उदयनराजेंसाठी रामदास आठवलेंच्या खासदारकीवर संकट?

साताऱ्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते उदयनराजे भोसले यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी भाजपकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

Udayanraje bhosale
उदयनराजे भोसले

लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकीला निवडून आल्यानंतर देखील ऐन विधानसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि खासदारकीचा देखील राजीनामा देणारे साताऱ्याचे माजी आमदार उदयनराजे भोसले यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकांसोबत झालेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांची मोठी नाचक्की झाली होती. तसेच, राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन भाजपचा हात धरण्याचं धाडस त्यांच्या चांगलंच अंगलट आलं होतं. मात्र, आता त्यांचं भाजपकडून पुनर्वसन होणार असल्याचं बोललं जात आहे.

उदयनराजेंना राज्यसभेत पाठवणार!

शिवछत्रपतींचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांना भाजपकडून राज्यसभेत पाठवले जाण्याची शक्यता आहे. येत्या मार्च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अॅड. माजिद मेनन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे आणि आरपीआयचे रामदास आठवले, तसेच अपक्ष संजय काकडे यांची राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यापैकी आरपीआयचे रामदास आठवले हे भाजपसोबत आहेत. त्यामुळे अमर साबळे किंवा रामदास आठवले यांच्या जागी उदयनराजे भोसलेंना पाठवण्याचा निर्णय भाजपकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – उदयनराजेंना लोकशाही माहीत नाही, ते अजूनही सरंजामशाहीतच-जितेंद्र आव्हाड

आठवलेंना दिलेल्या आश्वासनाचं काय?

दरम्यान, रामदास आठवलेंना लोकसभा निवडणुकांवेळी भाजपप्रणीत एनडीएसोबत येण्यासाठी राज्यसभेची उमेदवारी देऊ करण्यात आली होती. त्यामुळे मंत्रीपदाची मागणी करूनही फक्त राज्यसभेची उमेदवारी पदरी पडलेले रामदास आठवले खासदारकी सोडण्यासाठी कितपत तयार होतील, हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.