घरमहाराष्ट्रकुणी इतके दुटप्पी वागू नये अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

कुणी इतके दुटप्पी वागू नये अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचा १९९९ मध्ये जन्म झाल्यापासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, असा आरोप कोकण दौर्‍यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केलेला आरोप धादांत खोटा आणि बिनबुडाचा आहे. शरद पवार यांचे नाव घेतले की बातमी होते. त्यामुळेच अशा प्रकारचे वक्तव्य केले जाते. राज ठाकरे ज्यावेळेस त्यांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते. म्हणजे माणसाने इतके दुटप्पी वागू नये, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांना ५५ वर्षांपासून उभा महाराष्ट्र ओळखत आहे. ५५ वर्षांत त्यांनी नेहमी शाहू- फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. तशाच पद्धतीने सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले. तसेच राज ठाकरेंचा आरोप हास्यास्पद असल्याचे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

पुरंदरेंचे गौरव करणारे विधान नाही
दरम्यान, राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांचा गौरव करणारे एकही विधान मी केले नाही, असा खुलासा ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केला आहे. कोल्हापुरात असताना राज ठाकरे यांनी माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते घरी आले. आमच्यात प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली. बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल माझी राज ठाकरे यांच्याशी अजिबात चर्चा झाली नाही. पत्रकारांशी बोलताना मी त्यांचे गौरवीकरण केलेले नाही. आजवर मी पुरंदरेंच्या विकृत आणि अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आहे आणि त्यावर आजही ठाम आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -