राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त, पवारांचा मोठा निर्णय

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आगामी महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने हा बरखास्तीचा निर्णय घेताना महाराष्ट्रातील सर्व विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी कायम ठेवल्या आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी एक पत्र सगळ्या सेलच्या प्रमुखांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांची सही असलेल्या या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या सेलच्या आणि विभागाच्या कार्यकारिणी बरखास्त केल्याचे म्हटले आहे. हा निर्णय देशपातळीवर लागू झाला आहे. मात्र, हा  बरखास्तीचा निर्णय घेण्यामागचे  कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. आता नवीन कार्यकारणी कधी जाहीर होते आणि त्यात कोणाला संधी मिळते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

याशिवाय, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांची कार्यकारिणी बरखास्त केलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या सगळ्या विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे.