महाराष्ट्रात बनावट कथानक रचण्याचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

जवळपास दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या वेदांता फॉक्सकॉनपाठोपाठ २२ हजार कोटींची गुंतवणूक असलेला टाटा एअर बसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. यावरून विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरले असताना आज केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रांजणगाव येथे इलेक्ट्रोनिक मॅन्युफॅक्चयुरिंग क्लस्टर मंजूर केले आहे

Dcm devendra fadanvis thank to vedanta group chairman anil agarwal and slams shivsena congress ncp mahavikas aghadi govt on Vedanta Foxconn Deal row

मुंबई : राज्यात गेल्या तीन महिन्यांत आमचे सरकार आल्यापासून बनावट कथानक( फेक नरेटिव्ह) तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत, असे सांगत काही राजकीय पक्ष आणि काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पत्रकार या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला. सत्ता गेल्याने विरोधकांच्या मनावर विपरीत परिणाम झाला आहे. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करू शकत नाहीत. त्यामुळे राज्याची जेवढी बदनामी कराल तेवढे तुम्हाला उघडे पाडणार, असा इशाराही त्यांनी दिला.

गुंतवणुकीचा बाप असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प महाराष्ट्रातच होणार, अशी ग्वाही देताना फडणवीस यांनी तुमच्या विरोधामुळे तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ शकला नाही. त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीवर बोलण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला उद्देशून केला. केंद्राच्या कंपनीचा ७५ टक्के हिस्सा असलेली सुरक्षित गुंतवणूक परत पाठवून तुम्ही महाराष्टाचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे आता गुंतवणुकीबद्दल बोलतात त्याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राच्याप्रति असलेली संवेदना तेव्हा कुठे गहाण ठेवली होती? असा परखड सवाल फडणवीस यांनी केला. तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा काही भाग केरळमध्ये होणार असल्याची चर्चा असली तरी हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्रातच व्हावा यासाठी सरकार प्रत्यनशील असल्याचे त्यांनी सांगितले.

जवळपास दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या वेदांता फॉक्सकॉनपाठोपाठ २२ हजार कोटींची गुंतवणूक असलेला टाटा एअर बसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. यावरून विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरले असताना आज केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रांजणगाव येथे इलेक्ट्रोनिक मॅन्युफॅक्चयुरिंग क्लस्टर मंजूर केले आहे. या निर्णयाची माहिती देताना फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांनी यावेळी फॉक्सकॉन आणि टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून का आणि कसे गेले याची सविस्तर माहिती दिली. आघाडीच्या गेल्या अडीच वर्षात भ्रष्टाचार, वसुली, गृहमंत्री तुरुंगात, असे भयानक वातावरण होते. त्यामुळे महाराष्ट्रात कुणी गुंतवणूक करायला तयार नव्हते. आता आम्ही महाराष्ट्राची विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचा प्रयत्न करीत असून मंत्रिमंडळ उपसमितीच्या एका बैठकीत आम्ही २५ हजार कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता दिल्याचे सांगताना फडणवीस यांनी येत्या दोन वर्षात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणू, अशी ग्वाही दिली. रांजणगाव प्रकल्पाच्या पाठोपाठ नवीन वर्षात केंद्र सरकार महाराष्ट्राला टेक्सटाईल पार्क देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सॅफ्रन प्रकल्पाबाबत कंपनीने मार्च २०२१ मध्ये ट्वीट करून प्रकल्प हैदराबादला जाणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार कारखाना सुरु होऊन उत्पादन सुरू झाले आहे. आघाडी सरकारच्या काळातच हा कारखाना हैदराबादला सुरु झाला असताना त्याचे खापर आमच्या माथी मारले जात आहे. त्यामुळे खोटे सांगताना काही मर्यादा पाळावी, असा टोला फडणवीस यांनी लगावला. आघाडीच्या काळात सॅफ्रन हैदराबादला गेले असताना शेंबडी पोरं घेऊन मोर्चा काढण्यात आला, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने मेडिकल डिव्हाईस पार्क आणि बल्ग ड्रग्ज पार्क महाराष्ट्राला दिले नाहीत, या विरोधकांच्या आरोपातील हवा फडणवीस यांनी यावेळी काढली. हे दोन्ही पार्क  महाराष्ट्राला देणार अशी घोषणा केंद्राने केल्याचे दाखवून द्या, असे आव्हान त्यांनी दिले. २२ हजार कोटीची गुंतवणूक असलेला टाटा एअर बसचा प्रकल्प गुजरातला जाणार हे सप्टेंबर २०२१ मध्येच निश्चित झाले होते, असा दावा फडणवीस यांनी वृत्तपत्रातील बातम्यांचा हवाला देत केला.आपण मुख्यमंत्री असताना २०१६ साली टाटा यांना भेटून हा प्रकल्प नागपूरला करण्याची विनंती केली होती.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्पर्धा होती. २०१९ मध्ये आम्ही गुजरातपेक्षा जास्त सवलती देण्याची तयारी केली होती. मात्र, आघाडीचे सरकार आल्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये कंपनीच्या प्रमुखांनी निर्णय बदलला. त्यांनी गुजराला जाण्याचा निर्णय घेतला होता. विरोधी पक्षनेता असताना या कंपनीच्या प्रमुखांना मी गुजरातला जाऊ नका, अशी विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सध्याचे  वातावरण गुंतवणुकीसाठी पोषक नसल्याची खंत व्यक्त केली होती, असे फडणवीस यांनी सांगितले. टाटा एअर बसच्या प्रकल्पाबाबत एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपण कळवले होते. तरीही सरकारकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. एअर बसचा प्रकल्प नागपूरला होणार होता म्हणून सरकारने जाणीवपूर्वक कृती केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

फॉक्सकॉनचा प्रकल्पही आघाडीने घालवला.तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही, असे सांगितले होते, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि निर्णय करा असे फॉक्सकॉन सांगत होते. तर आघाडी सरकारने कंपनीला आधी तुम्ही निर्णय घ्या अशी अट ठेवली होती. या वादात गुजरातने मंत्रिमंडळ बैठक घेऊन निर्णय घेतला. त्यामुळे फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक येऊ नये, महाराष्ट्र गुंतवणुकीपासून वंचित राहिला पाहिजे असे  महाविकास आघाडीचे षड्यंत्र तर नाही ना? अशी शंका उपस्थित करत फडणवीस यांनी प्रकल्प जाणे हे आघाडीचे पाप असून ते आमच्या माथी मारू नका, असे विरोधी पक्षाला बजावले.