नागपूर – अमरावती लोकसभा मतदारसंघ महायुतीत भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला आहे. येथून भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. मात्र स्थानिक भाजप कार्यकर्ते हे राणांच्या विराधात गेले आहेत. कोणालाही उमेदवारी द्या पण नवनीत राणा नको, अशी भूमिका स्थानिक भाजप नेते, कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पताबद्दलचा रोष व्यक्त केला आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव अमरावती लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. भाजपने रामटेकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहील आणि अमरावतीतून भाजप उमेदवार निवडणूक लढेल असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यानंतर विद्यमान खासदार नवनीत राणा यांना येथून उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. भाजपने येथे कायम रवी आणि नवनीत राणाविरुद्ध निवडणूक लढली आहे. पक्षाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तर कालपर्यंत ज्यांच्याविरोधात प्रचार केला, उद्या त्यांच्याचसाठी मते मागण्याची वेळ स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांवर येणार आहे. यामुळे अमरावती भाजपचे झाडून सर्व कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर ठाण मांडून होते. काहीही करा, पण नवनीत राणा यांना उमदेवारी देऊ नका, असे साकडेच त्यांनी फडणवीसांना घातले आहे.
हेही वाचा : MVA Mumbai : काँग्रेसलाही सन्मानपूर्वक जागा हव्या; मुंबईत ठाकरे गटाऐवढीच आमची ताकद – वर्षा गायकवाड
बच्चू कडूंचीही वेगळी भूमिका
महायुतीतील प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनीही युतीच्याविरोधात भूमिका घेतली आहे. जागावाटपात आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, असे म्हणत त्यांनी भाजपविरोधात अमरावतीतून उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिले आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात राणा या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. यावर 1 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याने भाजपाकडून अद्याप तरी त्यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे, राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर निकाल लागल्यानंतर लगेचच 2 एप्रिलला भाजप त्यांची उमेदवारी घोषित करण्याची शक्यता आहे. यानंतर 4 एप्रिलला त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील असे बोलले जात आहे. मात्र भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनीच राणांविरोधात मोर्चा उघडल्यामुळे आता त्या अपक्ष लढणार की भाजपाच्या तिकीटावर, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : VBA : मविआकडून वंचितला 5 जागांचा प्रस्ताव नाही; प्रकाश आंबेडकर उद्या जाहीर करणार भूमिका