घरमहाराष्ट्रस्व.धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नीला स्थानबद्ध करुन काय मिळवलं? अजित पवार

स्व.धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नीला स्थानबद्ध करुन काय मिळवलं? अजित पवार

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा धुळे जिल्ह्यातून सुरु झाला. महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आत्महत्या केलेले धुळे जिल्ह्यातील शेतकरी स्व. धर्मा पाटील यांच्या ७२ वर्षीय विधवा पत्नी सखुबाई यांना स्थानबद्ध करण्यात आले. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. “स्व. धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी तुमच्या यात्रेत कोणती आडकाठी आणणार होत्या? त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे काय कारण? सखुबाईंना हा धक्का सहन न झाल्यामुळे त्या आजारी पडल्या असून त्यांना उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.” अशी माहिती अजित पवार यांनी दिली. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते.

- Advertisement -

अजित पवार पुढे म्हणाले की, “आम्ही सत्तेत असताना असे कधी केले नव्हते. राज्यात दौरे करताना ज्या लोकांमध्ये रोष आहे, त्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले होते. त्यांच्या संतापाला सामोरे गेलो. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तिला त्याचे म्हणणे मांडण्याचा अधिकार राज्य घटनेने दिलेला आहे. सरकार लोकांची मुस्कटदाबी करु शकत नाही.”

निवडणुकीच्या तोंडावर माझ्यावर आरोप

राज्य सहकारी बँकेत कर्ज वाटपात घोटाळा झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने ७७ लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये अजित पवार यांचेही नाव आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, “कालच माझ्या बाबतीत बातमी आली आहे. मी बँकेच्या बोर्डावर होतो. पण कर्ज वाटप कमिटीच्या बैठकीत माझा काहीही संबंध नसायचा. माझे म्हणणे मी वकीलामार्फत पाठवले आहे. नेमक्या निवडणुका आल्यानंतरच असे आदेश कसे काय निघतात. दोन दिवसांपासून नोटीशीचा खेळ चालू आहे. राज ठाकरे यांना नुकतेच नऊ तास बसवून ईडीने चौकशी केली. कायदे सर्वांना सारखे असतात, याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.”

- Advertisement -

आमच्या विचारांचे आमदार निवडून द्या. सहा महिन्यात सर्व सरकारी जागा मेरिटप्रमाणे भरू. तसेच मतदान करायला गेल्यावर बटण दाबताना विचार करा. ही काही देशाची निवडणूक नाही. ३७० कलम आणि राज्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्हाला रोजगार, शेतकऱ्यांना मदत देणारे सरकार निवडा, असेही आवाहन अजित पवार यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -