आमिषाला बळी पडू नका; संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करा, अजित पवारांचा सल्ला

ajit pawar

एकीकडे ठाण्यात आमिष दाखवत, फोडाफोडीच्या राजकारणाची जोरदार तयारी झाली आहे. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी च्या डझनभर माजी नगरसेवकांना आपल्या व्यह्युरचने ओढले असल्याचे चित्र निर्माण केले गेले आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी त्याच राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईत एक बैठक बोलवली होती. त्यामध्ये काही जण गैरहजर होते. यावेळी त्यांनी आमिषाला बळी पडू नका, तुमची फसवणुक केली जाऊ शकते. पुन्हा चांगले दिवस येणार आहात, थोडे दिवस थांबा, पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करा असा सल्ला दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

मागील काही दिवसापासून ठाणे,कळवा- मुंब्य्रात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांच्या पक्षातील काही माजी नगरसेवकांनी मुंब्रा विकास आघाडी उघडण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी उघड उघड आव्हाडांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे.त्यातच ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील प्रमुख पदाधिकारी हजर राहिल्याने मुल्ला देखील विरोधात गेले की काय? अशी चर्चा जोर धरु लागली होती. तर लोकमान्य नगर भागातील हणमंत जगदाळे यांनी आपल्या इतर तीन सहकाऱ्यांना हाताशी घेत राष्ट्रवादीचे घडय़ाळ उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी कोटयावधींचे आमिष दाखविले जात असल्याचे ट्विट स्वतः आव्हाड यांनी केले होते. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीमधील वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे दिसत आहे.

येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे १२ ते १६ माजी नगरेसवक फुटणार अशी देखील चर्चा रंगत असतानाच बुधवारी अजित पवार यांनी ठाण्यातील माजी नगरसेवकांची मुंबईत बैठक घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष आनंद परांजपे आदींसह इतर माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला. कुठेही जाण्याचा विचार करु नका, चांगले दिवस पुन्हा येणार आहेत, मनात संशय निर्माण होऊ देऊ नका, अमिषाला बळी न पडता पक्ष संघटना वाढविण्यावर भर द्या असा सल्लाही त्यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांनी दिली.

दरम्यान, या बैठकीला माजी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि त्यांच्या पॅनलमधील इतर तीन सदस्य, मुंब्य्रातील राजन किणी, पत्नी अनिता किणी आणि भाऊ तसेच जितेंद्र पाटील आदींसह अन्य दोन पदाधिकारी या बैठकीला गैरहजर राहिल्याचे दिसून आले. दुसरीकडे या बैठकीला नजीब मुल्ला देखील हजर नसल्याचे दिसून आले. परंतु ते दिल्लीला पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. तशी माहिती देखील त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली होती. असेही समजते.


हेही वाचा : चांदीच्या ताटात जेवायला मिळाले, तरी त्या जेवणाला आईच्या हाताची चव नाही – जितेंद्र आव्हाड