राणा दाम्पत्याच्या घरात नियमबाह्य बांधकाम, बीएमसी बजावणार नोटीस

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्याशी पंगा घेणारे खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांच्या खार येथील घरात नियमबाह्य बांधकाम झाल्याचे पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीत उघडकीस आले आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्यांना पुन्हा नोटीस बजावणार आहे. यासंदर्भातील माहिती पालिकेच्या एच/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली आहे.

राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाच्या विषयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेशी पंगा घेतला. त्यावेळी, मातोश्रीमध्ये घुसून हनुमान चालीसाचे पठण करण्याचे उघड उघड आव्हान दिले होते. त्यामुळे मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्याना रोखण्यासाठी शिवसैनिक जमले होते. कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी त्यांना कायदेशीर प्रक्रिया राबवून घरातच रोखून धरले होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी राजद्रोहाचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर प्रकरण न्यायालयात जाऊन राणा दाम्पत्याला काही दिवस तुरुंगात जावे लागले होते. दरम्यान, नवनीत राणा यांना मानेचा त्रास झाल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर रवी राणा हे मात्र तुरुंगात होते. मात्र त्यानंतर न्यायालयाने त्यांना काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्यानुसार, ते तुरुंगाबाहेर आले.

दरम्यान, खार येथील १४ व्या रस्त्यावरील ‘लाव्ही’ इमारतीत राणा दाम्पत्याचे ८ व्या मजल्यावरील ४१२ क्रमांकाचे घर असून तेथे नियमबाह्य बांधकाम झाल्याने पालिकेच्या पथकाने सदर बांधकाम तपासण्यासाठी राणा दाम्पत्याना मुंबई महापालिकेने ४८८ अन्वये नोटीस बजावली होती. मात्र पालिका पथक दोन दिवस राणा यांच्या घरी तपासणीसाठी गेले असतां ते घरात नसल्याने पथकाला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले होते.

मात्र अखेर राणा दाम्पत्य खार येथील घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर व त्यांनी दिल्ली गाठण्यापूर्वीच पालिकेच्या एच/पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारीच राणा यांच्या राहत्या घरी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी, राणा यांच्या घरात नियमबाह्यपणे वाढीव बांधकाम झाल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांना आढळून आले. यावेळी, अधिकाऱ्यांनी सदर घरातील नियमबाह्य बांधकामाचे फोटो घेतले. त्यामुळे आता राणा दाम्पत्यांना पुन्हा एकदा पालिकेकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त विसपुते यांनी सांगितले.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत १२१ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर ८२ रूग्ण कोरोनामुक्त