घरCORONA UPDATECoronaEffect : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला गर्दी करणाऱ्यांना इशारा!

CoronaEffect : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला गर्दी करणाऱ्यांना इशारा!

Subscribe

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता हळूहळू २००पर्यंत जाऊ लागलेली असतानाच आपण तिसऱ्या स्टेजमध्ये पोहोचलो आहोत की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी संवाद साधत पुन्हा एकदा घरातच थांबण्याचं आवाहन केलं आहे. किराणा, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धुडकावून मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. अशांना आवाहन करतानाच मुख्यमंत्र्यांनी ‘कृपा करून गर्दी करू नका, घरबाहेर पडू नका, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात देखील गर्दी कमी झाली नाही, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील’, असा इशारा दिला आहे.

‘प्रत्येकाने जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे. कृपा करून कठोर निर्णय घ्यायला लावू नका. केंद्र सरकारने ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्या मिळतीलच. पण आपली जी शिवभोजन योजना आहे, त्यात आपण पुढचे ३ महिने ५ रुपयांनी देतोय. ही परिस्थिती आणीबाणीची आहे. कृपा करून सरकार तुमची मदत करत असताना तुम्ही देखील सरकारची मदत करा. कारण सरकार तुमच्यासाठीच हे सगळं करत आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

‘जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांना मानाचा मुजरा!’

‘मी कस्तुरबा रुग्णालयातल्या डॉक्टरांशी बोलतो. मला एका गोष्टीचा निश्चित अभिमान आहे. डॉक्टर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो. डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांचं मनोधैर्य वाढतं की नाही माहीत नाही, पण माझं मनोधैर्य वाढतं. पोलीस, जीवनावश्यक सेवा देणारे काम करत आहेत. आपण त्यांच्यावर किती ताण द्यायचा? ही मंडळी आपल्यासाठी रविवार असो किंवा नसो, धोक्याचं काम आपल्यासाठी पत्करत आहेत. आता आपण या खेळामध्ये प्रवेश करताना चाचणी करण्याच्या सुविधा वाढवल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढत आहे. पण ती अपेक्षेइतकीच वाढायला हवी. त्यापेक्षा जास्त नको’, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आत्ताच वजाबाकी करायची आहे

‘हाय रिस्क गटाकडे जास्त लक्ष द्यायला हवं. गरोदर माता, डायबेटिज पेशंट, वृद्ध यांना जास्त जपावं लागणार आहे.  त्यासाठीच गर्दी न करण्यासाठी सांगतोय. या काळातच कोरोना गुणाकार करतो. याच काळात आपल्याला त्याची वजाबाकी
करायची आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत गर्दी कमी झाली नाही, तर नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील. यापुढचं जर पाऊल टाकावं लागलं, तर ती यंत्रणा देखील तयार ठेवली आहे. घराबाहेरची लढाई आम्ही करू. पण तुम्ही घरात थांबा. पोलिसांशी हुज्जत घालू नका’, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

- Advertisement -

हेही दिवस जातील…

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आशावाद व्यक्त केला. ‘मला खात्री आहे की हेही दिवस जातील. लॉकडाऊननंतर ८ दिवस गेले. पुढचे काही दिवस राहिलेत. या अवघड परिस्थितीत आपण हे युद्ध जिंकायचं आहे’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -