हा बालिशपणा..,मी त्यांच्याशी बोलत नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे याची मला कल्पना देखील नाहीये. मला सुद्धा याबाबत बातम्यांमधूनच समजलं आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

सरस्वती पूजनावरील वादग्रस्त वक्तव्यावर मेसेज टाकल्याने भुजबळ यांनी व्यापाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप आहे. भुजबळांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, माझ्यासोबत गेल्या दहा वर्षांपासून शत्रुत्व पत्करलेल्या ललित टेकचंद यांनी हा गुन्हा दाखल केलाय. मात्र मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याशी बोललो सुद्धा नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

मला माझ्या नंबरवर अतिशय घाणेरडे मेसेज टाकून त्रास देण्यात आले होते. यात राजकीय हस्तक्षेप मला वाटत नाही. हा बालिशपणा आहे, असंही भुजबळ म्हणाले.

चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांनी छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याची तक्रार चेंबूर पोलिसांकडे दिली आहे. त्यांनी भुजबळांना मोबाईलवर दोन व्हिडीओ पाठवले होते. त्यात हिंदू धर्माचा अपमान केल्याचं भाषण छगन भुजबळ यांना पाठवलं होतं, असं टेकचंदानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. व्हिडीओ पाठवल्यानंतर लगेच टेकचंदानी यांना व्हॉट्सएप कॉल्स आणि मेसेजद्वारे धमक्या मिळू लागल्या, ज्यामध्ये त्यांना शिवीगाळही करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. मात्र, छगन भुजबळ यांनी धमकी दिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच माझं नाव खराब करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असं भुजबळ म्हणाले.


हेही वाचा : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई विद्यापीठात पार्किंग व्यवस्था! विद्यार्थी संघटना आक्रमक होण्याची शक्यता