घरमहाराष्ट्रपुराचा सामना करण्यासाठी सरकारनं कसली कंबर, मुख्यमंत्र्यांचे विभागवार निर्देश

पुराचा सामना करण्यासाठी सरकारनं कसली कंबर, मुख्यमंत्र्यांचे विभागवार निर्देश

Subscribe

राज्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि यंत्रणांना विभागवार निर्देश देखील दिले.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागामध्ये पडत असलेल्या पावसाने जनतेचं कंबरडं मोडलं असून अनेक ठिकाणी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. कोकणातील काही भाग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. तसेच, अजूनही या ठिकाणच्या जीवितहानीचा अंदाज आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थिगित करत मुंबईत येऊन मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांसोबतच वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत पूर परिस्थिती आणि मदत कार्याची माहिती घेतली. त्यानंतर घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत त्यांनी पुरासंदर्भातल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.


हेही वाचा – कोल्हापूर, सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश

  • पूर ओसरलेल्या भागात पिण्याचं शुद्ध पाणी आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज व्हावे
  • अशा भागांमध्ये आरोग्य व्यवस्था पुरवण्याची काळजी यंत्रणांनी घ्यावी. आवश्यकता भासल्यास मुंबई येथून वैद्यकीय पथक देखील पाठविण्यात येतील
  • पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पूर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत
  • दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरवण्यात याव्यात
  • रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी

कोल्हापुरात NDRFची २२ पथकं

पंचगंगा नदीच्या पुरामुळे आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमध्ये परिस्थिती चिंताजनक झाली आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) २२ पथकं सध्या कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून डोनिअर विमानाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याची मागणी केली. त्यानुसार आता कार्यवाही सुरू असल्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूर मधील २०४ गावांना पुराचा फटका बसला आहे. प्रशासनामार्फत सध्या ११ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आता नौदलाचे बचाव पथक देखील कार्यरत आहे.

- Advertisement -

सांगली जिल्ह्यात सांगली, पलूस, वाळवा तालुक्याला देखील पुराचा फटका बसला आहे. सुमारे ५३ हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

सोलापूर – जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील नागरिकांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. पंढरपूर येथील सुमारे २००० नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे.

- Advertisement -

पुणे – पुण्यात शहरासह ६४ गावं पुराने प्रभावित झाली असून सुमारे ३३४३ लोकांना मदत करण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये गहू आणि तांदुळाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणं १०० टक्के भरली आहेत.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रद्द नव्हे, फक्त स्थगित

रायगड – या जिल्ह्यात ८ तालुके बाधित झाले असून तिथे सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. सुमारे ३००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
रत्नागिरी – इथली ३८ धरणं १०० टक्के भरली आहेत. पुरामुळे १३ गावे बाधित झाली आहेत.

नाशिक – जिल्ह्यात गेल्या ५० वर्षांतला सर्वाधिक विसर्ग सोडण्यात आला असून सर्व धरणं ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत.

ठाणे – जिल्ह्यात १३ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

राज्यात पूरग्रस्त भागात आरोग्य सुविधेसाठी सुमारे १६२ वैद्यकीय पथके कार्यरत असून आवश्यकता भासल्यास अधिकची पथके पाठविण्यात येतील. औषधांचे साठा पुरेसा असून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री

राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००७ मिमी असून आतापर्यत सरासरीच्या ६८५ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यत प्रत्यक्ष ७१४.४० मिमी पाऊस झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -