भुजबळ – कांदे वाद : खासदाराचा फोन अन् वादावर पडदा

नांदगावला न्याय मिळेपर्यंत लढा कायम - आमदार सुहास कांदे

Chhagan-Bhujbal_Suhas-Kande

अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील वादावर पडदा पडल्याचे खात्रीलायकरीत्या कळते. शिवसेनेच्या एका खासदाराच्या फोननंतर हे संपुर्ण प्रकरण मिटल्याचे कळते. खुद्द छगन भुजबळ यांनीही प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत प्रतिक्रिया देताना संपुर्ण प्रकरणात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. हा अंतर्गत प्रश्न असून तो सोडवला जाईल, असे भुजबळांनी स्पष्ट केले आहे. पण नांदगावला न्याय मिळेपर्यंत आपला लढा कायम ठेवणार असल्याची प्रतिक्रिया आमदार सुहास कांदे यांनी माय महानगरला दिली आहे. शिवसेना आमदार यांनी निधीच्या विषयावर छगन भुजबळांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघातील सेना राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आला होता.

भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात झालेला वाद हा सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. परंतु या संपुर्ण प्रकरणात आता दोन्ही नेत्यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. या संपुर्ण प्रकरणात शिवसेना खासदाराच्या मध्यस्तीनंतरच हे संपुर्ण प्रकरण निवळल्याचे बोलले जात आहे. मिटिंगमध्ये कोणतीही तक्रार कुणीही केलेली नाही. बाकी तक्रारी सोडवण्यासाठी महाविकास आघाडी, मुख्यमंत्री आणि इतर नेते आहेत. हा अंतर्गत प्रश्न असून तो सोडवला जाईल. सुहास कांदे यांच्या काही मागण्या आहेत, त्या मान्य केल्या जातील असेही स्पष्टीकरण भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.

काय आहे प्रकरण ?

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात काही दिवसांपूर्वी एका बैठकीत खडाजंगी झाली होती. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. निधी वाटपाच्या मुद्द्यावर आमदार सुहास कांदे यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर निधी विकल्याचे आरोप केले होते. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे देऊ शकतो असाही दावा त्यांनी केला होता. त्यानंतर सुहास कांदे यांनी आपला मोर्चा हा कोर्टाकडे वळवत भुजबळांविरोधात कोर्टात धाव घेतली होती. पण आज दिवसभरात घडलेल्या घडामोडीनंतर या संपुर्ण प्रकरणावर पडदा टाकण्यात आला असल्याचे कळते.


हेही वाचा – पण काही लोक मला झोपू देणार नाही – छगन भुजबळ