मराठी साहित्य संमेलनाच्या अंदाजपत्रकाला मुहूर्त मिळेना

अडीच ते तीन कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता

नाशिक – साहित्य संमेलनाचे अंदाजपत्रक अद्यायपावेतो आयोजकांकडून तयार झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संमेलनासाठी निधी संकलन सुरू आहे. संमेलनासाठी अडीच ते तीन कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे, अशी माहिती संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी कालिदास कलामंदिरातील साहित्य संमेलनाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जातेगावकर म्हणाले, साहित्य संमेलनासाठी देणगीदार पुढे येत आहेत. राज्य शासनाकडून ५० लाख रुपये, नाशिक महापालिकेकडून २५ लाख रुपये मिळणार आहेत. बांधकाम व्यावसायिक दीपक चांदे यांनी २५ लाख रुपये दिले आहेत. सारस्वत बँकेने १५, नामको बँकेने ११ लाख, राजाराम सहकारी बँकेने ५, लाल इलेक्ट्रॉनिकने २ लाख दिले आहेत. शिवाय, ऑनलाईन पद्धतीने अनेक बँका जाहिराती पाठवत आहेत. स्वागत समितीमध्ये १०० सदस्य आहेत. त्यातील ६० सदस्यांनी प्रत्येकी ५ हजार आणि ४० सदस्यांनी प्रत्येकी ३ हजार रुपये असे एकूण ३ लाख ६० हजार रुपये जमा झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्य संमेलनाचे निमंत्रण स्वीकारले असून, त्यांनी येणार असल्याचे कळविलेसुद्धा आहे. त्यांच्या प्रकृतीमुळे ते संमेलनास येणार आहेत की नाही, याबाबत कल्पना नाही. त्यांच्याकडून येणार नसल्याचे अद्यापपावेतो कळविण्यात आलेले नाही, असे जातेगावकर यांनी सांगितले. यावेळी कार्यवाह संजय करंजकर, मुकुंद कुलकर्णी, प्राचार्य प्रशांत पाटील, सुभाष पाटील, दिलीप साळवेकर, अमोल जोशी आदी उपस्थित होते.

सभामंडपाबाबत प्रमुख कार्यवाहांचे तोंडावर बोट

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मुख्य सभामंडपास नावे देण्याची मागणी मनसे केली असली तरी अद्यापपावेतो संमेलनस्थळी मंडपांना नावे देण्यात आलेली नाहीत. संमेलनस्थळास कुसुमाग्रजनगरी नावे दिले असून, इतर नावे दिली जातील, असे संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले. सर्वांचा योग्य सन्मान केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात संमेलनास अवघे ७ दिवस शिल्लक राहिले असताना अजूनही सभामंडपासह उपसभामंडपांना कोणती नावे द्यायची हे ठरलेले नाही. त्यामुळे जातेगावकर यांनी पत्रकार परिषदेत वेळ मारुन नेण्यासाठी शुक्रवारी (दि.२६) सभामंडपांची नावे जाहीर केली जातील, असे सांगितले.