Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’चा तडाखा बसण्याची भाजपाला भीती, ठाकरे गटाची टीका

महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’चा तडाखा बसण्याची भाजपाला भीती, ठाकरे गटाची टीका

Subscribe

मुंबई : भाजपाच्या (BJP) ‘चाणक्यां’चे मुंबई-महाराष्ट्रातील दौरे अलीकडे वरचेवर होऊ लागले आहेत. कारण स्पष्ट आहे. महाविकास आघाडीच्या (Maharashtra Vikas Aghadi) ‘वज्रमुठी’च्या तडाख्याने 2019मध्ये त्यांचा येथील सत्तेचा घास हिरावला गेला आहे. त्यात आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबईसह इतर महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका त्यांना खुणावू लागल्या आहेत. 2019मधील सत्ता गेल्याची तगमग आणि आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’चा तडाखा बसण्याची भीती, यामुळे या भाजपावाल्यांचा जीव कासावीस होत असावा आणि त्यातून मुंबई आणि महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम जास्तच उतू जात असावे, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे.

निवडणुका असोत अथवा नसोत, भाजपाच्या नेते मंडळींचे दौरे, बैठका, चर्चा फक्त राजकीय लाभहानीचे हिशेब करण्यासाठीच असतात. विद्यमान भाजपाश्रेष्ठी तर त्यांच्या भक्तमंडळींना या हिशेबात अतिहुशार आणि सत्ताकारणाच्या जुगारातील ‘चाणक्य’ वगैरे वाटतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मध्यंतरी कसल्या ना कसल्या उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात येऊन गेले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांचेही दिल्ली-मुंबई-महाराष्ट्र असे ‘अप-डाऊन’ वाढले आहे. वरचेवर ते नागपूर, कोल्हापूर, पुणे असे येत असतात. मुंबईवर तर त्यांचे विशेष प्रेम आहे. मुंबई महापालिकेवरही त्यांचा डोळा आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात त्यांनी दोनदा मुंबईला भेट दिली. रविवारच्या भेटीत त्यांनी म्हणे येथील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. ‘मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची कामगिरी चांगली असेल. विकासकामांमुळे जनता भाजपकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे,’ वगैरे वगैरे फीडबॅक अमित शहा यांना भाजप नेत्यांनी दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

अमित शाह यांनी म्हणे, भाजपमधील ‘इन्कमिंग’चाही आढावा घेतला. आता शहा किंवा त्यांच्या इतर नेत्यांनी त्यांच्या पक्षाचा, पक्षातील ‘इन्कमिंग’ वगैरेचा आढावा घ्यायचा की अन्य काही ‘जोर-बैठका’ मारायच्या हा त्यांचा प्रश्न. मात्र महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केल्यापासून झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मिंधे गट-भाजपा युतीला का माती खावी लागत आहे? या प्रश्नाचेही उत्तर शोधण्याचा प्रयत्न ‘इन्कमिंग’च्या स्वानंदात मशगुल असणाऱ्यांनी खरे तर करायला हवा, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -