अयोध्या दौरा हा धार्मिक कार्यक्रम, राजकीय शक्तिप्रदर्शन नाही, संजय राऊतांचं विधान

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेजी त्यांचा एक दिवसाचा अयोध्येत दौरा आहे. शिवसेनेनं नेहमीच अयोध्येच्या बाबतीत आस्था ठेवली आहे. जेव्हापासून आंदोलन सुरू झालंय, तेव्हापासून आणि नंतरही उद्धव ठाकरे दोन वेळा इकडे येऊन गेले, असंही संजय राऊत म्हणालेत.

मुंबईः अयोध्या दौरा हा आमचा धार्मिक कार्यक्रम आहे, राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा कोणताही इरादा नाही, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून, त्यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शनही घेतलंय. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.

आम्ही काल मुंबईतून इथे आलो आहोत, प्रभू श्रीरामाचं दर्शनही झालं. आणि आता तुमचं दर्शन करत आहे. 15 तारखेला आमच्या शिवसेनेचे नेते, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेजी त्यांचा एक दिवसाचा अयोध्येत दौरा आहे. शिवसेनेनं नेहमीच अयोध्येच्या बाबतीत आस्था ठेवली आहे. जेव्हापासून आंदोलन सुरू झालंय, तेव्हापासून आणि नंतरही उद्धव ठाकरे दोन वेळा इकडे येऊन गेले, असंही संजय राऊत म्हणालेत.

मुख्यमंत्री नव्हते तेव्हासुद्धा आले, आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर एका आस्थेनं रामलल्लाचं दर्शन करून गेले. आमच्या सगळ्यांची एक भावना आहे. अयोध्येत येण्यानं आम्हाला एक ऊर्जा मिळते. एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. शिंदेसाहेबही सांगत होते, इथे आल्यानंतर मोठी ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जातो. महाराष्ट्रात आमच्या हातून मोठं काम होतं. देशासाठी, समाजासाठी, दोन वर्षांपासून आमच्या यायचा प्लॅन होता, पण कोविड होते, अनेक समस्या होत्या. त्यामुळे आम्ही येऊ शकलो नसल्याचंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.


आता सगळं काही उघडलंय. तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं की, अयोध्येला जाऊन या. दर्शन घ्या, आदित्यसुद्धा येऊ इच्छितो. 15 तारखेला आदित्य सकाळी लखनऊला येणार आहेत. दर्शन घेतल्यानंतर दुपारी 12 वाजता पत्रकारांशी बातचीत करतील. इस्कॉनच्या मंदिरातही जायचं त्यांचं नियोजन आहे. संध्याकाळी शरयूवर मोठी आरती होणार आहे. हा आमचा धार्मिक कार्यक्रम आहे, राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा कोणताही इरादा नाही, असंही ते म्हणालेत.


हेही वाचाः मनसेनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी घेतले श्रीरामाचे दर्शन, आदित्य ठाकरेंच्या आगमनासाठी जय्यत तयारीला सुरूवात