मुंबईचा मीत शाह सीए परीक्षेत देशात अव्वल

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियामार्फत (आयसीएआय) मेमध्ये घेण्यात आलेल्या सीए (चार्टर्ड अकाऊंट्स) अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मुंबईचा मीत शाह हा ८०.२५ टक्के गुण मिळवून देशात पहिला आला आहे, तर जयपूरचा अक्षत गोयल दुसरा आणि सुरतची सृष्टी केयूरभाई संघवी ही तिसरी आली आहे. यंदा विक्रमी वेळेत हा निकाल जाहीर केल्याचे आयसीएआयकडून सांगण्यात आले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियामार्फत घेतलेल्या सीएच्या परीक्षेला देशातून एक लाख १८ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. देशातील विविध शहरांमध्ये ४८९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत ग्रुप-१साठी ६६ हजार ५७५ विद्यार्थी बसले होते. त्यातील १४ हजार ६४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ग्रुप-१ चा निकाल २१.९९ टक्के इतका लागला. तसेच ग्रुप-२चा निकाल २१.९४ टक्के इतका लागला.

दोन्ही ग्रुपसाठी देशभरातून २९ हजार ३४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३६९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या दोन्ही ग्रुपचा निकाल सर्वांत कमी म्हणजे १२.५९ टक्के इतका लागला. सीएच्या अंतिम परीक्षेसाठी आपण खूप परिश्रम केले हेाते. टॉपरमध्ये असेन असे वाटले होते, मात्र आता देशात पहिला आल्याने खूप आनंद झाल्याचे मीत शाहने सांगितले.

सध्या सीएची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र पुरवठा पुरेसा नाही. त्या पार्श्वभूमीवर सीएच्या पेपर तपासणीच्या पद्धतीमध्ये सुधारणा करून कमी कालावधीत निकाल जाहीर केल्याचे आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि प्रत्यक्ष कर समितीचे अध्यक्ष सीए चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले.