आमचं गुण्यागोविंदानं चाललं असताना तुम्ही त्यांना फितवलं, चंद्रकांत पाटलांचं पटोलेंना प्रत्युत्तर

chandrakant patil

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही बलाढ्य पक्षांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर राज्यातील बदलत्या समीकरणांची विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर मोठं भाष्य केलं आहे. भाजपनं दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम केलंय, अशी टीका नाना पटोलेंनी भाजपला केली होती. दरम्यान, आमचं गुण्यागोविंदानं चाललं असताना तुम्ही त्यांना फितवलं, असं म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची घर फोडण्याची मोठी परंपरा आहे. त्यावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गद्दारी केली म्हणत आहेत. तुम्ही २०१९ ला काय केले. तुम्ही गद्दारीच केली ना, राष्ट्रवादी म्हणत आहे. यांनी यांची माणसं पळवली. पण तुम्ही आमच्या उद्धव ठाकरेंना पळवलं. आमचं अतिशय गुण्यागोविंदाने चाललं होतं. पण तुम्ही त्यांना फितवलं, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी पटोलेंवर पलटवार केला.

आम्ही सर्वजण सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही. घरं कोणी कोणाची फोडली. गद्दारी कोणी केली, पाठीत खंजीर कोणी खुपसला. यावर वेगळी पत्रकार परिषद घेण्याची इच्छा असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

काय म्हणाले होते नाना पटोले?

नाशिकमध्ये सुधीर तांबेनी आमच्यासोबत विश्वासघात केला. भाजपनं दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम केलंय. त्याचे परिणाम आता भाजपला भोगावे लागतील. त्यांनी कॉंग्रेसचा एक नेला तर आम्ही आमच्या नाशिक विभागात ५० आमदार उभे करू. मग भाजप आमचे किती आमदार घेऊन पळतात, हे पाहू. यादृष्टीने कॉंग्रेस रणनिती आखत असल्याचं देखील नाना पटोले म्हणाले. प्रजा कोण, राजा कोण , जनतेने याचं उत्तर दिलं पाहिजे. भारत जोडोचा निवडणूकीवर सकारात्मक परिणाम झाला. असं देखील ते यावेळी म्हणाले.


हेही वाचा : “भाजपची घरं कशी फुटतात हे आता कळेल!”; नाना पटोलेंचा इशारा