घरमहाराष्ट्रपालघरची जागा शिवसेनेलाच!

पालघरची जागा शिवसेनेलाच!

Subscribe

पालघर मतदारसंघावरुन शिवसेना आणि भाजपच्या युतीत तडा गेला होता. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पडती बाजू घेत हा मतदारसंघ शिवसनेला दिला आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी पालघरची जागा नेमकी कुणाला? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र पालघरची जागा शिवसेनेसाठी सोडल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आपलं महानगरशी खासगीत बोलताना सांगितले. युती करताना ‘पालघरची जागा ही शिवसेनेला सोडावी’, अशी अट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर भाजपच्या पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी ‘जर ही जागा शिवसेनेला जात असेल तर आम्ही आमच्या पदांचा राजीनामा देऊ’, असे जाहीर करून आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शब्दामुळे पालघरची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याचे भाजपच्या या वरिष्ठ नेत्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले. दरम्यान, ‘ही जागा शिवसेनेला सोडल्यामुळे कार्यकर्ते नाराज होतील. पण, पक्ष त्यांची समजूत काढेल आणि युतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्ते काम करतील’, असा विश्वास देखील या नेत्याने आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केला.

युतीसाठी भाजपने सोडली जागा

दरम्यान १९९६ मध्ये शिवसेनेने भाजपच्या ताब्यात असलेला ठाणे मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला. तेव्हापासून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत गेली. आता पालघर मतदारसंघ शिवसेनेला दिल्यास ठाण्याप्रमाणेच पालघरमध्येही समस्थिती निर्माण होईल, म्हणून हा मतदारसंघ भाजपकडेच रहावा, अशी मागणी स्थानिक भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच याबाबत खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, ‘शिवसेना पालघर जागेवर ठाम असल्याने उगाच या जागेवरून पुन्हा युतीमध्ये वाद नको’, अशीच काहीशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे कळत आहे.

- Advertisement -

शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू

पालघरची जागा शिवसेना लढवणार हे जवळपास निश्चित झाल्यामुळे शिवसेना आपल्या पक्षबांधणीच्या कामाला देखील लागली आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका प्रमुख तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना मातोश्रीवर बोलावून, जे पदाधिकारी सक्रिय नाहीत त्यांना बदलून नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करा, तसेच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांला निवडणूकसाठी सज्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काँग्रेस सोडलेल्या गावितांचे काय?

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पालघर पोट निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची साथ सोडून गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश करत विजय संपादन केला होता. मात्र आता पुन्हा ही जागा शिवसेनेकडे जाणार असून, श्रीनिवास वनगा शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या गवितांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –‘पालघर दणकून घेणार’ – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -