गँगस्टर रवी पुजारीविरोधात राज्यभरात चालणार खटले

नाशिक : कुख्यात गँगस्टर अन् छोटा राजनचा हस्तक रवी पुजारी याच्याविरोधात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खंडणी, दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. या खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. अजय मिसर यांची नियुक्ती शासनाने केली असून, लवकरच सुनावण्या सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये गँगस्टार रवी पुजारी याचे सेनेगलमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते.

राज्यभरात रवी पुजारीविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यातंर्गतदेखील पुजारीविरोधात अनेक खटले आजही विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. हे सर्व खटले चालवून पुजारीला शिक्षा मिळवून देण्यासाठी आता सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढत नाशिक जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती केली आहे. मुंबई, ठाणे व नाशिक येथील विविध न्यायालयांत लवकरच याप्रकरणी सुनावण्ता सुरु होणार आहेत.

प्रत्यार्पण प्रक्रियेतील भूमिकाही ठरलेली महत्त्वाची

गँगस्टर रवी पुजारीच्या प्रत्यार्पण प्रक्रियेतदेखील विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. पुजारीविरोधात अनेक बिल्डर्स, बिझनेसमन, बॉलिवूड तसेच टीव्ही अ‍ॅक्टर्स यांनी खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत. परदेशातून रवी पुजारी महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारी नेटवर्क चालवत असल्याचे दिसून आले होते.