शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

bjp want shinde group mps constituencies BJPs Lok Sabha Constituency Travel Plan

शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण २३ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्याच्या ४० दिवसांनंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात येत होते. मात्र आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती असून, येत्या १२ ते १३ डिसेंबरपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन्ही मंत्री तब्बल ४० दिवस महाराष्ट्र राज्याचे काम पाहत होते. यानंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार ९ ऑगस्ट २०२२ रोजी म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्याच्या ४० दिवसांनी झाला होता. तेव्हासुद्धा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे सांगितले जात होते. परंतु तो काही लवकर झाला नाही, आता त्याचप्रमाणे ४ महिने सरकारला सत्तेत येऊन झाले तरी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं तो कधी होणार हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे आता हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यात हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली असून, विरोधकांनी राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी रणनीती तयार ठेवली आहे. २० मंत्री राज्य सरकारमध्ये काम करत असून, या मंत्र्यांवर स्वतःच्या खात्याव्यतिरिक्त इतर खात्यांचा अतिरिक्त भार आहे. यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना २० मंत्र्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. आमदार आशिष जैस्वाल यांनी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले होते. दुसरीकडे कोणालाही मंत्रिपद द्या, पण मंत्रिमंडळ विस्तार लवकर करा, असे आमदार बच्चू कडू म्हणाले होते.

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास डोक्याचा ताप कमी होणार – फडणवीस

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीसांवर वारंवार टीका करण्यात येत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक खात्यांचा अतिरिक्त भार आहे. यामुळे संबंधित खात्यातील नियम आणि त्यांची अपडेट त्यांना वारंवार घ्यावी लागते. यामुळेच दोन्ही मंत्र्यांचीसुद्धा चांगलीच अडचण होताना दिसत आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक वेळा अनौपचारिक गप्पा करताना एकदाचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तर डोक्याचा ताप कमी होईल, असे म्हणत असतात.

मोदींच्या दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर डिसेंबर महिन्यात येत आहेत. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या १ आठवडापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. मोदी ११ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असेल. यामुळे राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ११ डिसेंबर २०२२ च्या पूर्वी किंवा नंतर होण्याची दाट शक्यता आहे.


हेही वाचाः मुंबई-पुणे महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय