डिस्को, बार, पब आरोग्य केंद्रे आहेत का?, मंदिर उघडण्याच्या प्रश्नांवरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्य सरकारला मंदिराबाहेर हार, नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणाऱ्यांची उपासमार दिसत नाही.

Ashish Shelar
डिस्को, बार, पब आरोग्य केंद्रे आहेत का?, मंदिर उघडण्याच्या प्रश्नांवरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्यातील जनतेला सध्या मंदिरांपेक्षा आरोग्य मंदिरांची गरज असल्यामुळे आरोग्य केंद्र उघडण्यावर भर देत आहोत. आरोग्य केंद्र बंद करुन मंदिर उघडू का असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे. यावर भाजपकडून उत्तर देण्यात आलं असून मुख्यमंत्र्यांनाही सवाल करण्यात आला आहे. डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? असा खोचक प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवत आहेत. कोविड सेंटर, आरोग्य सुविधा सॅनिटायझर वाटप, सॅनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरणं समोर आली आहेत याबाबत मुख्यमंत्री भाष्य करत नसल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी आरोग्य केंद्रांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शेलार यांनी म्हटलं आहे की, डिस्को, बार, पब याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार आहेत. यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कोरोना काळात कोविड उपाययोजना, सॅनिटायझर वाटप, सॅनिटायझेशनच्या पुरवठाधारकाचे कमिशनचे प्रकार समोर आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार आहेत का? पब, रेस्टॉरंट, बार यांचे मालकांनी वाटाघाटी केली असल्याचा खुलासे होत आहेत. कमिशनबाबत धोरणात्मक निर्णय यांनी घेतला आहे का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

राज्य सरकारने एक्साईजची कमाई व्हावी म्हणून दारुची दुकानं सुरु केली आहेत. कामगारांची कारणं देऊन मॉल सुरु केले आहेत. परंतु राज्य सरकारला मंदिराबाहेर हार, नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणाऱ्यांची उपासमार दिसत नाही. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. नियमांनुसार मंदिर सुरु करुन बाहेर विक्रेते पोट भरु शकत नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

आरोग्य केंद्रे कुठे आहेत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्य केंद्रांबाबत बोलत आहेत. पालघरमधील आदिवासी पाड्यामध्ये गेल्या ६ महिन्यात एकूण ७४१ बालकांचा मृत्यू झाला आहे. कुठे आहे आरोग्य व्यवस्था, आरोग्य केंद्रे कुठे आहेत? महानगरपालिकेच्या रुग्णालयात रुग्णाचा डोळा कुरतडून खाल्यामुळे मृत्यू, सायन रुग्णालयात शवाच्या बाजूला रुग्णावर उपचार, कोविड सेंटरमध्ये प्रसाधनगृहात मृत्यू यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला आलं पाहिजे, फडणवीसांनंतर आशिष शेलारांचा राणेंना घरचा आहेर