घरमहाराष्ट्रबंडखोरांना जागा दाखवू

बंडखोरांना जागा दाखवू

Subscribe

मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड इशारा

दोन पक्षांच्या ठरलेल्या युतीत कोणी बंडखोरी करून मिठाचा खडा टाकत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवू, त्यांना माफ केले जाणार नाही. महायुतीत अशांना कोणतेही स्थान नसेल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला आहे. युतीतील अधिकृत उमेदवारांविरोधी अर्ज दाखल करणार्‍या कार्यकर्त्यांना दोन दिवसांत उमेदवारी मागे घ्यायला लावू, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी एकसंध युतीला आजवर मिळाले नसेल तेवढे यश मिळेल, असा आत्मविश्वासही व्यक्त केला.

विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेच्या झालेल्या युतीनंतर प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद नरिमन पॉईंट येथील महिला आर्थिक विकास मंडळाच्या मुख्यालयात शुक्रवारी बोलावली होती. युतीच्या उमेदवारांपुढे एकमेकांच्या कार्यकर्त्यांचे अर्ज दाखल झाले आहेत, हे मान्य करत दोन दिवसांत या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडू. जे ऐकणार नाहीत, त्यांचे युतीशी कोणतेही नाते राहणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

राज्याच्या विकासात आमच्या सरकारने गती दिली आहे. अनेक कामे पुढे सरकली आहेत. जी व्हायची आहेत ती आगामी काळात आम्ही पूर्ण करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळी भाग आमचा आगामी फोकस असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पाणी वाटपाचा सकारात्मक कार्यक्रम हाती घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याला आमचे पहिले प्राधान्य असेल. युतीतील जागांच्या वाटपाची माहिती देताना त्यांनी भाजपला १६४(150 भाजप आणि घटक पक्षाच्या १४ जागा) आणि शिवसेना १२४ असे वाटप असल्याचे स्पष्ट केले. खडसे, तावडे, पुरोहित, मेहता, बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याप्रकरणी विचारणा केली असता मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांना या निवडणुकीत युतीची उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्या खांद्यावर वेगळ्या जबाबदार्‍या असतील.

- Advertisement -

त्यांची जबाबदारी नव्या कार्यकर्त्यांकडे देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी काहीच अडचणी नव्हत्या तिथल्या जागा लागलीच घोषित करण्यात आल्या. ज्या ठिकाणी स्पर्धा होत्या तिथली उमेदवारी जाहीर करण्यात वेळ गेल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत आलेले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे स्वागत करताना एक उमदा कार्यकर्ता राज्य विधानसभेत येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना उमेदवाराला बसवण्याच्या अपेक्षांच्या पूर्तीविषयी विचारणा करता उध्दव ठाकरे यांनी कोणतीही अपेक्षा आकड्यांवर अवलंबून नसते, असे म्हटले. लोकसभा निवडणुकीचे वातावरण आज राहिलेले नाही.

आमच्या पक्षाने भावाचे नाते निभावले आहे. महाराष्ट्राचे भले करायचे असेल तर तुझे आणि माझे करण्याचे दिवस नाहीत, असे उध्दव म्हणाले. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, हीच आदित्यची इच्छा असल्याचे उध्दव यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या वाट्याला आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांच्या विरोधात सेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यावर एकत्र बसून मार्ग काढू, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -