त्यांच्या पोटदुखीसाठी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’; मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

संग्रहित छायाचित्र

मुंबईः ज्या वेगाने विकास सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. या पोटदुखीवर उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठेवला आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेवर केला.

खेड येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला ढेकणाची उपमा दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्या वेगाने विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे त्यांचा थयथयाट होत आहे. रोज उठून टीका करणे एवढंच त्यांना काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर ते वारंवार टीका करत असतात. त्यांना किती टीका करायची ती करु द्या. आम्ही त्या टीकेला कामातून उत्तर देऊ.

उद्धव ठाकरे यांच्या सभेला मुस्लिम मतदारांनी पांठिबा दिला. उद्धव ठाकरे हे जातीचे राजकारण करत आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने माणसे पाठवली. त्यांच्याकडे आता शिवसैनिक उरलेले नाहीत. बाळासाहेब ठाकरे याचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यांच्या विचारनेच आम्ही जनसेवा करत आहोत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हीच बाळासाहेबांची शिकवण होती. त्यानुसार आम्ही काम करत आहोत.  शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचे काम करत आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देशभक्त म्हणू नका, असा टोला लगावत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कसबा निवडणूक जिंकली म्हणजे देश जिंकला असे होत नाही. तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली आहे. हे आधी समजून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेला विकास जनतेने स्विकारला आहे. त्यामुळे सन २०२४ च्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल. एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील. विरोधक संपून जातील, असा दावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

 

१९ मार्चला मुख्यमंत्र्यांची खेडमध्ये सभा

उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये १९ मार्चला जाहिर सभा होणार आहे. या सभेचे नियोजन करण्याच्या सुचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.