घरठाणेनाणेघाटातील पायवाट दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

नाणेघाटातील पायवाट दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

Subscribe

हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज ज्या सह्याद्री पर्वतरांगांमधील दख्खनवरून कोकणात जाण्यासाठी नाणेघाटातील पायवाटेने मोहिमांवर जायचे त्या पायवाटेची वाट लावली असून या नाणेघाटातील पायवाट दुरूस्ती, पायऱ्या बसवणे, सुशोभीकरण इ. विकासकामांसाठी असलेला निधी थातूरमातूर कामे दाखवून लाटल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्याने या प्रकरणाची विभागीय चौकशी होऊन त्यामध्ये स्पष्टपणे भ्रष्टाचार उघड होऊनही अद्याप ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई होत नसल्याने समस्त शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ठाणे व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या तालुक्यातील मुरबाड तालुक्यातील नाणेघाट हा शिवकालीन दख्खनवरून कोकणात येणारा मार्ग होता. शिवनेरी किल्ल्याच्या अगदी जवळच हा नाणेघाट असून येथूनच छत्रपती शिवाजी महाराज हे समुद्र किनाऱ्यावरील किल्ले व आरमार यांची देखभाल करण्यासाठी प्रवास करीत असत. या नाणेघाटातील पायवाटेने व्यापारी जा ये करत.या घाटात दुर्गप्रेमी व पर्यटक यांची नेहमी वर्दळ असते. या नाणेघाटाचे महत्त्व लक्षात घेता शासनाने घाटाच्या सौदर्यीकरण व दुरूस्ती करिता पंच्याहत्तर लाखांचा निधी मंजूर केला. परंतू ही पायवाट करण्यासाठी पायवाटेची दुरूस्ती करणे, दगडी पाय-या बसवणे, रुंदीकरण, सुशोभीकरण आदी महत्वाची कामे थातुरमातुर करून ७५ लाखाचा निधी ठेकेदारांनी हडप केला असून तत्कालीन टोकावडे (दक्षिण) वनक्षेत्रपाल तुळशीराम हिरवे यांच्या संगनमताने ठेकेदारांनी हा भ्रष्टाचार करण्यात आल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या. विविध तक्रारदांराच्या रेट्याने उपमुख्य वनसंरक्षक आर.एस.कदम यांनी विभागीय वनाधिकारी (दक्षता) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने नाणेघाटप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले असून तसा अहवाल देखील सादर केला आहे.

- Advertisement -

चौकशीतील निष्कर्ष
ठेकेदारांने माॅर्टर विरहित घडीव पाय-या दगड बांधकामात पाय-या बांधल्याची नोंद मोजमाप पुस्तिकेत करण्यांत आली आहे,परंतु प्रत्यक्षात जागेवरच उपलब्ध असलेल्या निकृष्ट दर्जाच्या दगडांचा वापर पाय-याच्या बांधकामाठी करण्यात आला आहे. नाणेघाटातील पायवाटेच्या ठिकाणी प्रत्यक्षात कुठलेही खोदकाम न करता भिंतीसाठी खोदकाम केल्याची नोंद करण्यांत आली आहे. पाय-यांलगतच्या भिंती ड्रायरॅडम रबलद्रारे बांधल्याचे कागदोपत्री दर्शविण्यात आले असून प्रत्यक्ष जागेवर भिंतीसाठी झिजलेल्या दगडांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. मंजूर अंदाजपत्रकातील दरांनुसार दगडांची वाहतुक २६ किलोमिटर अंतरावरून केल्याचा दावा ठेकेदारांने केला आहे. वास्तविक बाहेरून दगड न आणता तेथीलच स्थानिक जागेवरील निकृष्ट दगडच वापरल्याने वाहतुकीचा प्रश्नच उद्भवत नाही.

” नाणेघाटातील कथीत भ्रष्टाचार प्रकरणी विभागीय चौकशी सुरू असून वनक्षेत्रपाल तुळशीराम हिरवे यांची पेन्शन सध्या तहकूब करण्यात आली आहे.”
-एस.वी. रामाराव, मुख्य वनसंरक्षक, (प्रादेशिक), ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -