छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं नाव बदललं, अजित पवारांना पुन्हा डिवचलं?

Chtrapati Sambhaji Maharasj Memorial Name Changed | वढू येथील या समाधी स्थळाच्या नावात अंशतः बदल करण्यात आला आहे. या बदललेल्या नावातून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

sambhaji maharaj samadhisthal
संग्रहित छायाचित्र

Chtrapati Sambhaji Maharasj Memorial Name Changed | मुंबई – छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर यावरून हिवाळी अधिवेशनात तुफान गदारोळ झाला होता. या गोंधळाला दोन महिने उलटत नाहीत तोवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वढू येथील या समाधी स्थळाच्या नावात अंशतः बदल करण्यात आला आहे. या बदललेल्या नावातून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते, असा दावा अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात भर सभागृहात केला होता. यावरून राज्यात हलकल्लोळ माजला होता. सत्ताधाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला. ठिकठिकाणी अजित पवारांविरोधात आंदोलने झाली. भाजपाने यात हिरीहिरीने सहभाग घेत अजित पवारांना माफी मागण्यासाठी जोर लावला. मात्र, शरद पवार आणि राष्ट्रवादीतील सर्वच नेते अजित पवारांच्या पाठीशी राहिले. अजित पवारांनी आपला मुद्दा लावून धरला. कालांतराने हा वाद शमला. परंतु, सरकारकडून पुन्हा एकदा अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे. कारण, पूर्वी या स्मारकाच्या नावात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असे होते, मात्र आता त्यात बदल करून स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे करण्यात आले आहे.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ मौजे तुळापूर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम 46 अन्वये विधानपरिषदेत केले.

या विकास आराखड्याच्या नावात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि.पुणे विकास आराखडा, असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.