प्रचाराच्या तोफा थंडावल्या, छुपा प्रचार सुरू; पुणेकरांचा कौल कोणाला?

By elections in Pune | रविवारी, २६ फेब्रुवारीला मतदान होणार असून, निकाल ३ मार्चला निकाल लागणार आहे. त्यामुळे पुण्यातील जनता कोणाला कौल देते हे पाहावं लागणार आहे.

pune prachar sabha

By elections in Pune | पुणे – राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झालेला असताना दुसरीकडे पुण्यात पोटनिवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. पुण्यातील जनतेचा कौल आपल्या पारड्यात पाडण्यासाठी शिवसेना-भाजपा महायुती आणि ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडीनेही जोरदार प्रचार सभा घेतल्या आहेत. आता घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जाणार आहे.

मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा पेठ विधासनभा मतदारसंघात आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड येथील विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पोटनिवडणुका महाराष्ट्राच्या परंपरेनुसार बिनविरोध करण्यासाठी भाजपाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, महाविकास आघाडीने पंढरपूर, सोलापूरचा दाखला देत बिनविरोधचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. कसबा पेठेत भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाली असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर उभे आहेत. तर, दुसरीकडे चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्यात लढत होणार आहे. तर, याच मतदारसंघातून ठाकरे गटाचे बंडखोर राहुल कलाटेसुद्धा आपलं नशिब आजमावणार आहेत.

हेही वाचा चिंचवड पोटनिवडणूकही ‘माना’ची!

महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार असल्याने दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे या निवडणुकांच्या निकालातून सिद्ध होऊ शकेल असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे दोहोंकडूनही जोरदार प्रचार सभा, प्रचार रॅली काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून बसले असून विविध घटकांशी भेटत आहेत. तर, महाविकास आघाडीकडून शरद पवार, आदित्य ठाकरे, अजित पवार यांनीही दोन्ही मतदारसंघ पिंजून काढत महायुतीवर बाण सोडले आहेत. तसंच, उद्धव ठाकरे यांनीही दृकश्राव्य प्रणालीचा वापर करत मतदारांशी संवाद साधला.

दरम्यान, आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज प्रचाराचा तोफा थंडावल्या आहेत. सभा, रॅली थांबल्या असल्या तरीही छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यामुळे आता रात्रीच्या प्रचाराला जोर धरेल. मतदारांच्या छुप्या भेटीगाठी सुरू होऊन त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाईल. छुप्या प्रचारावेळी उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करतात. तसंच, मतदारसंघातील विविध प्रभागाताली महत्त्वाच्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या संपर्कातील जनतेचा कौल आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो. कसबा आणि पिंपरीतील मतदारसंघातही अशाच छुप्या प्रचाराला आता वेग येणार असल्याचं सांगितलं जातंय.

रविवारी, २६ फेब्रुवारीला मतदान होणार असून, निकाल ३ मार्चला निकाल लागणार आहे. त्यामुळे पुण्यातील जनता कोणाला कौल देते हे पाहावं लागणार आहे.