घरमहाराष्ट्रBMC Covid Scam : ईडीच्या रडारवर पुन्हा आयुक्त चहल; पत्र लिहून पालिकेकडे...

BMC Covid Scam : ईडीच्या रडारवर पुन्हा आयुक्त चहल; पत्र लिहून पालिकेकडे मागितला खर्चाचा तपशील

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याच्या चौकशीचा फास सक्तवसुली संचालनालयाने (ED) आणखी आवळला आहे. या प्रकरणाच्या खर्चाचा संपूर्ण तपशील ईडीला हवा असून यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र पाठविले आहे. याप्रकरणी ईडीने आधीच काही ठिकाणी छापेमारी केली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी सूरज चव्हाण आणि सनदी अधिकारी संजीव जयस्वाल ईडीच्या रडावर आहेत. यापैकी सूरज चव्हाण आणि संजीव जयस्वाल यांची चौकशी सुरू आहे.

कोविड सेंटरचे कंत्राट लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला देण्यात आले. या कंत्राटाचे 22 कोटी रुपयांचा शेल कंपन्यांद्वारे गैरव्यवहार करण्यात आल्याचे ईडी तपासात समोर आले असल्याचे सांगण्यात येते. मुंबई महापालिकेने जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला दिले होते. यासंदर्भातील 3 जुलै 2020 रोजीच्या पत्रावर आयुक्त चहल आणि तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. महापालिकेने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या सेवा आणि साहित्यासाठी दिलेल्या 32 कोटी रुपयांपैकी सुमारे 22 कोटी रुपयांचे शेल कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करण्यात आले, असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

कोविडकाळात मध्यवर्ती खरेदी केंद्रामार्फत कोरोनाविषयक औषधे आणि उपकरणांसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. विशेष म्हणजे, एरवीदेखील या केंद्रामार्फत वर्षाला 7 ते 8 हजार कोटी रुपयांची खरेदी केली जाते. या खरेदी केंद्राची पूर्ण जबाबदारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कोरोना काळात त्यांच्याच देखरेखीखाली कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. त्या काळातील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचे निर्णय आयुक्त चहल आणि पी. वेलरासू यांनी घेतले. त्यामुळे संशयाची सुई आयुक्त चहल आणि अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांच्यावर देखील आहे. त्यातच आता ईडीने आयुक्त चहल यांना पत्र पाठवून या सर्व खर्चांचा तपशील मागितला आहे. त्यामुळे यात चहल, वेलरासू यांच्यासह शासकीय अधिकारी, नेते मंडळींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

संजीव जयस्वाल यांची ईडी चौकशी

मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यांची ईडीने शुक्रवारी त्यांची साधारणपणे दहा तास चौकशी केली. काही दिवसांपूर्वी ईडीकडून मुंबई पालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी 21 जून रोजी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. ईडीने जयस्वाल यांच्या वांद्रे येथील निवासस्थानीही ईडीने छापा टाकला होता. त्यांनी जयस्वाल यांच्या घरातून 13 लाख रुपये रोख आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. त्यांची 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता असून त्याबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, ही सर्व मालमत्ता आपल्या पत्नीला माहेरकडून स्त्रीधन म्हणून 25 वर्षांपूर्वी मिळाली होती. आयएएसमध्ये दाखल होण्या आधीपासूनची ही मालमत्ता असून वेळोवेळी प्राप्तिकर विवरण-पत्रात त्याचा उल्लेख असल्याचे जयस्वाल यांनी ईडी अधिकार्‍यांना सांगितल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -