा शिधा काही मिळाला नाही. सरळ सांगायचं होतं की २०२३ नाही २०२४ च्या गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा देणार आहोत. आम्ही समजून घेतलं असतं, अशी टीका अजित पवार यांनी केली.

अहमनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक चेअरमनच्या निवडणुकीवरुनही अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. अजित पवार म्हणाले,  दिवसा आमच्याबरोबर आणि मतदानाला त्यांच्याबरोबर अशी लोकं येथे असतील तर त्यांच काही खरं नाही. आम्ही गरीबाकडे मत मागू. गरीब प्रामाणिक असतात.